कारखाने सर्वसाधारणपणे औद्योगिक वसाहतींमध्ये, नगरपालिका अथवा महापालिकांच्या जमिनीवर किंवा खूप मोठा पसारा असल्यास त्यांच्या मालकीच्या जागेवर उभारलेले असतात. उत्पादन करताना निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे संकलन, शुद्धीकरण आणि त्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कारखान्यांवर असते. त्यासाठी भूमिगत नलिकांचे जाळे, उदंचन केंद्रे (Raw sewage pump house) इ. वापरली जातात. त्यामधून वाहणाऱ्या सांडपाण्याचे, त्यांच्यात असणाऱ्या दूषितकांवरून तीन गट करता येतात : (१) पारंपरिक – जैराप्रामा (जैवरासायनिक प्राणवायूची मागणी), एकूण आलंबित पदार्थ, तेलकट, ओशट पदार्थ आणि सामू, (२) अपारंपरिक – अमोनिया, क्रोमियम, राप्रामा, फ्ल्यूओराइड, मँगॅनीज, जैविक नैट्रोजन, फेनॉल्स, फॉस्फरस, एकूण जैविक कार्बन आणि (३) शुद्धीकरणामध्ये ज्यांना प्राधान्य दिले पाहिजे असे – ॲसबेस्टॉस, सायनाईड, जड धातू आणि बाष्पनशील, विषारी जैविक पदार्थ. औद्योगिक सांडपाण्यामध्ये वरीलपैकी कोणती दूषितके किती प्रमाणात आहेत आणि शुद्ध केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावायची आहे ह्यावरून शुद्धीकरणप्रक्रिया आणि त्यांचा क्रम ठरवला जातो. काही अपवाद वगळल्यास शुद्धीकरणामध्ये जैविक पद्धतींचा वाटा फार मोठा असतो म्हणून त्यातील उपयुक्त जीवाणूंना काम करण्यास अनुकूल पर्यावरण उत्पन्न करणे हे प्रारंभिक शुद्धीकरणाचे कार्य आहे. भूमिगत पाईपांचे जाळे, उदंचन केंद्रे ह्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे सांडपाण्यातून उत्पन्न होणाऱ्या स्फोटक आणि विषारी वायूंपासून संरक्षण होते. ह्या सर्व ठिकाणी वापरलेल्या लोखंडी भागांचे गंजणे, काँक्रीटचे सडणे कमी होते आणि शुद्धीकरण केंद्रावर अतिरिक्त भार येत नाही. खूप मोठी प्रदूषणक्षमता असणाऱ्या कारखान्यांना स्वतःची शुद्धीकरण केंद्रे बांधून, प्रदूषण कमी करून मगच सांडपाणी गटारांमध्ये अथवा सामायिक किंवा एकत्रित शुद्धीकरण केंद्रामध्ये सोडण्याची परवानगी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घ्यावी लागते.
विविध उद्योगांमध्ये विशेष उपयोगी ठरणाऱ्या शुद्धीकरण प्रक्रियांची माहिती पुढीलप्रमाणे :
चाळणे : वस्त्रोद्योग, कागद निर्मिती, औषधे बनवणारे कारखाने, खाद्यतेले आणि फळांवर प्रक्रिया करणारे कारखाने, चर्मोद्योग, मद्यार्कनिर्मिती, दुग्धशाला, रंग व तत्सम रसायननिर्मिती.
निवळण : चिनी मातीपासून पदार्थ बनवणारे कारखाने, खाणकाम,लोखंड आणि पोलाद उत्पादन, तेलशुद्धीकरण, कागदनिर्मिती, साखरउद्योग, वंगणनिर्मिती.
प्लवण : साबण आणि तेलनिर्माण, कागदनिर्मिती, खाणकाम, वंगणनिर्मिती.
मिश्रण : रसायननिर्मिती, वेगवेगळे सामू असलेले सांडपाण्याचे प्रवाह, बाष्पक आणि शीतलक मिनार ह्यांमधील सांडपाणी.
समानीकरण : औषधनिर्मिती, वितंचनउद्योग, कारखान्यात एकमेकांपासून अत्यंत वेगळ्या प्रतीचे सांडपाणी उत्पन्न करणारे विभाग, कीटकनाशके, तण इ. मारणारी औषधे बनवणारे.
वायुविनिमय : विविध रसायनांची निर्मिती, औषधनिर्मिती, जैविकशुद्धीकरण करणारे. ह्याचे आणखी उपयोग म्हणजे सांडपाण्यातील जैविक पदार्थ सडत नाहीत आणि टाकीच्या तळाशी बसू शकत नाहीत, तसेच पाण्यातील अमोनियाचे प्रमाण कमी करता येते.
सामू बदलणे : तेल व वंगण ह्यांचे, आलंबित पदार्थांचे, सेंद्रिय पदार्थांचे मोठे प्रमाण असलेले प्रवाह, निस्यंदन/निवळण करून जडधातू काढणे.
किलाटन : वरील उल्लेख केलेले कारखान्यातील सर्व प्रवाह (सेंद्रिय पदार्थ सोडून).
ऑक्सिडीकरण व क्षपण : ऑक्सिडीकरण होऊ शकणारे जैविक पदार्थ, जीवाणूंना दाद न देणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये योग्य तो रासायनिक बदल घडवण्यासाठी, जडधातूंचे निवळण, सायनाईड, फेनॉल ह्यासारख्या विषारी पदार्थांना नष्ट करणे.
वायुजीवी आणि अवायुजीवी प्रक्रिया : वर उल्लेख केलेल्या प्रक्रिया वापरून सांडपाण्यातील अनिष्ट पदार्थ काढल्यावर ह्या प्रक्रिया वापरतात. सांडपाण्यात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण मोठे असेल तर प्रथम अवायुजीवी आणि मग वायुजीवी प्रक्रिया करणे किफायतशीर ठरते, शिवाय अवायुजीवी प्रक्रिया वापरल्यामुळे ज्वलनशील असा मिथेन वायू मिळतो आणि प्रक्रियेच्या शेवटी राहिलेला गाळ खत म्हणून वापरता येतो.
वरील वर्णन केलेल्या प्रक्रिया वापरून शुद्धीकरण करता येते. ह्यासाठी होणार खर्च कमी करण्याचे मार्ग : १) कमीतकमी पाणी आणि योग्य व प्रमाणातच कच्चा माल वापरणे, २) एकदा वापरून झालेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे, ३) उत्पन्न होणाऱ्या सांडपाण्यामध्ये दूषितकांचे प्रमाण कमीतकमी ठेवणे, ४) उत्पादन पद्धतीमध्ये योग्य ते बदल करून प्रदूषणाची तीव्रता कमी करणे. हे करीत असताना तयार झालेल्या मालाचा दर्जा कमी होणार नाही ह्याची काळजी घेणे.
संदर्भ :
- Patwardhan, A. D. Industrial Wastewater Treatment (2nd ed), Delhi, 2017.
- Pretreatment of Industrial Wastes, Manual of Practice no. FD-3. Water Environment Federation, 1994.
समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.