मॉस, सिंथिया (Moss, Cynthia) : (२४ जुलै १९४०). अमेरिकन नीतिशास्त्रज्ञ, संवर्धनवादी, वन्यजीव संशोधक आणि लेखिका. त्यांचा अंबोसेलीच्या आफ्रिकन हत्तींच्या लोकसंख्याशास्त्र, वर्तन, सामाजिक संघटन आणि लोकसंख्या गतिशीलतेवर अभ्यास केंद्रित आहेत.
मॉस यांचा जन्म न्यूयॉर्क राज्यातील ओसिनिंग या गावी झाला. त्यांनी तत्त्वज्ञानातील पदवी (१९६२) प्राप्त केल्यावर न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयात नोकरी केली. तेथेच त्यांना हत्तींबद्दलचे कुतूहल निर्माण झाले. प्राणिसंग्रहालयानंतर त्यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये ठळक-वैशिष्ट्य संपादक (फीचर एडीटर) म्हणून काम केले. त्यांनी हत्तीबद्दलच्या कुतूहलामुळे नोकरीचा राजीनामा देऊन आफ्रिकेच्या दिशेने प्रस्थान केले. जगविख्यात हत्ती संशोधक आयेन डग्लस हॅमिल्टन यांसह अभ्यासासाठी त्यांच्या तळावर त्या काही राहिल्यात. हॅमिल्टन फोटोंच्या साहाय्याने हत्तींच्या लकबींचा अभ्यास करण्यात वाकबगार होते. मॉस यांनी हत्तींच्या वागणूकीतील टिपलेले अनेक बारकावे हॅमिल्टन यांच्या नजरेतून सुटले होते. त्यामुळे हॅमिल्टन यांनी त्यांना साहाय्यक म्हणून टांझानियात काम करण्याचे निमंत्रण दिले. हत्तीच्या मागावर असणाऱ्या मॉस यांचे काम केनियात संपले. वर्ष अखेरीस त्यांनी आपल्या कामाचा अहवाल हॅमिल्टन यांना सादर करून निरोप घेतला. तरीही त्यांचे टांझानियातील अंबोसेली राष्ट्रीय उद्यानातील हत्ती संरक्षण आणि संवर्धनाचे काम चालूच राहिले. त्यासाठी त्यांनी आपले लेखन कार्य चौदा वर्षे चालू ठेवले. त्यांनी स्थापन केलेल्या आफ्रिकन वाइल्ड लाईफ फाउंडेशनच्या मुखपत्राच्या संपादनाचे कामही त्या आनंदाने करीत. टांझानियाच्या सीमेला लागून असलेल्या अंबोसेली राष्ट्रीय उद्यानातील त्यांचे वास्तव्य त्यांच्या आयुष्याला वळण देणारे ठरले. त्या उद्यानाचा विस्तार २४५ चौ.किमी. एवढा असून ते माउंट किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च पर्वत शिखराच्या पायथ्याशी आहे. इथे चोरटे शिकारी सहसा मसाई जमातीमुळे फिरकत नाहीत. या परिसरातील हत्तींच्या सांख्यिकी अभ्यासातून आणि त्याला सूक्ष्मनिरीक्षणाची जोड देऊन त्यांनी हत्तींच्या प्रजानन चक्राची बरीच माहिती गोळा केली उदा., दोन पिल्लांच्या जन्मामधील अंतर, हत्तींचे वयात येणे, वयात येण्याच्या काळात त्यांच्या वर्तणुकीत घडणारे बदल इत्यादी. त्यांनी गोळा केलेल्या माहितीचा इतर प्राणी अभ्यासकांनाही उपयोग झाला.
