थेरवाद बौद्ध परंपरेतील ‘अभिधम्मपिटक’ या ग्रंथसंग्रहातील पाचवा ग्रंथ. “विषयांची चर्चा”, ‘वादविवादाचे मुद्दे’ किंवा ‘मतभेदांचे बिंदू’ (Points of Controversy) या नावाचा शब्दशः अर्थ होतो. हा ग्रंथ थेरवाद दृष्टिकोनातून बौद्ध संघातील विविध संप्रदायांमध्ये उद्भवलेल्या तात्त्विक मतभेदांचे संकलन, विश्लेषण आणि खंडन करण्यासाठी ओळखला जातो. प्रत्यक्ष बुद्धवचनांचा भाग नसला तरी, हा ग्रंथ बौद्ध धर्मातील सुरुवातीच्या वैचारिक विभाजनाचा (schisms) आणि संप्रदायांच्या तत्त्वज्ञानाचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो.
- ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि रचनाकार
१. पारंपरिक मत:
थेरवाद परंपरेनुसार, ‘कथावत्थु’ ग्रंथाच्या रचनेचे श्रेय मोग्गलिपुत्त तिस्स थेर यांना दिले जाते. इ.स.पू. २५० च्या सुमारास, सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत पाटलीपुत्र येथे झालेल्या तिसऱ्या बौद्ध संगीतीचे ते अध्यक्ष होते. परंपरेनुसार, अशोकाच्या काळात संघात अनेक भिन्न मतप्रणाली प्रचलित झाल्या होत्या. मोग्गलिपुत्त तिस्स थेर यांनी या ग्रंथात त्या काळातील सतरा वेगवेगळ्या बौद्ध संप्रदायांचे खंडन करून अठराव्या संप्रदाय, म्हणजेच थेरवाद (ज्याला विभज्जवाद असेही म्हटले जाते) याचे समर्थन व प्रतिपादन केले आहे. इतर बौद्ध पंथ या ग्रंथाला आगमबाह्य मानतात.
२. आधुनिक विद्वानांचे मत:
अनेक आधुनिक विद्वान उदा. ऑस्कर वॉन हिन्युबर, विल्हेल्म गायगर यांच्यामते, हा संपूर्ण ग्रंथ एकाच वेळी रचला गेला नाही.तर त्याचा क्रमिक विकास झाला असावा. ग्रंथाची रचना काहीशी अनियमित आणि त्यातील वादविवादांचे स्वरूप पाहता, यात सम्राट अशोकानंतरच्या काळात उदयास आलेल्या संप्रदायांच्या मतांचा ही समावेश आहे, या ग्रंथात काही अधिक भाग नंतर जोडला गेला असावा. एस. झेड. औंग (Shwe Zan Aung) आणि सी.ए.एफ. रायस डेव्हिड्स (C.A.F. Rhys Davids) यांनी १९१५ मध्ये “Points of Controversy” या नावाने या ग्रंथाचा पाली टेक्स्ट सोसायटीसाठी (Pali Text Society) पहिला इंग्रजी अनुवाद केला.
ग्रंथाचे स्वरूप, रचना आणि वाद –विवादाची तार्किक पद्धत
‘कथावत्थु’मध्ये मोग्गलिपुत्त तिस्स यांनी एकूण २१६ दार्शनिक सिद्धांतांचे खंडन केले आहे.
- स्वरूप आणि विभागणी : सध्याच्या स्वरूपात उपलब्ध असलेला ग्रंथ २३ वग्गांमध्ये (प्रकरणांमध्ये) विभागलेला आहे. प्रत्येक वग्गामध्ये साधारण ८ ते १२ प्रश्नोत्तरांचे विभाग आहेत. आधुनिक अभ्यासकांच्या मते, यातील शेवटच्या तीन वग्गांतील भाग प्रक्षिप्त (नंतर जोडलेले) असण्याची शक्यता आहे.
- तार्किक पद्धत: संपूर्ण ग्रंथ हा शास्त्रार्थ किंवा वाद विवाद स्वरूपात आहे. याची तार्किक पद्धत ‘अनुलोम’ (direct/forward method) आणि ‘प्रतिलोम’ (indirect/reverse method) या युक्तिवादांवर आधारलेली आहे. प्रत्येक मुद्दा प्रश्नोत्तर स्वरूपात मांडला जातो.
