ज्ञानाचे किंवा कर्माचे साधन म्हणजे इंद्रिय होय. सांख्य आणि योग दर्शनांमध्ये एकूण तेरा इंद्रिये स्वीकारली आहेत. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये ही दहा बाह्येंद्रिये आहेत; तर मन, अहंकार व बुद्धी ही तीन आंतरिंद्रिये आहेत. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये बाह्य जगातील पाच महाभूतांनी बनलेल्या वस्तूंशी संबंधित असतात, म्हणून त्यांना बाह्येंद्रिये म्हणतात. बुद्धी, अहंकार आणि मन ही बाह्य जगातील वस्तूंसोबतच अंतर्विश्वातील भावभावना तसेच सुख-दु:ख यांचेही ज्ञान करवून देतात, म्हणून त्यांना आंतरिंद्रिये म्हणतात.

ज्ञानेंद्रिये : जी इंद्रिये ज्ञान प्राप्त करून देतात, त्यांना ज्ञानेंद्रिये म्हटले जाते. श्रोत्र, त्वक्, चक्षु, रसना आणि घ्राण ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. ज्या इंद्रियांद्वारे ध्वनीचे (आवाजाचे) ज्ञान होते, त्याला ‘श्रोत्र’ इंद्रिय म्हणतात; ज्याद्वारे स्पर्शाचे ज्ञान होते, त्याला ‘त्वक्’ इंद्रिय म्हणतात; ज्याद्वारे रूपाचे ज्ञान होते, त्याला ‘चक्षु’ इंद्रिय म्हणतात; ज्याद्वारे चवीचे ज्ञान होते, त्याला ‘रसना’ इंद्रिय म्हणतात आणि ज्याद्वारे गंधाचे (वासाचे) ज्ञान होते, त्याला ‘घ्राण’ इंद्रिय असे म्हणतात. व्यावहारिक भाषेत या इंद्रियांचे कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे अवयव असे रूपांतर करता येते, तरीही दर्शनांमध्ये इंद्रिय आणि शरीराच्या या अवयवांमध्ये भिन्नता आहे. सांख्य आणि योग दर्शनांप्रमाणे इंद्रिय म्हणजे नाक, डोळे इत्यादी अवयव नव्हेत. अवयव हे स्थूल (भौतिक) शरीराचा भाग आहेत, परंतु इंद्रिये स्थूल शरीराचा भाग नसून त्या त्या ठिकाणी राहणाऱ्या व विषयांचे ज्ञान करवून देणाऱ्या सूक्ष्म शक्ती आहेत. उदाहरणार्थ, बहिऱ्या व्यक्तीलाही कान असतात, परंतु तिला ऐकू येत नाही. जर कान हा शरीराचा अवयव हेच इंद्रिय असते, तर तिला ऐकू आले असते. परंतु, आवाजाचे ज्ञान करवून देणारी सूक्ष्म शक्ती (श्रोत्र) क्रियाशील नसल्यामुळे कान असूनही ऐकू येत नाही. पक्षाघात झालेल्या व्यक्तीलाही त्वचा असते, परंतु तिला स्पर्शाचे ज्ञान होत नाही. कारण त्वचा असली तरीही स्पर्शाचे ज्ञान करवून देणारी सूक्ष्म शक्ती क्रियाशील नसते. याचाच अर्थ शरीराचा भाग असणारे अवयव आणि वस्तूंचे ज्ञान करवून देणाऱ्या इंद्रियरूपी सूक्ष्म शक्ती वेगळ्या मानल्या पाहिजेत. इंद्रियांच्या या शक्ती सूक्ष्म यासाठी मानल्या आहेत की, त्यांचे ज्ञान दुसऱ्या व्यक्तीला केवळ बाह्येंद्रियांद्वारे होऊ शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला स्पर्शाचे ज्ञान होते की नाही याचे आकलन दुसऱ्या व्यक्तीला केवळ पाहून किंवा स्पर्श करून होऊ शकत नाही, तर त्याचे अनुमान करावे लागते. त्यामुळे ‘इंद्रियाणि अतीन्द्रियाणि’ अर्थात् इंद्रियरूपी सूक्ष्म शक्तींचे ज्ञान इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही, हा एक सामान्य नियम मानला गेला आहे. इंद्रिय ही सूक्ष्म शरीराचा भाग आहेत.

