क्रियाव्याप्ती: क्रियाव्याप्ती ही काळ (tense) किंवा अभिवृत्ती (mood) यांप्रमाणेच फक्त क्रियापदांनाच लागू असणारी एक व्याकरणिक कोटी आहे. क्रियेकडे बघण्याचा एक दृष्टिकोन क्रियाव्याप्ती आपल्याला उपलब्ध करून देते. तिचे वर्णन a verbal camera असे केले जाते. क्रियाव्याप्ती ही संकल्पना भाषेच्या सार्वत्रिक मूलतत्वांपैकी एक आहे असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. उदा. कुरिलोवित्झ, येन्सहोल्ट, मास्लव, कॉमरी इ.क्रियाव्याप्तीची अभिव्यक्ती निरनिराळया भाषांमध्ये निरनिराळया तर्‍हेने होते यावरही भाषाशास्त्रज्ञांचे एकमत आहे. ही एक शब्दीय व्याकरणिक कोटी (lexico-grammatical category) आहे. रशियन व इतर स्लावोनिक भाषांमधील पूर्ण व अपूर्ण क्रियाव्याप्ती (perfective – imperfective aspect) हा या कोटीचा उत्तम नमुना गणला जातो. पूर्ण व अपूर्ण या द्वैतामधूनच आपल्याला क्रियाव्याप्तीची सुस्पष्ट कल्पना येऊ शकते. पूर्ण क्रियाव्याप्तीची क्रियापदे क्रियेकडे एक अखंड, एकसंध घटना म्हणून बघतात. तर अपूर्ण क्रियाव्याप्तीची क्रियापदे क्रियेकडे एक टप्प्याटप्प्याने उलगडत जाणारी प्रक्रिया म्हणून बघतात. पूर्ण क्रियाव्याप्तीच्या क्रियापदांच्या अर्थामध्येच क्रियेचा शेवट, तिचे पूर्णत्वाला जाणे अनुस्यूत असते. पूर्ण क्रियाव्याप्तीचा हा शब्दीय घटक आहे असे मानता येईल. अपूर्ण क्रियाव्याप्तीची क्रियापदे सहसा क्रियेचे नामकरण फक्त करतात.

रशियन आणि स्लावोनिक भाषांमधील पूर्ण आणि अपूर्ण क्रियाव्याप्ती सोबतच इतरही काही भाषांमधील (उदा. ग्रीकमधील प्रेझेंट, एओरिस्ट व परफेक्ट ; लॅटीनमधील इंपरफेक्टम व परफेक्टम हिस्ट्रॉरिकम इ.) क्रियाव्याप्तीचे नमुने तपासले असता क्रियाव्याप्ती या कोटीची काही लक्षणे आपल्याला निश्चित करता येतात. ती अशी :

१.     क्रियापदांची ठराविक नमुन्याची विकरीत रूपसारणी (verbal paradigm) हे व्याकरणिक (grammatical) लक्षण.

२.     पूर्ण व अपूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणारी ठराविक रूपिमे (morphemes) हे रूपीय (morphological) लक्षण.

३.     पूर्ण क्रियाव्याप्तीच्या क्रियापदांमध्ये शब्दिमांतून (lexemes) व्यक्त होणारी अंतर्गत मर्यादा व अपूर्ण क्रियापदांच्या शब्दिमांमध्ये असणारा अंतर्गत मर्यादांचा संपूर्ण अभाव हे शब्दीय (lexical) लक्षण.

