हा पाली तिपिटक- सुत्तपिटकातील चौथा निकाय ग्रंथ आहे . गौतम बुद्ध यांच्या उपदेशांचे संख्यात्मक (संख्याबद्ध शैली ) म्हणजे अंकानुसार वाढत जाणारे वर्गीकरण हे या निकायाचे ठळक वैशिष्ट्य आहे.अंगुत्तर म्हणजे,‘एक अंकानुसार चढत्या क्रमाने वाढत जाणारे’ होय. या निकायात एक, दोन,तीन, चार….अकरा अशा क्रमाने मांडणी केली आहे.त्यामुळे विषयांच्या वाढत्या संख्येनुसार सुत्तांचे समूहीकरण हे या निकायाचे रचनात्मक वैशिष्ट्य आहे. ‘अंगुत्तर निकायात’ एकूण ११ निपात (विभाग) असून प्रत्येक निपातातील संख्येच्या आधारावर एकक,दुकक …एकादस.अशाप्रकारे रचना केलेली आहे. प्रत्येक निपातातील उपदेश त्या त्या संख्येच्या आधारावर संकलित केलेले आहेत. उदा.एकक निपात – एक गोष्ट असलेली सुत्ते, दुक्क निपात – दोन गोष्टींचा उपदेश असलेली सुत्ते, तिक्क निपात – तीन गोष्टींचा उपदेश असलेली सुत्ते इ.याप्रमाणे पुढे एकादस निपातापर्यंत संख्या जाते.या ११ निपातांमध्ये १६९ (वग्ग) वर्ग आहेत.प्रत्येक वर्गात किमान ७ तर कमाल २६२ सुत्ते आहेत. अंगुत्तर निकायातील सुत्तांची संख्या २३०८ आहे. मात्र परंपरेनुसार ९५५७ सुत्ते असल्याचे मानले जाते. या परंपरागत संख्येचा उल्लेख अट्ठसालिनीतील निदान कथेत आढळतो. ‘नवसुत्तसहस्स- पञ्चसत- सत्तपण्णाससुत्तसंग ही अंगुत्तर निकायो |’ या संख्येचा उल्लेख सद्धम्मसंग्रह यात आला आहे. ‘नवसुत्तसहस्सानि पञ्च सुत्तसतानि च | सङ्खा अङ्गुतरे अयं |’ आकाराच्या दृष्टीने अंगुत्तर निकायातील उपदेश छोटे आहेत आणि त्यांचा विषय बुद्धांचे प्रवचन किंवा बुद्धांचा इतरांशी झालेला संवाद आहे. ‘मिलिंद प्रश्न (मिलिदपञ्ह)’ या ग्रंथात ‘एकुत्तर निकाय’ ( ऐकोत्तर– निकाय) असे म्हटले आहे. तसेच सर्वास्तीवादी संप्रदायाच्या संस्कृत त्रिपिटकात ‘एकोत्तर आगम’ या नावाने ‘अंगुत्तर निकाय’ या ग्रंथाची नोंद असल्याचे दिसते.‘अंगुत्तर निकाया’तील सुत्ते प्रामुख्याने लहान, संक्षिप्त आणि सुटसुटीत आहेत. नैतिक, ध्यानात्मक,आणि व्यावहारिक उपदेशांची स्पष्टता येते.
निपातांमध्ये निवडक उपदेश शिस्तबद्ध स्वरुपात संकलित केले गेले आहेत.:
- एकक निपात – एक धम्म काय आहे ?
- दुक निपात – दोन त्याज्य वस्तू, दोन प्रकारचे ज्ञानी पुरुष, दोन प्रकारचे बळ, दोन परिषदा, दोन प्रकारच्या इच्छा इत्यादी.
- तिक निपात – तीन प्रकारची दुष्कृत्ये, तीन प्रकारच्या वेदना इत्यादी.
- चतुक्क निपात – चार आर्यसत्ये, चार ज्ञान, चार श्रामण्य फल(सामञ्ञफल), चार समाधी, चार योग, चार आहार इत्यादी.
- पञ्चक निपात – पाच अंगांची समाधी, पाच उपादान स्कंध, पाच इंद्रिये, पाच निस्सारणीय धातू,पाच धर्म स्कंध, पाच विमुक्ती आयतन, इत्यादी.
- छक्क निपात – सहा अनुस्मृती, सहा आंतरिक आयतन, सहा अभिज्ञा इत्यादी.
- सत्तक निपात – सात सम्बोधीची अंगे, सात अनुशय, सात सद्धर्म, सात संज्ञा, सात सत्पुरुष धर्म इत्यादी.
