कारिको, कॅटलिन : (१७ जानेवारी १९५५). हंगेरीत जन्मलेल्या अमेरिकन जीवशास्त्रज्ञ. कोविड-१९ विरुद्ध प्रभावी एम-आरएनए (mRNA; संदेशवाहक आरएनए)  लसी विकसित करण्याऱ्या न्यूक्लिओसाइड (न्यूक्लिइक आम्लाचे संरचनात्मक उप-एकक) सुधारणांबद्दलच्या तंत्रज्ञानाच्या शोधांसाठी त्यांना आणि प्रतिक्षमता-तज्ञ ड्र्यू व्हाइसमान यांना २०२३ चा शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

कारिको यांचा जन्म हंगेरीतील किशुसालाश येथे झाला. त्यांनी विज्ञानातील पदवी (१९७८) आणि सेगेड विद्यापीठातून जीवरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली (१९८२). पुढील संशोधनासाठी  त्या सेगेड येथील बायोलॉजिकल रिसर्च सेंटरमध्ये (बीआरसी, BRC) दाखल झाल्यात. तेथेच त्यांनी आरएनएच्या लहान भागांच्या विषाणुरोधी क्रियांचा अभ्यास केला आणि सुधारित न्यूक्लिओसाइड यावर संशोधनाला सुरुवात केली. संशोधनाला अनुदान न मिळाल्याने त्या अमेरिकेला स्थलांतरित झाल्यात. पुढे त्या फिलाडेल्फियाच्या टेम्पल विद्यापीठात पोस्टडॉक्टोरल संशोधक म्हणून कार्यरत होत्या (१९८५—८८). त्यानंतर पेनस्ल्व्हिेनिया विद्यापीठातील अमेरिकन ह्दयरोगतज्ञ एलिऑट बर्नाथम (American cardiologist Elliot Barnathan) यांच्यासह संशोधनाला सुरुवात केली. पेशींमध्ये एम-आरएनए घातल्यावर ते नवीन प्रथिन-निर्मितीला निर्देशित करीत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. या शोधामुळे त्यांनी एम-आरएनए आधारित जनुक उपचार पद्धती संशोधन करण्याचे ठरविले. पेनस्ल्व्हिेनिया विद्यापीठात कार्यरत असतांना त्यांची भेट प्रतिक्षमता विज्ञानाचे प्राध्यापक ड्र्यू व्हाइसमान यांचेशी झाली (१९९७). दोघांना विषाणुजन्य रोगजनकांविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी शरीराला उत्तेजित करण्यासाठी एम-आरएनएच्या वापराबाबत रस होता. सुरुवातीच्या संशोधनात त्यांना एम-आरएनए हा अत्यंत प्रतिक्षम असल्याचे आढळून आले. शरीरात एम-आरएनए प्रतिउत्पादक रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करीत असल्याचे आढळले. त्यांनी विशिष्ट सुधारित एम-आरएनए न्यूक्लिओसाइड आणि कमी झालेली रोगप्रतिकार शक्ती यांच्यातील संबंध ओळखण्यास सुरुवात केली. त्यांच्या या संशोधनाचे नव्या तंत्रज्ञानात रूपांतरण झाले. पुढे याच न्यूक्लिओसाइड-सुधारित आरएन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासाबद्दल त्यांनी एकस्वसुद्धा मिळविले (२००५).

कारिको आणि व्हाइसमान यांनी आरएनएआरएक्स (RNARx) कंपनीद्वारे रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करीत नसणारे किंवा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीकडून नकार निर्माण करत नसणारे सुधारित न्यूक्लिओसाइड आरएनए तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण केले. त्यांनी मॉडर्ना (Moderna) आणि बायोएनटेक(BioNTech) या दोन जैवतंत्रज्ञान कंपन्यांना तंत्रज्ञानाचा परवाना दिला. नंतर कारिको यांनी बायोएनटेकमध्ये  वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला (२०१३) आणि कंपनीच्या एम-आरएनएवरील कामाचे निरीक्षण केले. पुढील वर्षांत दोन्ही कंपन्यांच्या चिकित्सक परीक्षणांमध्ये अनेक आरएनए उपचार पद्धती असल्या, तरीही त्यातील एकही यशस्वी ठरली नव्हती. तथापि २०२१ मध्ये कोविड-१९ साथीच्या काळात कारणीभूत असलेल्या सार्स कोव्ह-२ (SARS-CoV-2) च्या संसर्गाची तीव्रता रोखण्यास मदत करू शकेल अशी लस विकसित करण्याची निकड निर्माण झाली. पारंपरिक लसी विकसनापेक्षा एम-आरएनए लसींची निर्मिती तुलनेने जलद करता येणे शक्य होती. सार्स कोव्ह-२चा अनुवांशिक कोड मिळाल्यानंतर मॉडर्ना आणि फायझर-बायोएनटेकच्या शास्त्रज्ञांकडे चाचणीसाठी प्रायोगिक एम-आरएनए लसी तयार करण्यात आल्या.

कारिको यांना नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त पुढील अनेक मानसन्मानांनी सन्मानित करण्यात आले : लुईस एस. रोझेन्स्टील पुरस्कार (२०२०), लास्कर-डेबेकी क्लिनिकल मेडिकल रिसर्च पुरस्कार (२०२१) आणि लुईसा ग्रॉस हॉर्विट्झ पुरस्कार (२०२१). तिन्ही पुरस्कार व्हाइसमानसह विभागण्यात आले आहे. द न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्यांनी केलेल्या शोधल्याबद्दल ‘फीचर’ प्रसिद्ध केले (एप्रिल २०२१). त्यांनी पुढील पुस्तकाचे लेखन केले आहे : नेव्हर गिव्हन अप (२०२३), रेस फॉर द फ्यूचर ऑफ व्हॅक्सिन (२०२३), माय लाईफ इन सायन्स (२०२३).

कारिको सध्या प्राध्यापक पदावर सेगेड विद्यापीठात कार्यरत आहेत.

कळीचे शब्द : #एमआरएनए #नोबेल

संदर्भ :

  • https://en.wikipedia.org/wiki/Katalin_Karik%C3%B3
  • https://www.nobelprize.org/prizes/medicine/

समीक्षक : किशोर कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.