सामान्यत: क्रियाव्याप्तीचा व्याकरणिक आयाम क्रियापदांच्या विकरित रूपांच्या सारणीतून व्यक्त होत असतो. पूर्ण क्रियाव्याप्ती दर्शवण्यासाठी रशियन भाषेमध्ये सहसा उपसर्गाचा वापर करण्यात येतो. उपसर्ग हा रूपीय निर्देशक क्रियापदाला शब्दीय पातळीवर एक अंतर्गत मर्यादासुद्धा प्रदान करतो. वर उल्लेख केलेल्या तीन लक्षणांच्या आधारे आपण मराठीतील क्रियापदे, त्यांची आख्याते व विकरित रूपांच्या सारणी तपासल्या तर मराठीत आपल्याला पूर्ण, अपूर्ण व घटिष्य या तीन प्रकारच्या क्रियाव्याप्ती दिसतात. या तीनही क्रियाव्याप्तींची तीनही काळांतील (वर्तमान, भूत, भविष्य) विकरित रूपे एका ठराविक प्रकाराने बनतात. मराठीत लाख्यात, ताख्यात व णार आख्यात अनुक्रमे पूर्ण ,अपूर्ण व घटिष्य व्याप्तीचा निर्देश करतात. काळाचा निर्देश मात्र ‘असणे’ या सहायक क्रियापदाद्वारे केला जातो. पुढील तक्ता पाहिल्यास हा मुद्दा स्पष्ट होईल :

काळ क्रियाव्याती पूर्ण अपूर्ण घटीष्य
वर्तमान तो गेला आहे तो जात आहे तो जाणार आहे
भूत तो गेला होता तो जात होता तो जाणार होता
भविष्य तो गेला असेल तो जात असेल तो जाणार असेल

(वरील सारणी पाहिली तर भविष्यकाळाच्या रूपांबाबत अजूनही एक बाब निदर्शनास येते. ती म्हणजे भविष्यकाळाची पूर्ण व अपूर्ण क्रियाव्याप्तीची रूपे बोलणार्‍याची अटकळ किंवा तो बांधत असलेला अंदाज व्यक्त करतात.केवळ व्याकरणिक अर्थापेक्षाही थोडी वेगळी अर्थच्छटा त्यातून दर्शवली जाऊ  शकते.) मराठीत क्रियाव्याप्ती ही फक्त आख्यात रूपांतूनच होते असे नाही, तर ‘ऊनकृदन्त’ व दुय्यम क्रियापद अशाप्रकारची बहुपदीय रचनासुद्धा क्रियाव्याप्तीचा निर्देश करण्यासाठी वापरली जाते. वर उल्लेख केलेली रूपीय, शब्दीय व व्याकरणिक लक्षणे या प्रकारातही आढळतात. उदा. ‘मरणे’; ‘मरून जाणे’, ‘घेणे’; ‘घेऊन जाणे.

सीमालक्ष्यी क्रियाव्याप्तीविधा (aktionsarten)

पूर्ण क्रियाव्याप्तीचा निर्देश करण्यासाठी भाषा अनेक मार्गांचा अवलंब करतात. काहीवेळा त्यासाठी शब्दीय अथवा रूपीय चिन्हांचा वापर होतो. ही चिन्हे स्वत:ची अशी वैशिष्ट्ये घेऊन येतात. ह्या चिन्हांची वैशिष्टये आणि अपूर्ण क्रियाव्याप्ती दर्शविणाऱ्या क्रियापदांची शब्दीय घडण जर मिळतीजुळती असेल तर क्रियेच्या पूर्णत्वाचा केवळ बोध होतो. त्या क्रियापदाच्या शब्दीय अर्थामध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही.  उदा. मरणे: मरून जाणे. परंतु जर या दोहोंमध्ये  मिळते जुळतेपणा नसेल तर क्रियेच्या पूर्णत्वाला सोबतच ही क्रिया कशी घडली याविषयी अधिक माहिती पूर्ण क्रियाव्याप्तीदर्शक क्रियापदाद्वारे दिली जाते. उदा. खाणे: खाऊन टाकणे; खाऊन घेणे; खाऊन संपवणे. यापैकी खाणे: खाऊन टाकणे या जोडीमध्ये क्रियेच्या पूर्णत्वाखेरिज इतर कोणतीही अर्थच्छटा आलेली दिसत नाही. मात्र खाणे: खाऊन घेणे, खाणे: खाऊन संपवणे यांसारख्या जोडयांमध्ये क्रियेच्या पूर्णत्वाबरोबरच बोलणार्‍याच्या दृष्टीकोनाचा निर्देश करणार्‍या इतरही अर्थच्छटा मिसळलेल्या दिसतात. याला सीमालक्ष्यी क्रियाव्याप्ती विधा असे संबोधले जाते.

