नायजर-काँगो भाषासमूहातील एक उपगट. अटलांटिक भाषा या प्रामुख्याने पश्चिम आफ्रिकेच्या सेनेगल, गॅम्बिया, गिनी-बिसाऊ, गिनी, सिएरा लिओन आणि लाइबेरिया या प्रदेशात बोलल्या जातात. हा प्रदेश अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. म्हणून या भाषांना पश्चिमी अटलांटिक भाषा असेही म्हटले जाते. जगभरात अटलांटिक भाषा बोलणारे साधारण तीन कोटी भाषक आहेत. या गटात साधारण ४५ भाषा अंतर्भूत होतात. त्यामध्ये फुला, वोलोफ, सेरेर, जोला (डिओला), बलांता, मंजाकू, किस्सी, नालू, टेम्ने, बुलोम, किस्सी, गोल इ. प्रमुख भाषा आहेत. त्यांपैकी काही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात तर काही भाषा मर्यादित भाषकांकडून बोलल्या जातात. बुलोम, कून, बिजायानो, बान्यून सारख्या काही लुप्तप्राय भाषाही याच गटात येतात.

अटलांटिक भाषांची उत्तर आणि दक्षिण गटांत ढोबळ विभागणी केली जाते. उत्तर अटलांटिक गटातील फुला/फुलफुलदे/फुलानी/फुलबे अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या भाषेचे सुमारे एक कोटी पन्नास लाख भाषक आहेत. ही भाषा अनेक बोलीप्रकारांमध्ये विभागलेली आहे. याच गटातील वोलोफ ही सेनेगल व गॅम्बियातील लाखो लोकांची मातृभाषा असून सेनेगलमधील संपर्कभाषादेखील आहे. वोलोफ या भाषेचे अंदाजे ५० लाख भाषक (एथ्नोलॉग, २०२४) आहेत. सेरेर ही भाषा सेनेगलमध्ये बोलली जाते. सेरेर या भाषेचे ९ लाख भाषक (एथ्नोलॉग, २०२४) आहेत. टेम्ने ही दक्षिण गटातील भाषा असून सिएरा लिओनमधील प्रमुख भाषा आहे. किस्सी ही भाषा गिनी, सिएरा लिओन, लाइबेरिया येथे बोलली जाते. अनेक अटलांटिक भाषा स्थानिक पातळीवर संपर्कभाषा (लिंग्वा फ्रँका) म्हणून कार्य करतात. उदाहरणार्थ, वोलोफ ही भाषा सेनेगलमध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, तर फुला ही भाषा पश्चिम आफ्रिकेतील अनेक देशांत पसरलेली आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : अटलांटिक भाषांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नामवर्ग व्यवस्था. बहुतेक अटलांटिक भाषांमध्ये नामांचे विविध वर्ग असतात आणि त्या वर्गांनुसार विशेषणे, सर्वनामे व क्रियापदे यांची रूपे बदलतात. काही भाषांमध्ये नामवर्ग दाखवण्यासाठी उपपदे वापरली जातात, तर काही भाषांमध्ये प्रत्ययांचा वापर होतो.

सेरेर भाषेतील पुढील उदाहरण नामवर्ग व त्यानुसार होणारे रूपांतर दाखवते:

  • faam – ‘गाढव’ (मूळ नाम)
  • go-faam – ‘एक गाढव’ (विशिष्ट वर्गसूचक उपपद)
  • a-paam – ‘गाढवे’ (बहुवचन दर्शविणारा वर्ग)
  • ga-mbaam – ‘मोठे गाढव’ (वर्गसूचक बदल आणि विशेषणात्मक अर्थ)

या उदाहरणांवरून असे दिसते की नामाच्या सुरुवातीला येणारे उपपद बदलल्यामुळे नामवर्ग, संख्या किंवा अर्थभेद व्यक्त होतो.

ध्वनिव्यवस्था : ध्वनिव्यवस्थेच्या दृष्टीनेही अटलांटिक भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही भाषांत (उदा. वोलोफ, फुला) नामाच्या प्रारंभीचे व्यंजन नामवर्गानुसार बदलते. या गटातील भाषांमध्ये स्वराघाताची व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावते. स्वराघातातील फरकामुळे शब्दाचा अर्थ बदलू शकतो. उदा., वोलोफ भाषेची स्वररचना तुलनेने साधी आहे, तर किस्सी भाषेत अधिक जटिल स्वररचना आढळते.

वाक्यरचना : अटलांटिक भाषांमध्ये सामान्यतः कर्ता–क्रियापद–कर्म हा शब्दक्रम असतो, परंतु यात बदल होणे शक्य असते. या भाषांमध्ये क्रियापद व्यवस्था समृद्ध असून काळ (tense), क्रियाव्याप्ती (aspect) आणि  अभिवृत्ती (mood) यांकरता वेगवेगळे रूपप्रत्यय असतात.

अटलांटिक भाषांचे भाषक प्रामुख्याने बहुभाषिक समाजात राहतात. त्यांचा मंडिंका, बाम्बारा तसेच युरोपीय प्रभावातून आलेल्या फ्रेंच, पोर्तुगीज भाषांशीही संपर्क येतो.  त्यामुळे त्यांच्यात शब्दसंपत्ती आणि काही रचनात्मक वैशिष्ट्यांचे आदानप्रदान झालेले आढळते. विशेषतः मंडिंका भाषेच्या दीर्घकालीन संपर्काचा प्रभाव ‘किस्सी’ आणि ‘मेल’ गटातील भाषांवर ठळकपणे जाणवतो. लेखनपद्धतीचा विचार केल्यास, वोलोफ आणि फुला (फुलानी) या भाषांमध्ये पारंपरिक ‘अजमी’ (अरबी लिपीवर आधारित) आणि आधुनिक काळात व्यापकपणे वापरली जाणारी ‘रोमन’ अशा दोन्ही लिपींचा वापर केला जातो. फुलानी आणि वोलोफ समाजात भाषा ही सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा घटक आहे. लोकसाहित्य, गीतपरंपरा आणि मौखिक कथनपरंपरा यांमध्ये या भाषांचा मोठा वाटा आहे.

संदर्भ :

  • Childs, G. Tucker, A Grammar of Kisi: A Southern Atlantic Language, Mouton de Gruyter, Berlin, 2000.
  • Creissels, Denis, ‘Atlantic noun class systems: A typological approach’, In, Aicha Belkadi, Kakia Chatsiou and Kirsty Rowan (eds.), Proceedings of Conference on Language Documentation and Linguistic Theory 4. London, 2014.
  • Lupke, Friederike, The Oxford Guide to the Atlantic Languages of West Africa, Oxford University Press, Oxford, 2024.

समीक्षक : रेणुका ओझरकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.