- अनामिकता आणि टीका: मूळ ग्रंथात विरोधी मत मांडणाऱ्या संप्रदायांची नावे स्पष्टपणे सांगितलेली नाहीत. ही उणीव आचार्य बुद्धघोष यांनी इ.स. ५ व्या शतकात लिहिलेल्या आपल्या ‘पंचप्पकरण अट्ठकथा’ (Pañcappakaraṇa-aṭṭhakathā) या टीकेमध्ये भरून काढली.
बौद्ध संप्रदाय आणि प्रमुख वाद
‘कथावत्थु’ हा ग्रंथ बौद्धधर्मातील १८ प्रमुख संप्रदायांच्या तात्त्विक मतभेदांवर आधारित आहे. आचार्य बुद्धघोषांच्या टीकेनुसार, त्या काळी दोन मुख्य शाखांमधून हे संप्रदाय निर्माण झाले:
१.महासांघिक आणि उपसंप्रदाय (एकूण ६): महासांघिक, एकब्बोहारिक, गोकुलिक,पञ्ञत्तिवादी (प्रज्ञप्तिवादी), बाहुलिक, चेतियवादी
२. थेरवाद (स्थविरवाद) आणि उपसंप्रदाय (एकूण १२):थेरवाद (मूळ), महिशासक, वज्जिपुत्तक, सब्बत्थिवादी (सर्वास्तिवादी), धम्मगुत्तिक (धर्मगुप्तिक) धम्मोत्तरीय (धर्मोत्तरीय), धन्नागरिक, भद्दयानिक (भद्रायनीय), सम्मितिय (सम्मितेय), कस्सपिक (काश्यपीय), संक्रांतिक, सुत्तवादी (सौत्रान्तिक)
- प्रमुख वादविवादांची उदाहरणे.
या ग्रंथात बौद्धतत्त्वज्ञानातील विविध विषयांवरील वाद – विवाद आणि चर्चा आहे.
प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे:
१.‘पुद्गल’ वाद (Pudgalavāda)
वाद: ‘व्यक्ती’ (‘पुद्गल’) हे पंचस्कंधांहून (रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान) वेगळे असे एक वास्तविक तत्त्व आहे का? ते एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाते का? (हा वज्जिपुत्तक, सम्मितिय, भद्दयानिक, धम्मोत्तरीय इत्यादी संप्रदायांचा मुख्य सिद्धांत होता).
थेरवादखंडन: हे मत बुद्धांच्या ‘अनात्मवाद’ (Anattā) या मूलभूत सिद्धांताच्या विरुद्ध आहे, असे सांगून थेरवादाने ते नाकारले.
२.सर्वास्तिवाद (Sarvāstivāda)
वाद: सर्व ‘धर्म’ (मानसिक-भौतिक घटक) भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांत अस्तित्वात असतात का?
थेरवाद खंडन: फक्त वर्तमानातील धर्मच अस्तित्वात असतात.
३.अर्हताची स्थिती (Arhat’s Status)
वाद: अर्हत (पूर्णज्ञानी) व्यक्तीला अज्ञानामुळे शंका निर्माण होऊ शकते का? किंवा त्याचे अज्ञानामुळे पतन होऊ शकते का? अर्हताला रात्री स्वप्न सदृश अनुभव (वासनायुक्त) येऊ शकतात का?
थेरवादखंडन: अर्हत हा सर्व क्लेशांपासून मुक्त झाल्याने त्याला शंका किंवा पतन अशक्य आहे,
४.अंतराभव (Antarābhava)
वाद: मृत्यू आणि पुढील पुनर्जन्म यांमध्ये ‘मध्यावस्था’ (intermediate state) अस्तित्वात असते का?
थेरवाद खंडन: मृत्यू आणि पुनर्जन्माची प्रक्रिया (चित्त) झटपट (तात्काळ) होते.
५.गृहस्थाचे अर्हतपद
वाद: एक सामान्य गृहस्थ (भिक्खू न बनता) अर्हतपदाला पोहोचू शकतो का? (हे उत्तरापथक पंथाचे मत होते).
