षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी धौती क्रियेचा एक प्रकार. धौती म्हणजे धुणे, स्वच्छ करणे. धौतीचे अंतर्धौती, दंतधौती, हृदधौती आणि मूलशोधन किंवा गणेश क्रिया इ. प्रकार आहेत. वमनधौती हा हृद्धौतीचा एक प्रकार आहे. येथे ‘हृद्’ हा शब्द हृदयाशी संबंधित नसून पोट किंवा जठराशी संबंधित आहे. जठरशुद्धीकरिता वमनधौतीचा अंतर्भाव होतो. वमन म्हणजे उलटी, वांती किंवा ओकारी होय. पोटातील अयोग्य आणि अहितकारी पदार्थ उलटीद्वारे बाहेर फेकले जाते. ही एक नैसर्गिक संरक्षक प्रक्रिया आहे. वमनधौती या शुद्धिक्रियेत पोट भरेपर्यंत पाणी पिऊन ते उलटीद्वारे बाहेर काढले जाते.
वमनधौती रीती : वमनधौतीत कोमट (शरीराच्या तापमानाइतक्या गरम) व खारट पाण्याचा वापर केला जातो. खारट पाण्याचा परासरण दाब (Osmotic Pressure) सामान्य पाण्यापेक्षा जास्त असल्याने ते सहजपणे रक्तवाहिन्या व आतील त्वचेमध्ये प्रवेश करत नाही. साधारणत: एक लीटर पाण्यात एक मोठा चमचा मीठ हे प्रमाण वापरले जाते. आरामशीर उभे राहून आकंठ पाणी प्यावे. उलटी येण्याची भावना निर्माण झाल्यास पाणी पिणे थांबवावे. नंतर ओणवे होऊन उजव्या हाताची तर्जनी, मध्यमा व अनामिका अशी तीन बोटे जुळवून, घशात घालून जिभेच्या मुळावर दोन-तीन वेळा हलकेच दाबावे. त्यामुळे पाणी आपोआप बाहेर येते. त्यावेळी हात बाहेर काढावा. असे पुन:पुन्हा करावे. पाणी बाहेर पडताना नको असलेला सर्व कफ व पित्त बाहेर टाकले जाते. प्यायलेले पाणी बाहेर पडेपर्यंत वमन करावे आणि नंतर ही क्रिया थांबवावी.
अतिरिक्त रक्तदाब, हृदयरोगी, अशक्त व्यक्ती, क्षयरोगी इत्यादींनी वमन करू नये. डोके जड होणे, घाम येणे, चक्कर येणे इ. लक्षणे दिसल्यास क्रिया थांबवावी आणि विश्रांती घ्यावी. वमनानंतर हलका आहार घ्यावा. वमन सकाळी उपाशी पोटी करणे इष्ट असते. क्रिया करण्यापूर्वी बोटांची नखे कापून हात स्वच्छ करून घ्यावेत. ही क्रिया योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावी.
वमनधौतीचे लाभ : या शुद्धिक्रियेमुळे पित्त व कफदोष दूर होतात. डोकेदुखी, आम्लता (ॲसिडिटी), अस्थमा या विकारांवर उपयोग होतो. त्वचेचे विकार, मुरमे, गळवे कमी होतात. जठराग्नी प्रदीप्त होतो. भूक चांगली लागते. पचनशक्ती सुधारते. मलावरोध कमी होतो. उदरवायु, अपचन इत्यादींवर उपयुक्त ठरते. प्रतिपुरस्सरणी क्रियेमुळे (अँटी पेरिस्टॅल्टिक मुव्हमेंट) अन्ननलिकेचे स्नायू दृढ होतात व त्यांची कार्यक्षमता वाढते.
संदर्भ :
- देवकुळे, व. ग., (मराठी अनुवाद) ‘स्वात्माराम कृत हठप्रदीपिका’, मे शारदा साहित्य, पुणे, २०१७
- निंबाळकर, सदाशिव प्र., ‘यौगिक क्रिया- आरोग्याचा पाया’, योग विद्या निकेतन, मुंबई, २००३
- ब्रह्मलीन राष्ट्रगुरू श्री १००८ स्वामीजी महाराज, ‘घेरंडसंहिता (भाषानुवाद सहिता)’, श्री पीतांबरा पीठ, दतिया (मध्य प्रदेश), २००३
- व्यवहारे, श्रीकृष्ण, ‘आनंदयोग’, घंटाळी मित्र मंडळ प्रकाशन, ठाणे, २०२१
समीक्षक : प्रदीप पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.