भाषाविज्ञानातील ऐतिहासिक भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा आणि पुरातत्त्वविद्या हे भूतकाळातील सांस्कृतिक घटना आणि बदल यांच्याकडे बघण्याचे दोन परस्परपूरक मार्ग आहेत. प्राचीन काळातील संस्कृतींचे अवलोकन करण्यासाठी विविध पुरास्थळांवर मिळणार्‍या अवशेषांचा अभ्यास करून पुरातत्त्वविद्येत निष्कर्ष काढले जातात. तथापि संस्कृतीमधील सर्व पैलूंचे आकलन होऊ शकेल असे पुरावे प्रत्यक्ष वस्तूंच्या स्वरूपात प्रत्येक पुरास्थळावर मिळतीलच असे नाही. संस्कृतीमधील अशा अभौतिकी (intangible) परंतु महत्त्वाच्या पैलूंमध्ये भाषेचा समावेश होतो. ऐतिहासिक भाषाविज्ञान आणि पुरातत्त्वविद्या या ज्ञानशाखांच्या परस्पर सहकार्याने केल्या जाणार्‍या अध्ययनाला पुरातत्त्वीय भाषाविज्ञान आणि भाषावैज्ञानिक पुरातत्त्व असे संबोधले जाते.

दक्षिण आशियाई भाषाविज्ञानात भरीव संशोधन केलेल्या फ्रँकलिन साऊथवर्थ (जन्म १९२९) या विख्यात अमेरिकन भाषावैज्ञानिकांनी भाषावैज्ञानिक पुरातत्त्वासाठी भाषाविज्ञानाच्या ज्या चार मुख्य उपशाखा उपयोगी पडतात त्यासंबंधी प्रतिपादन केले आहे : १) तौलनिक अभ्यासाने भाषांमधील ऐतिहासिक संबंधांचा मागोवा घेणे व प्राचीन काळातील भाषांच्या स्वरूपाची मांडणी करणे (तौलनिक-ऐतिहासिक भाषाविज्ञान), २) पूर्वीच्या काळातील भाषांच्या स्वरूपावरून प्राचीन सांस्कृतिक वास्तवासंबंधी निष्कर्ष काढणे (पुराभाषाविज्ञान), ३) भाषेतील बदल आणि सांस्कृतिक संबंध यांबद्दलचे निष्कर्ष काढणे (सामाजिक भाषाविज्ञान) आणि ४) पूर्वीच्या काळात भाषांच्या विलग होण्याच्या काळासंबंधी अनुमान काढणे (ग्लोटोक्रोनोलॉजी). याचप्रमाणे भाषांच्या इतिहासाचा आणि प्राचीन लिखित संहितांचा अभ्यास करणार्‍या फिलॉलॉजी या ज्ञानशाखेचाही उपयोग केला जातो.

तौलनिक-ऐतिहासिक भाषाविज्ञानामधील संशोधन पद्धतींचा वापर करून पुरातत्त्वविद्येत प्रत्यक्ष पुराव्यांमधून दिसलेल्या सांस्कृतिक बदलांचा मागोवा घेणे, हे भाषावैज्ञानिक पुरातत्त्वाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भाषा आणि संस्कृती यांचा एकत्रित विचार करणे महत्त्वाचे आहे, हे पुरातत्त्वज्ञांच्या अनेक दशकांपूर्वी लक्षात आले होते. पुरातत्त्वविद्येच्या क्षेत्रातील वर्ल्ड आर्किऑलॉजी या सुप्रसिद्ध नियतकालिकाचा १९७६ मधील संपूर्ण अंक भाषा आणि पुरातत्त्व यांच्यातील सहसंबंध विशद करण्याला वाहिलेला होता.

विविध भाषा बोलणार्‍या लोकसमूहांमधील परस्परसंबंध हा भाषेतील बदलांचे महत्त्वाचे कारण आहे. या बदलांची तीव्रता चार मुख्य घटकांवर अवलंबून असते. संबंध किती काळ आहेत, समूहांमधील लोकांची संख्या, सामाजिक-आर्थिक प्रभावक्षमता आणि भाषेच्या वापराची प्रतिष्ठा हे ते चार घटक आहेत. लोकांमधील थेट परस्पर संबंधांप्रमाणेच शेती करणे व अन्नप्रक्रिया करण्याच्या पद्धतींचा स्वीकार करणे, निरनिराळ्या वस्तूंचे व्यापारामुळे हस्तांतरण होणे, दैनंदिन वापराच्या व विशिष्ट सामाजिक प्रतिष्ठादर्शक वस्तूंच्या निर्मितीच्या तंत्रज्ञानाची देवाणघेवाण अशा अनेक कारणांमुळे भाषेत बदल घडतात. विविध कारणांमुळे काळाच्या ओघात भाषेच्या वापरात, शब्दसंग्रहात आणि व्याकरणात बदल होत जाणे स्वाभाविक असले, तरी भाषा प्रत्यक्ष वापरली जात असल्यामुळे प्राचीन काळाकडे बघण्याचा भाषा हा अत्यंत महत्त्वाचा स्रोत ठरतो. प्रत्यक्ष वापरातील वस्तू पुरातत्त्वीय उत्खननात आढळल्या नाहीत, तरी त्यांच्यासाठी पूर्वी उपयोगात असलेले शब्द नंतरच्या काळातील भाषेत शिल्लक राहतात. लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व (Ethnoarchaeology) या पुरातत्त्वाच्या शाखेतील पद्धतींचा वापर करून विविध वस्तूंसाठी उपयोगात असलेल्या शब्दांचा आधार घेऊन पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा अर्थ लावता येतो. तथापि असे करताना दोन्ही ज्ञानशाखांची मर्यादा लक्षात घेणे आवश्यक ठरते. भाषा हे सांस्कृतिक परंपरांचे पुढील पिढ्यांकडे वहन करणारे माध्यम असले, तरी असे करणारे लोक कोण होते, हे भाषाविज्ञान सांगू शकत नाही. तसेच पुरातत्त्वीय उत्खननात आढळलेल्या लोकांच्या भौतिक अवशेषांच्या आधारे इतिहासपूर्व काळातील लोक कोणती भाषा बोलत होते, हे पुरातत्त्वीय विज्ञान सांगू शकत नाही.

