व्हाइसमान,ड्र्यू : (७ सप्टेबर १९५९). अमेरिकन प्रतिक्षमता-तज्ञ.त्यांच्या आरएनए (रिबोन्यूक्लिइक आम्ल) मधील अभूतपूर्व संशोधनामुळे आरएनए उपचार पद्धतीच्या विशेषतः एम-आरएनए (m-RNA) लसनिर्मिती विकासाचा मार्ग मोकळा झाला. एम-आरएनए न्यूक्लिओसाइडमध्ये (आरएनएचे संरचनात्मक उप-एकक) बदल करून रोगप्रतिकारक प्रतिक्रियांमध्ये बदल करणे शक्य होते. या संशोधनामुळे २०२१ मध्ये एम-आरएनए लसींचा विकास शक्य झाला आणि कोविड-१९ साथीच्या आजाराला कारणीभूत असलेल्या सार्स-कोव्ह-२ (SARS-CoV-2) कोरोना विषाणू विरुद्ध लसी निर्माण करण्यास साहाय्य झाले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना आणि कॅटलिन कारिको यांना २०२३ चा शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
व्हाइसमान यांचा जन्म अमेरिकेतील मॅसॅच्यूसेट्स राज्यातील लेकसिंग्टन येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच विज्ञानात रस होता. त्याचे वडील अभियंता होते आणि हायस्कूलमध्ये असताना ते वडिलांच्या कंपनीत काम करत होते. नंतर त्यांनी ब्रँडेस विद्यापीठात जीवरसायनशास्त्र आणि आणि विकरविज्ञान विषयाचा अभ्यास करून पदवी आणि पदव्युत्तर पदवी (१९८१) प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी बॉस्टन विद्यापीठातून एम.डी. पदवी आणि प्रतिक्षमता आणि सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पीएच.डी.पदवी संपादन केली (१९८७). पुढे त्यांना मेरिलँड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ येथील अधिछात्रवृत्ती मिळाली आणि त्यांनी अमेरिकन प्रतिरक्षातज्ञ अँथनी फॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. ते फिलाडेल्फिया येथील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या पेरलमन स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्राध्यापक पदावर रूजू झालेत (१९९७). त्यांनी रोगप्रतिकारक शक्तीच्या देखरेखीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शाखाकृती पेशींवर आणि एम-आरएनए उपचारांच्या विकासावर विशेषतः लस विकास आणि जनुकीय उपचार या क्षेत्रांवर अभ्यास सुरू केला. काही काळातच व्हाइसमान यांची भेट कॅटलिन कारिको यांच्याशी झाली. दोघांनाही विषाणुजन्य रोगजनकांच्या विरोधात शरीरात प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी एम-आरएनएचा उपयोग करण्याचे मार्ग शोधण्यात रस होता.
व्हाइसमान आणि कारिको यांना एम-आरएनए (mRNA) अत्यंत रोगप्रतिकारक असल्याचे आणि प्रतिकूल रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले. कारिको यांना आरएनएचा (RNA) दुसरा प्रकार टी-आरएनए (संक्रमण-आरएनए; tRNA) मध्ये रोगप्रतिकारक परिणाम दिसून आले नाहीत, त्यामुळे व्हाइसमान आणि कारिको यांनी सुधारित न्यूक्लिओसाइडवर संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी एम-आरएनएमध्ये छद्मीयूरिडिनसारखे सुधारित न्यूक्लिओसाइड टाकून रोगप्रतिकारक शक्तीच्या तात्काळ तपासणीतून सुटण्याची क्षमता असलेला एम-आरएनए रेणू तयार करणे शक्य झाले. परिणामी सुधारित एम-आरएनए हा मूळ एम-आरएनएपेक्षा जास्त काळ सक्रिय राहिला. त्यामुळे तो पेशींमध्ये प्रवेश करून रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता असलेल्या प्रथिनांच्या निर्मितीस चालना देऊ शकला. या तंत्रज्ञानाला रोगप्रतिकारक प्रतिसाद निर्माण करीत नसणारे किंवा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीकडून नकार निर्माण करीत नसणारे सुधारित न्यूक्लिओसाइड आरएनए म्हणून मान्यता मिळाली. या तंत्रज्ञानाचे त्यांनी २००५ मध्ये एकस्वसुद्धा मिळविले.
व्हाइसमान आणि कारिको यांचा सुधारित आरएनए तंत्र फायझर आणि मॉडर्ना यांच्या कोविड-१९ ची लस विकसित करण्यातील महत्त्वाचा सहभाग होता (२०२०). जागतिक कोविड-१९ रोगाच्या साथीच्या काळात अशा लसीची आवश्यकता सर्वाधिक होती. हे तंत्र इनफ्ल्यूएंझा, नागीण (हर्पिस) आणि एचआयव्ही यांच्या लसीसाठी उपयुक्त असल्याचे व्हाइसमान यांना वाटत होते.
व्हाइसमान आणि कारिको यांना नव्या लस तंत्रज्ञानाबददल संयुक्तपणे अनेक मानसन्मान प्रदान करण्यात आले. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे : लुईस एस. रोझेन्स्टील पुरस्कार (२०२०), लास्कर-डेबेकी क्लिनिकल मेडिकल रिसर्च पुरस्कार (२०२१) आणि लुईसा ग्रॉस हॉर्विट्झ पुरस्कार (२०२१). व्हाइसमान यांना स्वतंत्रपणे देण्यात आलेले मानसन्मान पुढीलप्रमाणे : ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीन यांकडून मानद पदवी (२०२१), प्रिंसेस ऑफ अस्टूरीयास अॅवॉर्ड, ब्रेकथ्रू प्राईझ लाईफ सायन्स (२०२२), जेस्सी स्टीव्हनसन कोव्हालेंको पदक, रॉबर्ट कॉख पुरस्कार (२०२२).
कळीचे शब्द : #आरएनए तंत्र, #कोविड-१९ #लस
संदर्भ :
- https://en.wikipedia.org/wiki/Drew_Weissman
- https://www.nobelprize.org/prizes/medicine/
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.