- अट्ठक निपात – आठ अष्टांगिक मार्ग, आठ आरब्ध वस्तू, आठ अभिभू आयतन, आठ विमोक्ष इत्यादी.
- नवम निपात – नव तृष्णामूलक, नव सत्त्वावास इत्यादी.
- दसक निपात – तथागतांचे दस बल, दहा आर्य वास इत्यादी.
- एकादस निपात – निर्वाण प्राप्तीसाठी अकरा उपाय इत्यादी.
‘अंगुत्तर निकायामध्ये’ १.‘एतदग्ग’ (एकक निपात) २.‘कालाम सुत्त’ (तिक निपात) ३. ‘स्त्री संघाचा प्रवेश’ (अट्ठक निपात) अशा महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख आहे . त्यापैकी ‘एतदग्ग वग्गामध्ये’ (एकक निपातामध्ये ) भिक्खू , भिक्खुनी , उपासक परिषदा यांमधील विशेष व्यक्तींच्या नोंदी आलेल्या आहेत. त्यातील काही प्रमुख व्यक्तींची नावे १. ‘अञ्ञाकोण्डञ्ञ’ (ज्ञानात अग्र) २.‘सारीपुत्त’(प्रज्ञावानांत अग्र) ३. ‘महामौद्गल्यायन’ (ऋद्धीवानांत अग्र) ४. ‘महाकाश्यप’ (तपस्वी) ५. ‘महाप्रजापती’ , ‘खेमा’, ‘उत्पलवर्णा’ , ‘विशाखा’ ‘मिगारमाता’, ‘खुजुत्तरा’ इ.अशा व्यक्तींचा उल्लेख आला आहे. ‘कालाम सुत्त’ (तिक निपात ) या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी विवेकी संशय ,चिकित्सक वृत्ती ,स्वतंत्र बुद्धी यांचा गौरव केला आहे. मानवी निर्णयप्रक्रियेत केवळ परंपरा आणि प्रतिष्ठा न मानता प्रत्यक्ष अनुभव व कारणमीमांसा यांना महत्त्व देण्याची शिकवण देण्यात आली आहे.स्त्रियांचा संघात प्रवेश या ऐतिहासिक घटनेची नोंदही आढळते . अंगुत्तर निकायात तत्कालीन भारताच्या भौगोलिक आणि सामाजिक जीवनाचे संदर्भ आहेत. यात अंग, मगध, काशी (वाराणसी), कोसल, वज्जी (वृज्जी), मल्ल (मल्लदेश), चेति (चेदि), वंस (वत्स), कुरु, पंचाल, मच्छ, सुरसेन (शूरसेन), अस्सक (अश्मक), अवस्ती,गंधार, आणि कंबोज ही सोळा महाजनपदे , गंगा,सरयू (घागरा),यमुना, अचिरवती,मही पाच मोठ्या नद्यांचे वर्णन तसेच त्यासोबत भंडगाम, इच्छानंगल, वेनागपूर, नलकपान, वेरंजा, या गावांचे आणि केसपुत्त, कुसिनारा, यंकधा, कम्मासदम्म या गावांचा आणि श्रावस्ती, कौशांबी, मथुरा, पाटलिपुत्र, वरणा, राजगृह (राजगीर) आणि कपिलवस्तू अशा शहरांचे वर्णन आले आहे. सदाचाराच्या शिकवणी सोबतच तत्कालीन समाज, राजघराणी, अर्थव्यवस्था, व्यापारी मार्ग, राजमार्ग आणि व्यापार यांची माहिती विविध सुत्तांमधून मिळते. ‘अंगुतर निकाया’मध्ये नैतिक , ध्यानात्मक आणि व्यावहारिक शिकवणुकींचे संकलन केले आहे. संख्यात्मक रचना या निकायाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.बौद्ध धर्मातील आर्यसत्ये , इंद्रिये,बल,ध्यान,स्मृती,मार्गतत्त्व,समजून घेण्यासाठी महत्त्वाचा संदर्भग्रंथ म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते.या ग्रंथामधील ऐतिहासिक व भौगोलिक माहितीमुळे प्राचीन भारतीय समाजरचना समजून घेता येते.
संदर्भ :
१.उपाध्याय भरतसिंह, ‘पाली साहित्याचा इतिहास,’ हिंदी साहित्य सम्मेलन, प्रयाग, २०१३.
२. कश्यप जगदीश ((भिक्खू), ‘सुत्तपिटके, अङ्गुत्तरनिकायपालि, (एकक- दुक- तिकनिपात),’ नवनालंदा महाविहार, नालंदा, बिहार प्रथम संस्करण, १९६०, पुनर्मुद्रण २०१७.
समीक्षक : जाई परांजपे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.