ग्रासमानचा नियम हा ऐतिहासिक भाषाविज्ञानातील, विशेषतः इंडो-यूरोपीयन भाषांमधील ध्वनिबदलाविषयीचा एक नियम आहे. हा नियम ग्रीक आणि संस्कृत भाषांमध्ये आढळणाऱ्या ध्वनी विसदृशीकरणाच्या (dissimilation) प्रक्रियेतील सुसूत्रता प्रामुख्याने अधोरेखित करतो. हा नियम भाषाशास्त्रज्ञ हेर्मान ग्रासमान (Hermann Grassmann) यांनी मांडला, म्हणून तो त्यांच्या नावाने ओळखला जातो.
या नियमानुसार, शब्दामध्ये दोन महाप्राण स्पर्शध्वनी (aspirated stops) व्यंजनांची मालिका असल्यास, त्यांमधील पहिला ध्वनी अल्पप्राण (unaspirated) होतो. म्हणजेच, पहिल्या व्यंजनाचे महाप्राणत्व नाहीसे होते. ग्रासमानच्या नियमाचा या भाषांवरील प्रभाव आपण पाहूयात- संस्कृतमध्ये भू /bʰuː/ (‘होणे’) या धातूचे परोक्ष भूतकाळाचे अपेक्षित रूप अभ्यस्त होऊन भभूव /bʰəbʰuːʋə/ असे आहे; मात्र त्याचे रूपांतरण होऊन बभूव /bəbʰuːʋə/ असे रूप मिळते. ग्रीकमध्ये phū́- (‘निर्माण करणे’) या धातूचा /pʰépʰuːka/ या अभ्यस्त रुपात होणारा /pépʰuːka/ हा बदलदेखील ग्रासमानच्या नियमाचेच उदाहरण होय.
ग्रासमानच्या नियमाने प्रभावित होणाऱ्या ध्वनींपैकी, ग्रीकमध्ये अघोष महाप्राण स्पर्शध्वनी आढळतात, तर इंडिक भाषांमध्ये यांचे घोष रूप दिसून येते. त्यामुळे, वैज्ञानिकांच्या मते, ग्रीक आणि इंडिक भाषांमधील विसदृशीकरण हे एकमेकांपासून वेगळे अस्तित्वात आले आहेत. त्यांच्या मते, ग्रीकमध्ये महाप्राण लोप हा प्रोटो-इंडो-युरोपीयन महाप्राण स्पर्शध्वनींच्या ग्रीकमधील अघोषीकरणानंतर झाला. यावरून असे स्पष्ट होते की ग्रीकमधील महाप्राण लोप हा तुलनेने नंतरचा असून तो इंडिक परंपरेपासून स्वतंत्रपणे घडलेला आहे.
ग्रीक आणि संस्कृत या भाषांच्या व्यतिरिक्त ओफो या सुअन भाषेत आणि मणिपुरी (मेईथेई) या तिबेटो-बर्मन भाषेत ग्रासमान नियमाची उदाहरणे दिसून येतात.
संदर्भ :
- Campbell, lyle, Historical Linguistics : An Introduction, Edinburgh University Press, Edinburgh, 1998.
- Collinge, N. E., The Laws of Indo-European, John Benjamins Publishing, Amsterdam, 1985.
- Reuse, Willem J. de and Grassmann, Grassmann’s Law in Ofo, International Journal of American Linguistics, Vol. 47, No. 3, The University of Chicago Press, 1981.
समीक्षक : रेणुका ओझरकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.