वस्तुनिष्ठ, व्यक्तिनिरपेक्ष आणि नैसर्गिक काळ हा एकरेषीय असतो. भाषेमधला काळ मात्र पूर्णत: व्यक्तिसापेक्ष असतो. एकरेषीय काळात जगत असणारा भाषेद्वारे काही अभिव्यक्ती करताना एका सापेक्ष, एका तर्‍हेने पूर्णत: कल्पित काळाचे वर्णन करत असतो. भाषिक वर्णनांमध्ये येणारा काळ हा वर्णन करणार्‍याच्या दृष्टिकोनातून मागेपुढे होत असतो. तो लवचिक असतो. वस्तुनिष्ठ, एकरेषीय काळाच्या दुसर्‍या बिंदूवर स्थित असणारा हे वर्णन वाचत किंवा ऐकत असतो. वस्तुनिष्ठ काळ, बोलणार्‍याचा व्यक्तिसापेक्ष काळ आणि ऐकणार्‍याचा व्यक्तिसापेक्ष काळ या तीन काळांमध्ये असणार्‍या सुसंगतीच्या अभावामुळे काळ या कोटीची अभिव्यक्ती विविध तर्‍हांनी होताना दिसते.

मराठीसोबतच इतरही आधुनिक भारतीय भाषा, जसे हिंदी , गुजराती इ. बहुपदीय क्रियापदांचा वापर करताना दिसतात.  बहुपदीय क्रियापदांमुळे सीमालक्ष्यी क्रियाव्याप्ती विधा मोठया प्रमाणावर पाहायला मिळते. सीमालक्ष्यी क्रियाव्याप्ती विधा क्रियेचे पूर्णत्व सूचित करतेच पण ती क्रिया कशी घडली याविषयीसुद्धा अधिक माहिती देते. पुढील तक्त्यावरून मुद्दा अधिक स्पष्ट होईल.

एकपदीय क्रियापद (अपूर्ण- क्रियाव्याप्ती) बहुपदीय क्रियापद (पूर्ण- क्रियाव्याप्ती व सीमालक्ष्यी क्रियाव्याप्ती विधा)

वाचणे. उदा. रोहनने पुस्तक वाचले.

वाचून काढणे. उदा.रोहनने पुस्तक वाचून काढले.

वाचून टाकणे. उदा.रोहनने पुस्तक कधीच वाचून टाकले.

वाचून घेणे. उदा.रोहनने पुस्तक पटकन वाचून घेतले.

वाचून संपवणे. उदा.रोहनने पुस्तक वाचून संपवले.

खाणे. उदा.श्यामने आंबा खाल्ला. खाऊन टाकणे. उदा.श्यामने आंबा खाऊन टाकला.

खाऊन घेणे. उदा.श्यामने आंबा खाऊन घेतला.

करणे. उदा.रमेशने अभ्यास केला. करून टाकणे. उदा.रमेशने अभ्यास करून टाकला.

करून पाहणे. उदा.रमेशने अभ्यास करून पाहिला.

करून देणे. उदा.रमेशने अभ्यास करून दिला. (अमूकला)

मरणे. उदा.राजा लढाईत मेला. मरून जाणे. उदा.राजा लढाईत मरून गेला.

वरील सर्व जोडयांमध्ये बहुपदीय क्रियापद क्रियेला एक अंतर्गत मर्यादा प्रदान करताना दिसते. काही जोडयांमध्ये अंतर्गत मर्यादेव्यतिरिक्त आणखीही काही अर्थच्छटा उत्पन्न झालेल्या दिसतात. अशा तर्‍हेच्या जास्तीच्या अर्थच्छटा व्यक्त करणार्‍या क्रियापदांमधून सीमालक्ष्यी क्रियाव्याप्ती विधा व्यक्त होत असते.

संदर्भ : १. इंदापूरकर चं.द.,मराठी भाषा व्यवस्था आणि अध्यापन, पुणे, १९८९. २ Comrie, Bernard, Aspect : An Introduction to the Study of Verbal Aspect and Related Problems ; Cambridge Textbooks in Linguistics,Cambridge, 1976.

Key words:   #Aspect, #Imperfective aspect verbs, #perfective aspect verbs,#lexico-grammatical category, #Aktionsarten