षट्कर्म शुद्धिक्रियांपैकी धौती क्रियेचा एक प्रकार. धौती म्हणजे धुणे, स्वच्छ करणे. धौतीचे अंतर्धौती, दंतधौती, हृदधौती आणि मूलशोधन किंवा गणेश क्रिया इ. प्रकार आहेत. वस्त्रधौती हा हृद्धौतीचा एक प्रकार आहे. येथे ‘हृद्’ हा शब्द हृदयाशी संबंधित नसून जठराशी संबंधित आहे. जठरशुद्धीकरिता वमनधौती, गजकरणी, व्याघ्रकरणी, दण्डधौती आणि वस्त्रधौती या क्रियांचा समावेश होतो. यातील वस्त्रधौती या प्रकारात वस्त्राच्या साहाय्याने अन्ननलिका व जठर स्वच्छ केले जाते म्हणून त्यास ‘वस्त्रधौती’ म्हणतात. वस्त्राला ‘वासस्’ असेही म्हणतात, म्हणून यास ‘वासोधौती’ असेही म्हणतात. वस्त्राच्या शोषण करण्याच्या गुणधर्मामुळे वमन किंवा गजकरणी या क्रियांपेक्षा या धौती प्रकारात अधिक चिकट व घाण स्त्राव वस्त्रासहित बाहेर पडून जठर उत्तम प्रकारे शुद्ध होते. 

वस्त्रधौती रीती : वस्त्रधौतीसाठी मीठयुक्त कोमट पाणी, पसरट भांडे तसेच ७ ते ८ सेंमी. (४ बोटे) रुंद आणि ६ ते ७ मीटर (१५ हात) लांब अशी मलमलच्या कापडाची टोके व कडा शिवून घेतलेली वस्त्रपट्टी या गोष्टी आवश्यक असतात. वस्त्राची पट्टी निर्जंतुक केलेली असावी. पसरट भांड्यात कोमट पाण्यात मीठ टाकून त्यामध्ये वस्त्राची गुंडाळी भिजवावी. वस्त्राचे एक टोक तोंडात जिभेच्या मुळाशी ठेवून वस्त्र गिळण्याची कृती करावी. वस्त्र गिळताना उलटी होत आहे असे वाटल्यास पाण्याचे एक-दोन घोट घ्यावेत. उलटीची भावना कमी झाल्यावर वस्त्र गिळण्याचे काम पुन्हा चालू ठेवावे. संपूर्ण वस्त्र न गिळता चार इंच लांबीचा तुकडा दातात पकडून बाहेरच ठेवावा. त्यानंतर अग्निसार किंवा नौली क्रिया करून हळूवारपणे वस्त्र बाहेर काढावे. अडकल्यासारखे वाटल्यास मिठाच्या पाण्याचे एक-दोन घोट प्यावेत व सावकाश वस्त्र बाहेर काढावे.

रक्तदाब, हृदयविकार असल्यास ही क्रिया करू नये. पहिल्या प्रयत्नात पूर्ण वस्त्र गिळणे शक्य नाही, म्हणून वस्त्र गिळण्याची क्रिया हळूहळू आत्मसात करावी. रोज अधिकाधिक वस्त्र गिळण्याचा सराव केल्याने पूर्ण वस्त्र गिळण्याची कला साध्य होण्यास मदत होते. वस्त्र २० मिनिटांपेक्षा जास्त काळ जठरात ठेवू नये. जरी अर्धवट वस्त्र आत गेले असले तरी २० मिनिटांची मर्यादा ओलांडू नये. पूर्ण वस्त्र आत गिळण्याचा अट्टाहास करू नये. जठर आणि लहान आतडे यांमधील द्वार (पायलोरिक स्फिंक्टर) उघडून वस्त्र ग्रहणीत (पक्वाशयात;duodenum) जाण्याची शक्यता टाळता येत नाही. अशा वेळेस वस्त्र बाहेर काढणे अवघड किंवा हानिकारक ठरू शकते. ही क्रिया योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावी.

वस्त्रधौतीचे लाभ : या क्रियेने पित्त व कफदोष दूर होतात. डोकेदुखी, आम्लता (ॲसिडिटी), अस्थमा या विकारांवर उपयुक्त अशी ही क्रिया आहे. जठराग्नी प्रदीप्त होतो, पचनशक्ती वाढते, मलावरोध कमी होतो, अन्ननलिका व जठर यामधील मल वस्त्र शोषून घेते आणि उदर स्वच्छता होते. वस्त्रधौतीच्या अभ्यासाने गुल्म (अर्बुद), ज्वर, प्लीहा, कुष्ठ आणि कफ-पित्त संबंधित विकारांचे शमन होते. या धौतिक्रियेने आरोग्य, बल आणि पोषण यांची नियमित वृद्धी होते.

संदर्भ :

  • देवकुळे, व. ग., (मराठी अनुवाद) ‘स्वात्माराम कृत हठप्रदीपिका’, मे शारदा साहित्य, पुणे, २०१७
  • निंबाळकर, सदाशिव प्र., यौगिक क्रिया- आरोग्याचा पाया’, योग विद्या निकेतन, मुंबई, २००३
  • ब्रह्मलीन राष्ट्रगुरू श्री १००८ स्वामीजी महाराज, ‘घेरंडसंहिता (भाषानुवाद सहिता)’, श्री पीतांबरा पीठ, दतिया (मध्य प्रदेश), २००३
  • व्यवहारे, श्रीकृष्ण, आनंदयोग, घंटाळी मित्र मंडळ प्रकाशन, ठाणे, २०२१

समीक्षक : प्रदीप पाटील


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.