वेस्ट इंडीजमधील लेसर अँटिलीस बेटांपैकी मार्तीनीक बेटावरील जागृत ज्वालामुखी व ज्वालामुखी पर्वत. मार्तीनीक बेटाच्या अगदी उत्तर भागात माँ पले हा ज्वालामुखी पर्वत असून
त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १,३९७ मी. आहे. मार्तीनीक हा फ्रान्सचा सागरपार प्रांत असून या प्रांताच्या राजधानीचे ठिकाण असलेल्या फॉर द फ्रान्स या शहराच्या वायव्येस २४ किमी. वर हा पर्वत आहे. पले ही फ्रेंच संज्ञा असून त्याचा अर्थ ‘बाल्ड’ (ज्वालामुखीय राख व लाव्हारसाचे थर असलेला भाग) असा होतो. माँ पले ज्वालामुखीची निर्मिती अधोगमन क्षेत्रात झाली आहे. या अधोगमन प्रक्रियेमुळे लेसर अँटिलीस बेटांना कमानाकार प्राप्त झाला आहे. ज्वालामुखींची ही वक्र साखळी सुमारे ८५० किलोमीटर लांबीची असून ती प्वेर्त रीको ते व्हेनेझुएला यांदरम्यान पसरलेली आहे. या भागात दक्षिण अमेरिकन भूपट्टांतर्गत असलेले कॅरिबियन भूपट्ट अटलांटिक महासागरीय भूकवचाला भिडल्यामुळे लेसर अँटिलीस बेटावर ज्वालामुखींची श्रृंखला तयार झाली आहे. त्यातील माँ पले हा एक अत्यंत विस्फोटक ज्वालामुखी आहे. या बेटांच्या कमानातील इतर ज्वालामुखीही त्यांच्या ज्वालामुखी क्रियेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये सेंट व्हिन्सेंटचा ला सूफ्रिएअर, ग्वादलूपचा ला ग्रांद सूफ्रिएअर ज्वालामुखी, माँसरॅतचा सूफ्रिएअर हिल्स आणि समुद्राखालील किक एम जेनी या ज्वालामुखींचा समावेश होतो.
ज्वालामुखी तज्ज्ञांनी माँ पले ज्वालामुखीच्या उत्क्रांतीचे प्रारंभिक, मध्यम आणि आधुनिक असे तीन टप्पे ओळखले आहेत. प्रारंभिक टप्प्याला ‘पॅलिओ-पेली’ अवस्था म्हटले जाते, त्या वेळी माँ पले हा एक सामान्य स्तरीय ज्वालामुखी होता. पॅलिओ-पेलीचा शंकू अनेक लाव्हा प्रवाहांचे थर आणि तुकडे झालेले ज्वालामुखीय डबर यांपासून बनलेला होता. आजही या ज्वालामुखीच्या उत्तर दिशेकडील दृश्यात पॅलिओ-पेली शंकूचे अवशेष दिसून येतात.
दुसरा टप्पा, जो आता मध्यम अवस्था म्हणून ओळखला जातो, तो दीर्घकालीन शांततेनंतर सुमारे १,००,००० वर्षांपूर्वी सुरू झाला. या टप्प्यात प्रथम मॉर्न मॅकुबा लाव्हा घुमटाची निर्मिती झाली आणि त्यानंतर मॉर्न मॅकुबा ज्वालामुखी महाकुंड तयार झाले. मध्यम अवस्थेत अनेक उद्रेक झाले. या उद्रेकांमुळे अग्निदलिक प्रवाह निर्माण झाले. या प्रवाहांनीच इ. स. १९०२ मधील उद्रेकात सेंट पिअर (सँ प्येर) शहराचा नाश केला होता. सुमारे २५,००० वर्षांपूर्वी, नैर्ऋत्य दिशेने मोठ्या प्रमाणावर शंकूचा भाग कोसळला आणि एक भूस्खलन घडले. ही घटना अ. सं. सं. च्या वॉशिंग्टनमधील मौंट सेंट हेलीना ज्वालामुखीच्या १९८० मध्ये झालेल्या उद्रेकासारखी होती.
