महर्षी पतंजलींनी योगदर्शनातील समाधिपादामध्ये (योगसूत्र १.३०) योगाभ्यासात येणारी नऊ विघ्ने सांगितली आहेत. या विघ्नांना त्यांनी अंतराय अशी संज्ञा वापरली आहे. हे अंतराय चित्ताच्या एकाग्रतेमध्ये अडथळे (विक्षेप) उत्पन्न करतात.

व्याधी (शारीरिक रोग), स्त्यान (कोणतेही कार्य करण्याची इच्छा न होणे), संशय (योगसाधनेच्या उपयुक्ततेविषयी श्रद्धा नसणे), प्रमाद (योगसाधना करण्याची प्रवृत्ती निर्माण न होणे), आलस्य (चित्त आणि शरीराची जडता), अविरती (विषयसुखाची अभिलाषा), भ्रान्तिदर्शन (एखाद्या वस्तूचे विपरीत ज्ञान होणे), अलब्धभूमिकत्व (योगातील लक्ष्याची प्राप्ती न होणे) व अनवस्थित्व (योगातील भूमिकेमध्ये स्थिर न होणे) अशी साधनेतील नऊ विघ्ने अर्थात अंतराय आहेत (योगसूत्र १.३०).

या अंतरायांमुळे निर्माण होणारे जे अन्य अडथळे आहेत त्यांना पतंजलींनी ‘विक्षेपसहभुव:’ अशी संज्ञा योजली आहे. दु:ख, दौर्मनस्य, अङ्गमेजयता, श्वास व प्रश्वास हे दोष योगसाधनेला उपद्रवकारक ठरतात (योगसूत्र १.३१).

(१) दु:ख : ज्याद्वारे चित्तात उद्वेग निर्माण होतो त्याला दु:ख असे म्हणतात. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक असे दु:खाचे तीन प्रकार आहेत. रोगांमुळे निर्माण होणारे शारीरिक तसेच मानसिक दु:ख यांना आध्यात्मिक दु:ख असे म्हणतात. वाघ, सर्प इत्यादी प्राणिमात्रांपासून निर्माण होणाऱ्या पीडारूपी दु:खाला आधिभौतिक दु:ख असे म्हणतात. पंचमहाभूते, ग्रहपीडा इत्यादींपासून निर्माण होणाऱ्या दु:खाला आधिदैविक दु:ख असे म्हणतात. दु:खामुळे चित्त त्रस्त होते. त्रस्त झालेले चित्त सदैव त्यातून मुक्त होण्याचाच विचार करते व अशाप्रकारे योगाभ्यापासून चित्त विचलित होते.

(२) दौर्मनस्य : इच्छा पूर्ण झाली नाही तर चित्तामध्ये क्षोभ उत्पन्न होतो. कोणत्याही बाह्य किंवा आंतरिक कारणामुळे चित्तामध्ये उत्पन्न होणारा क्षोभ किंवा चंचलता म्हणजे दौर्मनस्य होय.

(३) अङ्गमेजयत्व : शरीरातील अवयवांमध्ये निर्माण होणारा कंप किंवा थरकाप म्हणजे अङ्गमेजयत्व होय. अवयवांच्या कंपामुळे साधकाला आसनामध्ये स्थिरता साधण्यात तसेच चित्त एकाग्र करण्यात बाधा उत्पन्न होते म्हणून योगाभ्यासातील अङ्गमेजय हे विघ्नच आहे.

(४) श्वास : वस्तुत: श्वास ही नैसर्गिक आणि सहजसाध्य क्रिया आहे. प्रत्येक जीव श्वास घेत असतो. ही क्रिया नैसर्गिकरीत्या होत असेल तर श्वासाची  योगाभ्यासातील विघ्नांमध्ये गणना होणार नाही. परंतु, प्राणायामाची साधना करताना इच्छा नसतानाही प्राण जर बाह्य वायूला शरीरात घेत असेल, तर अशा प्रकारे अनियंत्रित रीतीने होणारी श्वासक्रिया समाधीचे अंग असणाऱ्या प्राणायामाच्या रेचकक्रियेत विघ्न उत्पन्न करते. म्हणूनच रेचकक्रियाविरोधी असणारा श्वास समाधिलाभासाठी प्रतिकूल आहे.

(५) प्रश्वास : श्वासाप्रमाणे प्रश्वास अर्थात उच्छ्वास देखील जीवांची नैसर्गिक क्रिया आहे. जर प्रश्वास अनियंत्रित झाला म्हणजे इच्छा नसतानाही नाकपुडीद्वारे वायू बाहेर येत असेल तर अनिच्छेने बाहेर येणारा प्रश्वास पूरकविरोधी होतो. म्हणून या प्रकारचा अनियंत्रित प्रश्वास हा देखील एक अडथळा आहे.

ईश्वराची समर्पित भावाने भक्ती केल्यास अंतरायांचा नाश होतो व त्याबरोबरच दु:ख, दौर्मनस्य, अङ्गमेजयता, श्वास व प्रश्वास हे उपद्रवही नष्ट होतात असे पतंजलींनी सांगितले आहे (योगसूत्र १.३२).

पहा : अंतराय, दु:खत्रय.

                                                                                                        समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर