राग म्हणजे आसक्ती तर वैराग्य म्हणजे आसक्तीचा अभाव. वैराग्य भावरूप (अस्तित्वरूप) नाही तर ते अभावरूप आहे. सांख्यदर्शनानुसार बुद्धीमध्ये सत्त्वगुणाचा उदय झाला असता जे चार भाव उत्पन्न होतात, त्यापैकी वैराग्य एक आहे (साङ्ख्यकारिका, २३). चित्तामध्ये वैराग्याची भावना यत्नपूर्वक उत्पन्न केली जाऊ शकत नाही; तर भौतिक आणि पारलौकिक विषयांमध्ये दोष दिसून आल्यावर मनात अनायास वैराग्य उदयास येते. वैराग्य म्हणजे केवळ शरीराने एखाद्या विषयापासून दूर राहणे नव्हे, तर मनामध्ये त्याविषयीची आसक्ती नसणे.

योगसूत्रांमध्ये (१.१५, १.१६) दोन प्रकारच्या वैराग्याचे वर्णन केले आहे – अपरवैराग्य आणि परवैराग्य. अपरवैराग्य म्हणजे योगसाधनेच्या प्रारंभिक स्थितीमध्ये असणारे वैराग्य होय. दृष्ट म्हणजे लौकिक जगतातील अन्नपान, स्त्रीसुख इत्यादी भौतिक विषयांप्रती आणि आनुश्राविक म्हणजे अलौकिक जगतातील स्वर्ग, अप्सरा  इत्यादी दिव्य विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होणे म्हणजे अपरवैराग्य होय.

वाचस्पती मिश्र आणि विज्ञानभिक्षु या व्याख्याकारांनी अपरवैराग्याच्या चार अवस्था वर्णिलेल्या आहेत – यतमान, व्यतिरेक, एकेन्द्रिय आणि वशीकार. योगी क्रमाने या चार अवस्थांना पार करतो.

(१) यतमान : सामान्यत: राग, लोभ इत्यादी चित्तातील विकारांमुळे इंद्रिये नेहमी विविध विषयांकडे आकृष्ट होत असतात. ती आकृष्ट होऊ नये या दृष्टीने केला जाणाऱ्या प्रयत्नांचा आरंभ म्हणजे यतमान अवस्था होय. या अवस्थेमध्ये संपूर्ण वैराग्य साध्य होत नाही, परंतु वैराग्यभावना उत्पन्न होण्याच्या दृष्टीने योग्याची वाटचाल सुरू होते.

(२) व्यतिरेक : विषयांप्रती असणारी आसक्ती नष्ट होण्याच्या उद्देशाने सतत प्रयत्न केल्यावर काही वस्तू अथवा विषयांच्या बाबतीतील राग, लोभ इत्यादी दोष नष्ट होतात; परंतु अन्य काही वस्तूंप्रती योग्याच्या मनात राग, लोभ अजूनही शिल्लक असतो. कोणत्या विषयासंबंधी दोष नष्ट झाले आहेत व कोणत्या विषयासंबंधी अजून शिल्लक आहेत, याचे तटस्थ भावनेने परीक्षण करणे ही वैराग्याची व्यतिरेक अवस्था होय.

(३) एकेन्द्रिय : बाह्य इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त झाल्यावर ती इंद्रिये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषयांप्रती आसक्त होत नाहीत. परंतु, पूर्वकाळातील अनुभवांमुळे चित्तामध्ये सुप्त रूपाने राहिलेले ते रागादि दोष अजूनही संस्कार रूपाने विद्यमान असतात व पुन्हा जागृत होण्यासाठी उत्सुक असतात. मनाद्वारे त्या सुप्त संस्कारांचे व्यवस्थापन करणे व पुन्हा त्यांना जागृत होऊ न देणे ही वैराग्याची अवस्था म्हणजे एकेन्द्रिय होय. मनरूपी एकाच इंद्रियाद्वारे रागदोषावर नियंत्रण केल्यामुळे या अवस्थेला ‘एकेन्द्रिय’ अशी संज्ञा आहे.

(४) वशीकार : ज्यावेळेस बाह्य इंद्रियेही विषयांपासून विरक्त होतात, चित्तातील सुप्त संस्कारही जागृत होऊ इच्छित नाहीत आणि योग्याचे चित्त पूर्णपणे वैराग्यभावनेने युक्त असून त्याच्या नियंत्रणातही असते, त्या अवस्थेला वशीकारनामक वैराग्य असे म्हटले जाते.

वरील चार अवस्थांमध्ये वशीकारसंज्ञक वैराग्य हेच सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे पतंजली ऋषींनी सूत्रामध्ये फक्त वशीकार वैराग्याचाच नामोल्लेख केलेला आहे. कारण अन्य तीन प्राथमिक अवस्थाही त्यात गृहीतच आहेत.