माँ पले ज्वालामुखी उत्क्रांतीच्या आधुनिक टप्प्यात सध्याच्या शंकूचा बहुतांश भाग तयार झाला. या काळात पमीसचे (हलका ज्वालामुखीय खडक) साठे आणि भूतकाळातील अग्निदलिक प्रवाहांचे अवशेष आढळतात. ज्वालामुखीच्या गेल्या ५,००० वर्षांच्या क्रियाशीलतेत ३० पेक्षा अधिक उद्रेक झाल्याचे आढळले आहेत. सुमारे ३,००० वर्षांपूर्वी, मोठ्या पमीस उद्रेकानंतर एताँ सेक (फ्रेंच भाषेमध्ये ‘कोरडे तळे’) ज्वालामुखी महाकुंडाची निर्मिती झाली. इ. स. १९०२ चा उद्रेक एताँ सेक ज्वालामुखी महाकुंडातच झाला. या उद्रेकामुळे अनेक अग्निदलिक प्रवाह निर्माण झाले आणि एक लाव्हा घुमट तयार झाला, ज्याने ज्वालामुखी महाकुंड भरून गेले. माँ पलेचे उद्रेक ४ जुलै १९०५ पर्यंत सुरुच राहिले होते. त्यानंतर इ. स. १९२९ पर्यंत हा ज्वालामुखी निद्रितावस्थेत राहिला.
१६ सप्टेंबर १९२९ रोजी पुन्हा उद्रेक सुरू झाला. या वेळी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता धोकादायक क्षेत्र त्वरित रिकामे केले. इ. स. १९२९ च्या उद्रेकामुळे एताँ सेक महाकुंडामध्ये दुसरा घुमट तयार झाला आणि अग्निदलिक प्रवाह ब्लँच नदीच्या खोऱ्यात वाहत गेले. जरी अग्निदलिक प्रवाह निर्माण झाले, तरी ही क्रिया इ. स. १९०२ च्या उद्रेकाइतकी तीव्र नव्हती. शेवटी शिखरावर आणखी एक शूल (स्पाइन) तयार झाला, जो इ. स. १९०२ मधील शूलपेक्षा लहान होता. ही क्रिया इ. स. १९३२ च्या उत्तरार्धात समाप्त झाली.
गेल्या २५० वर्षांमध्ये किमान चार उद्रेक येथे झाले आहेत. यामध्ये इ. स. १७९२ आणि इ. स. १८५१ मधील धुममुखातून (वाफ व वायू बाहेर पडण्याची ठिकाणे) झालेले वाफेचे उद्रेक, तसेच अलीकडील इ. स. १९०२–१९०५ आणि इ. स. १९२९–१९३२ या काळातील शिलारसाच्या उद्रेकांचा समावेश आहे. या शिलारसाच्या उद्रेकांमुळे लाव्हा घुमटांची निर्मिती झाली. या लाव्हा घुमटांच्या परिसरात शिखरावर असलेली धुममुखे १९७० पर्यंत सक्रिय होती; मात्र त्यानंतर ती निष्क्रिय झाली आहेत. या भागात २ मे ते ९ मे २०२५ यांदरम्यान २५६, तर मे महिन्यात ६३२ भूकंपाचे धक्के बसले. तज्ज्ञांच्या मते, भूगर्भातील लाव्हारसाच्या हालचालीमुळे हे धक्के जाणवले असले तरी, नजीकच्या काळात या ज्वालामुखीच्या उद्रेकाची शक्यता नाही. ज्वालामुखीच्या वरच्या व खालच्या उतारांवर ऊष्णोदकाचे झरे आढळतात. त्यांपैकी रीव्हीअर शोदे, रीव्हीअर क्लेअर, रीव्हीअर पीकोदो आणि रीव्हीअर मितान हे झरे विशेष उल्लेखनीय आहेत. याशिवाय, नैर्ऋत्य दिशेला कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर काही जलतापीय पाण्याचे पाण्याखालील झरेदेखील आढळतात.
