मल्लनाथ महाराज. (१८४५-१९१४). औसा या संस्थानाचे मठाधीपती. पिता वीरनाथ महाराज व माता रुक्मिणी यांच्या उदारी औसा येथे त्यांचा जन्म झाला.मल्लनाथ गाथा (१९१५) हा ग्रंथ त्यांच्या पश्चात गुरुनाथ महाराजांची प्रकाशित केलेला अभंगाचा संग्रह आहे. यात ३४७ अभंग, दहा आरत्या, चार ओवीबद्ध संतचरित्रे एकत्रित करण्यात आलेली आहेत.

याशिवाय दासवीरसाथ महाराजांचे ४५ अभंग ही समाविष्ट केलेले आहेत. ग्रंथात शेवटी अष्टक देऊन ह्या ग्रंथाची सांगता केलेली आहे. मल्लनाथांच्या अभंगाचा वापर चक्रीभजन, कीर्तन, भजन करतेवेळी वारकरी संप्रदायात केला जातो. त्यामुळे साहित्याच्या  माध्यमातून मल्लनाथ महाराजांनी दिलेली शिकवण लोकांपर्यंत पोहोचायला मदत झाली आहे. मल्लनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी अखंड भ्रमंती केली, त्याचप्रमाणे त्यांनी ग्रंथलेखन करुन समाजामध्ये समाजजागृती करण्याचे कार्य केले. श्री गुरुवीर लीलामृत (द्वितीयावृत्ती, २००१) व ज्ञानेश्वरीची अनुप्रत  हे दोन ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. वीरनाथचरित्र लिहिले, संतांच्या चरित्रपर अभंगरचना केली. कृष्णजन्मपर, रामजन्मपर अभंग लिहिले. भावसमरसता आणि उत्स्फूर्तता हे त्यांच्या काव्याचे वेगळेपण आहे. समन्वयशीलता आणि स्वधर्मनिष्ठा असे परस्परविरोधी भासणारे पैलू व्यक्त करणारे हे वाङ्मय वैदिकतेशी नाते सांगणारे आणि अन्य संप्रदायांबद्दल द्वेषभाव व्यक्त न करणारे आहे. संख्यात्मकदृष्ट्या कमी; परंतु गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ असणार्‍या या वाङ्मयाने पर्यायाने मल्लनाथ महाराज यांनी सदाचाराचा पुरस्कार करीत मराठी साहित्यास अपूर्व योगदान दिलेले आहे.

संदर्भ : shodhganga.inflibnet.ac.in