थेरवाद खंडन: अर्हत झाल्यावर गृहस्थ राहणे शक्य नाही.
६.प्रारब्धवाद (Predestination):
वाद: व्यक्तीचे सर्व सुख-दुःख हे पूर्व निश्चित (प्रारब्ध) असते का? (हे पूर्व शैलीय व अपर शैलीय पंथांचे मत होते).
थेरवाद खंडन: कर्म सिद्धांताच्या विरुद्ध मानून नाकारले.
‘कथावत्थु’ हा ग्रंथ अनेक कारणांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो:
- थेरवादाची तात्त्विक स्थापना: या ग्रंथाने थेरवाद परंपरेच्या तात्त्विक भूमिका स्पष्ट केल्या आणि इतर १७ प्रमुख संप्रदायांपासून स्वतःला ठामपणे वेगळे केले.
- ऐतिहासिक दस्तऐवज: हा ग्रंथ बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये बौद्ध संघात झालेल्या वैचारिक मंथनाचा आणि विभाजनाचा एक अधिकृत ऐतिहासिक पुरावा आहे.
- तर्कशास्त्राचा विकास: या ग्रंथाने वापरलेली शास्त्रार्थ (debating) आणि तार्किक खंडनाची पद्धत, बौद्ध तत्त्वज्ञानातील तर्कशास्त्राच्या विकासासाठी एक पाया ठरली.
- सुत्तपिटकाशी संबंध : या ग्रंथात सुत्तपिटकातील अनेक उद्धरणे दिलेली आहेत, त्यामुळे त्याचा मूळ सिद्धांतांशी (सुत्तांशी) जवळचा संबंध दिसून येतो.
प्रमुख अट्ठकथा आणि टीकाग्रंथ
‘कथावत्थु’ ग्रंथाच्या सखोल अभ्यासासाठी त्यावर अनेक अट्ठकथा (Commentaries) आणि टीका (Sub-commentaries) लिहिल्या गेल्या. त्यापैकी प्रमुख ग्रंथ खालीलप्रमाणे आहेत:
१.पंचप्पकरण अट्ठकथा (आचार्यबुद्धघोष), २.पंचप्पकरण-अनुटीका,
३.कथावत्थुपकरण- अनुटीका, ४.पंचप्पकरणपकरण-मूलटीका,
५.कथावत्थुपकरण – मूलटीका
‘कथावत्थु’ हा केवळ वादविवादांचा संग्रह नसून, थेरवाद बौद्धधर्माच्या तत्त्वज्ञानाची शुद्धता आणि ओळख प्रस्थापित करणारा एक आधारस्तंभ आहे.
संदर्भ :
- Aung, Shwe Zan, and Mrs. Rhys Davids. “Points of Controversy or Subjects of Discourse: Being a Translation of the Kathāvatthu from the Abhidhamma Piṭaka.” Pali Text Society Translation Series No. 5, London: Pali Text Society, 2010
- Geiger, Wilhelm, trans. fr. German by Batakrishna Ghosh, “Pāli Literature and Language”. New Delhi: Munshiram Manoharlal Publishers.
- Hinüber, Oskar von, “A Handbook of Pāli Literature”. Berlin: Walter de Gruyter. 2000
- McDermott, James P. “The Kathavatthu Kamma Debates” in the Journal of the American Oriental Society, Vol. 95, No. 3 (Jul. – Sep., 1975), 1975.
- जैन, डॉ. भागचन्द्र, भास्कर, “पाली भाषा और साहित्य का इतिहास”, ज. रामानंदाचार्य रा. संस्कृत विश्वविद्यालय, सन्मति प्राच्य संशोधन संस्था, २०१५.
- तगारे, गणेश वासुदेव, “पाली साहित्याचा इतिहास”, महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, म. गांधी रोड , नागपूर साठी , प्रकाशक –कॉंटिनेंटल प्रकाशन, विजयानगर कॉलनी, पुणे ३०.
- सांकृत्यायन, महापंडित राहुल. “पालि साहित्य का इतिहास”. हिंदी समिति, लखनऊ. १९६३.
समीक्षक : राजश्री मोहाडीकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.