कर्मेंद्रिये : ज्या इंद्रियांद्वारे कर्म केले जाते, त्या इंद्रियांना कर्मेंद्रिये असे म्हणतात. वाक्, पाणि, पाद, पायु आणि उपस्थ ही पाच कर्मेंद्रिये आहेत. ज्या इंद्रियाद्वारे बोलण्याचे कार्य केले जाते, त्याला ‘वाक्’ इंद्रिय म्हणतात; ज्याद्वारे वस्तू घेण्याचे कार्य (आदान) केले जाते, त्याला ‘पाणि’ इंद्रिय म्हणतात; ज्याद्वारे चालण्याचे कार्य (गमन) केले जाते, त्याला ‘पाद’ इंद्रिय म्हणतात; ज्याद्वारे मल-उत्सर्जनाचे कार्य केले जाते, त्याला ‘पायु’ म्हणतात आणि ज्याद्वारे समागमातील आनंदाचा अनुभव केला जातो, त्याला ‘उपस्थ’ इंद्रिय असे म्हणतात (वचन-आदान-विहरण-उत्सर्ग-आनन्दाश्च पञ्चानाम्| साङ्ख्यकारिका २८ ब). ज्ञानेंद्रियांप्रमाणेच कर्मेंद्रियेसुद्धा भौतिक शरीराचे अवयव नसून त्या त्या क्रिया संपादन करणाऱ्या सूक्ष्म शक्ती आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला पाय असले तरी तिला चालता येत नसेल तर चालण्याची क्रिया घडवून आणणारी सूक्ष्म इंद्रियरूपी शक्ती क्रियाशील नाही, असे म्हणता येते. कंठामध्ये स्वरयंत्र असले तरीही बोलता येत नसेल, तर ध्वनी उत्पन्न करणारी सूक्ष्म शक्ती क्रियाशील नाही असे म्हणता येते. त्यामुळे कर्मेंद्रियांच्या बाबतीतही अवयव वेगळे आणि इंद्रिये वेगळी असा विवेक करावा लागतो.

आंतरिंद्रिये : मन, अहंकार व बुद्धी ही तीन आंतरिंद्रिये आहेत. वस्तुत: अंत:करण एकच असले तरी ते वेगवेगळ्या क्रिया संपादन करत असल्यामुळे त्याची नावे वेगवेगळी आहेत. जेव्हा एखाद्या वस्तूचे ज्ञान प्राप्त होते तेव्हा ज्ञान होण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये ही तीन आंतरिंद्रिये ज्ञानेंद्रियांच्या सोबतीने कार्य करतात. उदाहरणार्थ, ज्ञानेंद्रिये जेव्हा एखाद्या वस्तूच्या संपर्कात येतात, तेव्हा ती ‘आलोचन’ करण्याचे कार्य करतात. आलोचन म्हणजे वस्तू जशी आहे, त्या रूपात तिचे ग्रहण करणे. उदाहरणार्थ, डोळे पुस्तकाच्या संपर्कात आले, तर ते त्या वस्तूचे ग्रहण करून ते ज्ञान मनाकडे सोपवितात. मन त्या वस्तूला ओळखण्याचे कार्य (संकल्प) करते – ‘हे पुस्तक आहे’. वस्तूला ओळखण्याचे काम इंद्रिये करू शकत नाहीत, कारण इंद्रियांमध्ये स्मृती नसते. पूर्वी पाहिलेल्या पुस्तकाविषयीच्या ज्ञानाच्या अंत:करणात असणाऱ्या संस्कारांना अनुसरून मन त्या त्या वस्तूला ओळखण्याचे कार्य करते. मनाद्वारे ‘हे पुस्तक आहे’ अशी वस्तूची ओळख पटविल्यानंतर अहंकार ‘हे पुस्तक माझ्यासाठी उपयोगी आहे की नाही’ याचा विचार (अभिमान) करतो. म्हणजे माझ्यासाठी एखादी वस्तू कशी आहे, याचा साकल्याने विचार करण्याचे काम अहंकार करतो. सर्वसाधारणपणे ‘अहंकार’ म्हणजे ‘मी श्रेष्ठ आहे अशी भावना’ असे समजले जाते. परंतु, सांख्य व योग दर्शनानुसार अहंकार हा अंत:करणाचा घटक असून तो स्वत:साठी काय चांगले व काय वाईट याचा विचार करण्याचे कार्य पार पाडतो. अहंकाराने या प्रकारे विचार केल्यानंतर बुद्धी त्या वस्तूविषयी निश्चयात्मक निर्णय घेण्याचे काम करते – ‘हे पुस्तक मी घ्यावे किंवा हे पुस्तक मी घेऊ नये.’ अशा प्रकारे ज्ञानाच्या प्रक्रियेत ज्ञानेंद्रिये—मन—अहंकार—बुद्धी सहभागी होतात. बुद्धिद्वारे मिळालेले हे ज्ञान पुरुष (चैतन्यरूप आत्मा) जाणतो.

काही वेळा (जसे, वर दिलेल्या पुस्तकाच्या उदाहरणात) हे चारही घटक क्रमाने कार्य करतात, तर कधी कधी हे चौघेही एकाच क्षणात कार्य करतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अंधारात अरण्यातून जात असताना अचानक आकाशात वीज चमकते. विजेच्या प्रकाशात समोर वाघ उभा असल्याचे त्या व्यक्तीला दिसते. इंद्रियांद्वारे होणारे त्याचे ज्ञान होणे, मनाद्वारे ‘हा वाघ आहे’ अशी ओळख पटणे, अहंकाराद्वारे ‘हा माझ्यासाठी घातक आहे’ अशी जाणीव होणे व बुद्धिद्वारे ‘मी येथून पळून जावे’ असा निश्चय करणे या सर्व क्रिया एकाच क्षणात घडतात.