माँ पले हा ज्वालामुखी शंकू कडक राख आणि घट्ट लाव्हा यांचे थरांवर थर साचून संमिश्र स्वरूपाचा निर्माण झालेला आहे. इ. स. १९०२ मधील सर्वनाशक ज्वालामुखी उद्रेकाच्या वेळी
घुमटाच्या माथ्यातून सुमारे ३०० मी. उंचीचा एक सुळका वर आला होता. त्याला माँ पलेचा शूल असे नाव दिले होते. असे वर आलेले सुळके फार काळ टिकत नसून वातावरणक्रियेने त्यांची शकले होऊन पायथ्याशी कोनीय तुकड्यांचे डबर साचते. या नाट्यमय घटनेपासून अशा प्रकारच्या ज्वालामुखी उद्रेकावरून ‘पेली’ हा स्वतंत्र ज्वालामुखी उद्रेक प्रकार मानण्यात येऊ लागला. पेलीयन प्रकारच्या उद्रेकात लाव्ह्याचा दाटपणा आणि वायूंची स्फोटकता यांची परमावधी होते. नळीच्या वरच्या भागात थिजून घट्ट झालेल्या लाव्ह्याचे टोपण इतके जाड झालेले असते की, खालच्या बाजूस लाव्ह्यात साचत असलेल्या वायूला ते उडवून देणे अशक्य होते. वरच्या बाजूने सुटकेचा मार्ग न उरल्याने वायूने भरलेला शिलारस नळीच्या बाजूला भेग पाडून तेथून बाहेर वाट काढतो व उतारावरून तप्त शिलारसाचे लोंढे खाली वाहू लागतात. शिलारस बाहेर पडताच त्यातील वायू मुक्त होऊन त्याचा फेसाळ प्रवाह बनतो. या प्रवाहाच्या खालच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या वायूंचा वंगणासारखा उपयोग होऊन गुळगुळीत झालेल्या उतारावरून शिलारसाचे अतितप्त फेसाळ लोंढे प्रचंड वेगाने खाली धाव घेतात. क्वचित प्रसंगी त्यांचा वेग ताशी १६० किमी. पर्यंत जातो. उतारावरून वेगाने धाव घेणारे हे लोंढे काळे वा तळपते (प्रकाशमान) असतात. त्यांना ‘न्ये आर्दांत’ (तळपते ढग) असे फ्रेंच नाव आहे. अत्यंत दाट लाव्ह्याच्या उद्रेकामुळे तीव्र उताराचे घुमट तयार होत असताना कित्येकदा खालून येणाऱ्या लाव्ह्याच्या रेट्यामुळे निर्गम द्वारात आधी थिजून घट्ट झालेला लाव्ह्याचा भाग चकलीपात्रातून दाबल्यावर चकली बाहेर पडावी तसा निमुळत्या सुळक्याच्या रूपात वर ढकलला जातो. घुमटाला पडलेल्या भेगांमधूनही असे अनेक शूल बाहेर आलेले दिसतात. त्याला ज्वालामुखी शूल असे म्हणतात.
माँ पले ज्वालामुखीच्या मंद उताराच्या शंकूवर दऱ्या व समृद्ध वने आढळतात. इ. स. १७९२, इ. स. १८५१ व इ. स. १९२९ मध्ये येथे कमी स्फोटक ज्वालामुखी उद्रेक झाले होते; परंतु ८ मे १९०२ रोजी झालेला ज्वालामुखी उद्रेक विसाव्या शतकातील सर्वांत मोठा विनाशकारी होता. या उद्रेकात त्याच्या लगत असलेले सेंट पिअर (सँ प्येर) शहर काही क्षणांत बेचिराख झाले आणि सुमारे ३०,००० लोक त्यात मृत्युमुखी पडले. बेटावरील तत्कालीन एकूण लोकसंख्येच्या ही लोकसंख्या १५% इतकी होती. सेंट पिअर शहर पुन्हा नव्याने वसले नाही. त्याठिकाणी काही नवीन खेड्यांची वस्ती निर्माण झाली. २०१७ साली या खेड्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ४,१२३ इतकी होती. युनेस्कोने २०२३ मध्ये माँ पले या ज्वालामुखी पर्वताचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश केलेला आहे.
संदर्भ : Furgang, Kathy, Mount Pelee, 2001.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.