योग्याच्या चित्तामध्ये जे वैराग्य उत्पन्न होते ते परवैराग्य होय. समाधीच्या अवस्थेमध्ये सत्त्वगुण प्रधान असणाऱ्या चित्तवृत्तींद्वारे योगी स्थूल विषय, सूक्ष्म विषय, इंद्रिय व चैतन्यस्वरूप पुरुष यांचे क्रमाने ज्ञान प्राप्त करून घेतो. परंतु, सांख्य-योग दर्शनांमध्ये सर्वोत्कृष्ट मानलेले पुरुषज्ञान किंवा आत्मज्ञान हे चित्ताद्वारेच प्राप्त होते. जोपर्यंत चित्ताचे वृत्तिरूप अस्तित्व आहे, तोपर्यंत परमयोग किंवा कैवल्य सिद्ध होऊ शकत नाही; त्यामुळे योगी ‘स्व’चे ज्ञान करवून देणाऱ्या चित्तापासूनही पूर्णपणे विरक्त होतो, यास परवैराग्य असे म्हणतात. हे वैराग्य जाणीवेच्या रूपात असल्याने ज्ञानस्वरूपच आहे. ज्ञानाची पराकाष्ठा म्हणजे परवैराग्य होय. कारण यानंतर चित्तवृत्ती पूर्णपणे निरुद्ध होतात व कोणतेच ज्ञान संभवत नाही म्हणून या अवस्थेला ‘असम्प्रज्ञात’ असे म्हणतात. या वैराग्याच्या उदयाने सर्व क्लेश नष्ट होतात, योगी जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो आणि लवकरच त्याला कैवल्य अवस्था प्राप्त होते.

वाचस्पति मिश्र यांच्या मताप्रमाणे योगसूत्रातील (१.२१) ‘संवेग’ हा शब्द वैराग्याचा सूचक आहे. सर्व साधकांच्या चित्तांत उत्पन्न होणारी वैराग्याची भावना ही एकसारखी नसते, तर त्यामध्ये न्यूनाधिक्य दिसून येते; म्हणून वैराग्याचे मृदू, मध्य आणि तीव्र असे तीन भेद होतात. ज्याच्या मनात तीव्र वैराग्य असेल, त्याला समाधीदेखील तेवढीच लवकर प्राप्त होते.

श्रीमद्भगवद्गीता (६.३५) व योगसूत्रे  यांमध्ये (१.१२) चित्ताच्या सतत उत्पन्न होणाऱ्या वृत्तींना निरुद्ध करण्याचे दोन उपाय सांगितले आहेत – अभ्यास आणि वैराग्य. ज्याप्रमाणे नदीला बांध घालून तिचे पाणी योग्य दिशेला वळविता येऊ शकते, त्याचप्रमाणे अनर्थकारी विषयांकडे जाणाऱ्या चित्ताला वैराग्याद्वारे नियंत्रित केले जाते व अभ्यासाद्वारे योग्य मार्गाकडे नेले जाते. ज्ञानसहित वैराग्य हेच कैवल्य उत्पन्न करते, परंतु केवळ ज्ञानविरहित वैराग्यामुळे साधकाचे चित्त प्रकृतिलीन अवस्थेमध्ये राहते व साधक काही काळाने पुन्हा जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकतो असे सांख्यदर्शन मानते. वेदान्तानुसार वैराग्य हे साधन-चतुष्टयातील एक महत्त्वाचे अंग असून त्याशिवाय आत्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. मार्कंडेय पुराणानुसार (३६.४) वैराग्याद्वारे ज्ञान उत्पन्न होते व ते ज्ञान वैराग्याला अधिक दृढ बनवते. योगवासिष्ठ  ग्रंथामधील प्रथम प्रकरणात भगवान श्रीराम कशा प्रकारे सांसारिक सुखांपासून विरक्त होऊन आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी उत्सुक होतात, या निवेदनाच्या अनुषंगाने वैराग्याचे महत्त्व वर्णिलेले आहे. पुराणांमध्ये व्यासमुनींचे पुत्र शुक, तर रामायणामध्ये लक्ष्मण हे पूर्ण वैराग्याचे प्रतीक मानले जातात. संस्कृतमधील प्रसिद्ध कवी, व्याकरणाचार्य आणि योगी भर्तृहरी यांनी वैराग्याचे महत्त्व विशद करणारी वैराग्यशतकम्  ही १०० श्लोकांची काव्यरचना केली आहे. जैन आगम ग्रंथांमध्ये वैराग्याच्या वृद्धीसाठी बारा अनुप्रेक्षांचे / वैराग्यभावनांचे कथन आहे. तदनुसार पुढील बारा गोष्टींचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने साधक भोगांपासून विरक्त होऊन साम्यभाव प्राप्त करतो –अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुची, आस्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधिदुर्लभ आणि धर्मस्वाख्यातत्व.

जीवनात तीव्र दु:खाचा अनुभव आल्यावर व्यक्तीच्या मनात काही काळापुरते वैराग्य उत्पन्न होते, परंतु ते तात्कालिक आणि नैमित्तिक असल्यामुळे योगसाधनेमध्ये त्याला महत्त्व नाही. चित्तामध्ये वैराग्याची भावना दृढ झाल्यावरच सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते व चित्तवृत्ती निरोधाद्वारे कैवल्य अवस्था प्राप्त होते, असे योगदर्शन मानते.

पहा : चित्त.

संदर्भ :

  • Pai, G. K., Yoga Doctrines in Mahāpurāṇa-s, Pune, 2007.
  • Rukmani, T. S., Yogavārttika of Vijñānabhikṣu, New Delhi, 2007.
  • आगाशे, काशिनाथशास्त्री, संपा. पातञ्जलयोगसूत्राणि, पुणे, १९०४.
  • कर्णाटक, विमला, अनु. साङ्ख्यकारिका, वाराणसी, १९८४.
  • वर्णी, जिनेन्द्र, जैनेन्द्र सिद्धान्त कोश, नवी दिल्ली, २००३.

                                                                                                                                               समीक्षक : कला आचार्य