बुद्धीचे आठ विविध भाव आहेत – सत्त्व गुणाच्या आधिक्यामुळे धर्म (पुण्य), ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य (अष्टसिद्धी) हे भाव प्रकट होतात; तर तमोगुणाच्या आधिक्यामुळे अधर्म (पाप), अज्ञान, राग (आसक्ती) आणि अनैश्वर्य (ऐश्वर्याचा अभाव) हे भाव प्रकट होतात.

ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये केवळ वर्तमानकाळातील वस्तूशी संबंधित होऊ शकतात; परंतु, अंत:करण भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीनही काळातील वस्तूचे ज्ञान करवून देऊ शकते (साङ्ख्यकारिका ३३). ज्ञानेंद्रिये केवळ ठराविक वस्तूचे ज्ञान करवून देऊ शकतात (उदाहरणार्थ, चक्षु रूपाचे, त्वक् स्पर्शाचे); परंतु अंत:करण सर्व विषयांचे ज्ञान करवून देऊ शकते. अंत:करणाला वस्तूचे ज्ञान केवळ बाह्य इंद्रियांच्या माध्यमातूनच होऊ शकते म्हणून बाह्य इंद्रियांना ‘द्वार’ (दरवाजा) आणि अंत:करणाला ‘द्वारि’ (दरवाजातून प्रवेश करणारे) म्हटले जाते (साङ्ख्यकारिका ३५). जरी सांख्य-योग दर्शनांमध्ये इंद्रियांना ज्ञानाचे अथवा क्रियेचे करण (साधन) म्हटले आहे, तरी त्यांना संचालित करणारा कर्ता कोणीही नाही. इंद्रिये विषयाच्या सान्निध्यात आल्यावर कोणाच्याही निर्देशाशिवाय स्वत:च आपापली क्रिया संपादन करतात (साङ्ख्यकारिका ३१). ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मन या अकरा इंद्रियांची उत्पत्ती सत्त्वगुणाचे आधिक्य असलेल्या ‘वैकृत’ नावाच्या अहंकारापासून होते.

वर सांगितल्याप्रमाणे इंद्रिये ही स्थूल शरीराचे अवयव नाहीत, त्यामुळे त्यांचा समावेश सूक्ष्म शरीरात होतो. जीवाचे स्थूल (भौतिक) शरीर प्रत्येक जन्मात वेगळे असते, परंतु सर्व जन्मांमध्ये सूक्ष्म शरीर एकच असते. अर्थातच जीवाच्या सर्व जन्मांमधील इंद्रियरूपी सूक्ष्म शक्तीही त्याच असतात. परंतु, ज्या ज्या जन्मात ज्याज्या प्रकारचे स्थूल शरीर प्राप्त होईल, त्यानुसार इंद्रियांच्या शक्ती कमी अधिक प्रमाणात व्यक्त होतात. सर्व जीवांमध्ये असणाऱ्या इंद्रियांच्या शक्ती समान व संपूर्ण आहेत, परंतु जीव आपल्या इंद्रियांच्या शक्तीचा१००% उपयोग करत नाही. इंद्रियांच्या सूक्ष्म शक्तीचा उपयोग किती करता येऊ शकतो, हे ती ज्या भौतिक शरीरात राहतात, त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, मनुष्यरूपी भौतिक शरीर श्रोत्र इंद्रियाला थोडासा वाव देते, त्यामुळे मनुष्याची ऐकण्याची क्षमता सीमित असते, परंतु त्याच जीवाने जर हत्तीच्या भौतिक शरीरात जन्म घेतला, तर ते शरीर श्रोत्र इंद्रियाला आपले कार्य करण्यासाठी जास्त वाव देते. गेंड्याचे शरीर स्पर्शाचे ज्ञान करवून देणाऱ्या त्वक् इंद्रियाला जास्त वाव देत नाही, परंतु त्याच जीवाच्या सूक्ष्म शरीराने जर सापाच्या स्थूल शरीरात जन्म घेतला, तर ते शरीर त्वक् इंद्रियाला जास्त वाव देते. सापाला दूरवरच्या हालचालींचेही स्पर्शाद्वारे ज्ञान होते. अशाप्रकारे ज्या प्रकारचे स्थूल शरीर मिळते, त्यानुसार इंद्रियांच्या शक्ती कमी अधिक प्रमाणात क्रियाशील होतात, परंतु त्याही एका ठराविक प्रमाणापर्यंत होतात. योगदर्शनानुसार इंद्रियांच्या शक्तीचा १००% उपयोग करण्यासाठी त्यांचे ज्ञान होणे आवश्यक आहे व ते ज्ञान संयमाद्वारे (धारणा, ध्यान आणि समाधी) होऊ शकते. जेव्हा संयमाद्वारे योगी इंद्रियांच्या संपूर्ण शक्तीचा उपयोग करू शकतो, तेव्हा त्यालाच इंद्रियांच्या सिद्धी असे म्हणतात.

पहा : अष्टसिद्धी.

संदर्भ : गौड ज्वालाप्रसाद, साङ्ख्यतत्त्वकौमुदी, चौखम्बा सुरभारती प्रकाशन, वाराणसी, २००१.

            समीक्षक : कला आचार्य