मॉस यांनी केलेल्या नोंदीनुसार जंगलात जागोजागी आढळणाऱ्या कवट्यांवरून हत्तींच्या जबडयांचा १९६६ मध्ये करण्यात आलेला अभ्यास योग्य पद्धतीचा नव्हता. हत्तींचे वय मृत्यूसमयी नेमके किती होते, कवटी हत्तीच्या नराची की मादीची होती ही माहिती उपलब्ध नव्हती. त्यांच्या अंबोसेलीच्या वास्तव्यात त्यांच्या निरीक्षणाच्या साहाय्याने या विषयीच्या अभ्यासात पद्धतशीर नोंदी केल्या. हत्तीचे वय, लिंग, सुळ्यांची लांबी, मृत्यूसमयीचे वय यासंबंधीच्या नोंदी त्यांनी केल्या. हत्तीसंबंधी ज्या पूर्वापार समजुती होत्या, त्यानुसार हत्ती आयुष्यभर दातांचे चार संच वापरतात, सतराव्या वर्षी चौथा संच पडतो, या दाढा पडल्या की हत्ती गवत, झाडांच्या फांद्या वगैरे गोष्टी चावू शकत नाहीत, त्यामुळे नंतर काही काळातच त्यांचे निधन होते. परंतु त्या त्यांच्या विद्यार्थ्यांसह आणि काही स्वयंसेवकांमार्फत अजूनही संशोधन करीत आहेत. पाळीव हत्तींना कोवळी पाने आणि कोवळे गवत खायला दिले तर ते अधिक जगतात, परंतु जंगलात हे शक्य नसते. या संदर्भात त्या भारतीय हत्तींच्या तसेच मलेशिया, इंडोनेशियातील हत्ती संशोधकांच्या संपर्कात आहेत. १९७०—९० या काळात पडलेल्या दुष्काळात, विशेषत: १९७६च्या दुष्काळात निरीक्षणास आलेली बाब म्हणजे जेव्हा अन्न-पाण्याची वानवा असते त्यावेळी हत्ती संतती नियमन करतात. दक्षिण आफ्रिकेत हत्तींची संख्या मर्यादेत ठेवण्यासाठी हत्तींची कत्तल केली जाते. त्याचे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे ठरते.
मॉस या केन्याच्या वनविभागाच्या संचालिका जॉईस पूल आणि ससेक्स विद्यापीठात कार्यरत कारेन मॅकाँब यांच्यासह मिळून हत्तींच्या भाषेचे कोडे अर्थात हत्तींची बोली समजण्याचा प्रयत्न करीत आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत हत्ती वेगवेगळे आवाज काढतात. हत्तींचे वय, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचे कुटुंब नियोजन या बाबतीतले त्यांचे कार्य हत्ती संशोधक आधी अभ्यासतात आणि मग आपले संशोधन सुरू करतात.
मॉस यांना अंबोसेलीमधील हत्तींच्या अभ्यासासाठी केलेल्या समर्पणाबद्दल पुढीलप्रमाणे अनेक पुरस्कार मिळाले : माजी विद्यार्थी अचिव्हमेंटसाठी स्मिथ कॉलेज पदक (१९८५), मॅकआर्थर जीनियस फेलोशिप (२००१), फ्रेंड्स ऑफ द नॅशनल झू आणि ऑडुबॉन सोसायटीकडून संवर्धन पुरस्कार. याव्यतिरिक्त, त्यांनी हत्तींबद्दल चार पुरस्कार विजेते माहितीपट बनवले आहेत. ज्यात अॅन अपोलॉजी टू एलिफंट्स (२०१३) – एचबीओ, इको: अॅन एलिफंट टू रिमेंबर (२०१०) – पीबीएस, नेचर, इको अँड अदर एलिफंट्स (२००८) – बीबीसी, डेव्हिड अॅटनबरो आणि इको ऑफ द एलिफंट्स (२००५) – पीबीएस, नेचर यांचा समावेश आहे. त्यांना येल विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट सुद्धा मिळाली आहे. (२०१९).
मॉस या अंबोसेली एलिफंट रिसर्च प्रकल्पाच्या संचालिका आणि अंबोसेली ट्रस्ट फॉर एलिफंट्स (एटीई) या कार्यक्रमाच्या संचालिका आणि विश्वस्त आहेत.
कळीचे शब्द : #हत्ती #संवर्धन #आफ्रिकन हत्ती
संदर्भ :
- Buzio, Tony, Passion for Elephant : The real life adventure of the field scientist Cyntheia Moss, Penguine 1997.
- Pringal, Lorence, Elephant women explores world of elephants, 1999.
समीक्षक : अ. पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.