भाषावैज्ञानिक पुरातत्त्वाच्या विकासात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ मारिया गिंबुटास (१९२१—१९९४) यांचा इंडो-यूरोपियन भाषांसंबंधीचा ’कुरगन सिद्धांत’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. गिंबुटास यांनी असे मत मांडले की, सु. ९००० वर्षांपूर्वी नीपर-वोल्गा प्रदेशात राहणार्‍या भटकी जीवनशैली असलेल्या लोकांच्या स्थलांतरामुळे इंडो-यूरोपियन भाषा यूरोप आणि आशियात पसरल्या. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ कॉलीन रेन्फ्रू (जन्म १९३७) यांचा इंडो-यूरोपियन भाषांचा आणि शेती करण्याच्या संकल्पनेचा प्रसार यासंबंधीचा सिद्धांत हा भाषावैज्ञानिक पुरातत्त्वात दुसरा महत्वाचा टप्पा आहे. रेन्फ्रू यांनी असे प्रतिपादन केले की, प्रोटो-इंडो-यूरोपियन भाषेचा उगम सुमारे ९००० वर्षांपूर्वी अनातोलियात (प्राचीन तुर्कस्थान) झाला व तेथून इंडो-यूरोपियन भाषा, शेती करण्याच्या संकल्पनेबरोबर मध्य व उत्तर यूरोपमध्ये पसरल्या. इंडो-यूरोपियन भाषा आणि पुरातत्त्व या विषयांत आयरिश पुरातत्त्वज्ञ जेम्स पॅट्रिक मॅलरी (जन्म १९४५) आणि अमेरिकन पुरातत्त्वज्ञ डेव्हिड अँथनी यांनीदेखील मोलाची भर घातली आहे. तसेच आस्को पार्पोला (जन्म १९४१) या फिनिश भारतविद्या अभ्यासकांनी सिंधू संस्कृतीच्या भाषावैज्ञानिक पुरातत्त्वीय संशोधनात भरीव कामगिरी केलेली आहे.

भारतीय पुरातत्त्वाच्या संदर्भात इंडो-यूरोपियन आणि द्रविडियन भाषांमधील धान्ये, शेती व प्राणी यांच्या संबंधातील संज्ञांवर संशोधन झाले आहे. विशेषतः भात, गहू, जव, शेळ्या-मेंढ्या गाई-गुरे, पाळीव प्राण्यांचे कळप, पाळीव प्राण्यांना ठेवण्याच्या जागा, गुराखी, शेती करताना केल्या जाणार्‍या विविध क्रिया, धान्यांवर प्रक्रिया करण्याच्या पद्धती या सर्वांसाठी जुन्या इंडो-यूरोपियन आणि द्रविडियन भाषांमधील संज्ञा यांची सांगड दक्षिण भारतातील नवाश्मयुग व वायव्य भारतातील ताम्रपाषाणयुगीन (सिंधू संस्कृतीसह) पुरातत्त्वीय पुराव्यांशी घालून अनेक निष्कर्ष काढण्यात आले आहेत. विशेषतः भातासाठी वापरल्या जाणार्‍या विविध संज्ञांच्या ऐतिहासिक भाषावैज्ञानिक अभ्यासाने पुरातत्त्वीय संशोधनाला मोलाची मदत झाली आहे.

संदर्भ :

  • Anthony, David W. & Donald, Ringe, ‘The Indo-European Homeland from Linguistic and Archaeological Perspectives’, Annual Review of Linguistics, 1(1): 199-219,  2015.
  • Fuller, Dorian Q. ‘Agricultural Origins and Frontiers in South Asia : A Working Synthesis’, Journal of World Prehistory,  20:1-86, 2006.
  • Mallory, J. P. In Search of the Indo-Europeans : Language, Archaeology and Myth, London, 1989.
  • Renfrew, Colin, Archaeology and Language : The Puzzle of Indo-European Origins, London, 1987.
  • Southworth, Frankalin C. Linguistic Archaeology of South Asia, New York, 2005.

समीक्षक : सुषमा देव