निसर्गातील साधन संपत्तीचा योग्य पद्धतीने वापर करण्यासंदर्भातला अभ्यास आर्थिक भूगोलात केला जातो. भूगोलशास्रात प्रामुख्याने निरीक्षण, प्रयोग आणि विश्लेषण या क्रियांद्वारे
निसर्गातील घडामोडींचे सुसुत्रपद्धतीने मिळविलेले ज्ञान अभ्यासले जात असते. या ज्ञानाची सुसंगत मांडणी भूगोलात केली जात असल्याने भूगोल ही एक विज्ञानशाखा मानली जाते. प्रसिद्ध ग्रीक भूगोल अभ्यासक व खगोलशास्रज्ञ एराटॉस्थीनीझ यांनी सर्वप्रथम पृथ्वीच्या वर्णनासाठी ‘भूगोल’ ही संकल्पना वापरली व रूढ केली. ग्रीक भाषेत Geography या शब्दातील ‘Geo’ म्हणजे ‘पृथ्वी’ आणि ‘graphy’ म्हणजे ‘वर्णन’. ‘भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्र’ अशी व्याख्या सुरुवातीस करण्यात आली.
पृथ्वी आणि पृथ्वीशी सबंधित असलेल्या विविध घटकांची माहिती मानवास जसजशी होत गेली, तसतशी भूगोल विषयात नवनवीन भर पडत राहिली. भूगोलाचे सुसंगत व सोयीस्कर अध्ययन होण्यासाठी या विषयाच्या प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल (सांस्कृतिक भूगोल) अशा दोन प्रमुख शाखा निर्माण झाल्यात. पृथ्वीवरील सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास प्राकृतिक भूगोल या शाखेत केला जातो आणि मानव व पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा अभ्यास ‘मानवी भूगोल’ या शाखेत केला जातो. ‘आर्थिक भूगोल’ ही ‘मानवी भूगोलाची कालानुरूप बदलणारी एक प्रगत शाखा मानली जाते.
व्याख्या : जॉर्ज चिशोल्म यांच्या मते, ‘भू-अर्थशास्र’ म्हणजे व्यापार आणि उद्योग यांच्याशी संबधित अशा भौगोलिक घटकांचा बौद्धिक दृष्ट्या केलेला अभ्यास होय’. म्हणजेच मानव, निसर्ग आणि सांस्कृतिक पर्यावरण यांच्या सहसंबंधाचा मानवाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणजे आर्थिक भूगोल होय. या व्याख्येवरून त्यांनी भौगोलिक घटकास विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येते. उत्पादन, वितरण आणि व्यापार या संदर्भात प्रदेशाचा अभ्यास करणे उचित ठरते.
डडले स्टॅम्प यांच्या मते, ‘मानवाच्या उत्पादन क्षमतेवर प्रभाव पाडणाऱ्या भौगोलिक व इतर घटकांचा विचार आर्थिक भूगोलात केला जातो.’
झिम्मरमन यांच्या मते, ‘आर्थिक भूगोल हे पर्यावरणाच्या संबंधातील मानवाच्या आर्थिक जीवनाचा अभ्यास करणारे विज्ञान आहे.’
वरील व्याख्यांवरून असे म्हणता येईल की, मानव हा नैसर्गिक पर्यावरणाचा अविष्कार आहे. आर्थिक भूगोलाच्या अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू मानून मानवाच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवी कार्याला महत्त्व असून सभोवतालच्या परिस्थितीत मानवी कर्तृत्वाचे परिणाम दिसून येत. मानवी संस्कृतीचा विकास व ऱ्हास या मानवी घटना किंवा क्रिया-प्रक्रिया स्थल-कालरूप असतात; कारण निश्चित अशा ठिकाणी त्या वेगवेगळ्या काळी घडलेल्या असतात. त्यामुळे स्थळांच्या प्राकृतिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे मानवाच्या आर्थिक विकासावर झालेले परिणाम आर्थिक भूगोलात अभ्यासले जातात. अशा अभ्यासात पर्यावरणाच्या सर्व घटकांचा मानवाच्या आर्थिक क्रीया-प्रक्रियांशी एकत्रीत होणारा परिणाम पाहणे हा प्रमुख उद्देश असतो, त्यालाच स्थलीय एकता (टेकरेस्ट्रीयल यूनिटी) असे म्हणतात.
स्वरूप : आर्थिक भूगोल या विषयाच्या शास्रशुद्ध अभ्यासाची सुरुवात एकोणिसाव्या शतकात झाली. जॉर्ज चिशोल्म यांना आधुनिक आर्थिक भूगोलाचा जनक म्हणून संबोधले जाते. त्यांनी या शास्रास ‘भू-अर्थशास्र’ (जिओ-इकॉनॉमिक्स) ही संज्ञा दिली. आर्थिक भूगोलात मानवाच्या आर्थिक हालचालींचा म्हणजेच मानवी व्यवसायाचा अभ्यास केला जातो. अन्न, वस्र व निवारा, तसेच नव्याने अंतर्भूत झालेल्या शिक्षण, ज्ञान व तंत्रज्ञान या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजांच्या पूर्ततेसाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो. मानवी गरजा अमर्याद असून त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी साधने मर्यादित आहेत. सभोवतालच्या पर्यावरणातून मनुष्य आपल्या बहुतांश गरजा भागविण्याचा प्रयत्न करीत असतो; परंतु तो राहतो त्या प्रदेशातून त्याच्या संपूर्ण गरजा भागविल्या जातीलच असे नाही. तेव्हा इतर प्रदेशांतून आवश्यक वस्तूंची देवाण-घेवाण करावी लागते. त्यासाठी सभोवतालच्या प्रदेशांतील वस्तूंची, उत्पादनांची, उपभोगाची व विनिमयाची माहिती असणे आवश्यक असते. आर्थिक भूगोलात वस्तूंचे उत्पादन, उपभोग व विनिमय यांचा प्रामुख्याने अभ्यास करण्यात येतो.
कृषी भूगोल : कृषी भूगोल ही आर्थिक भूगोलाची एक प्रमुख शाखा मानली जाते. कृषी भूगोलात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मातीच्या मशागतीतून मानवी गरजा भागविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या विविध पिकांवर, फळझाडांवर आणि फुलझाडांवर सभोवतालच्या नैसर्गिक किंवा सांस्कृतिक पर्यावरणीय घटकांचा कसा प्रभाव पडतो, याचा अभ्यास केला जातो.
औद्योगिक भूगोल : आधुनिक युगात जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण या प्रक्रियांमुळे औद्योगिकीकरण झपाट्याने होऊ लागले. त्यामुळे औद्योगिक भूगोल या शाखेला आधुनिक युगात महत्त्व प्राप्त झाले आहे. औद्योगिक भूगोलात विविध प्रकारचे उद्योगधंदे, त्यांचे उत्पादन, वितरण, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण या बाबींचा अभ्यास केला जातो. विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीबरोबर औद्योगिक क्रांतीनंतर जगभर उद्योगधंद्यांचा विकास झपाट्याने होऊ लागला. औद्योगिक प्रगतीबरोबरच विविध अडचणी भेडसावू लागल्या, त्यांची स्वतंत्रपणे अभ्यासपद्धती वापरून अध्ययन करण्यात येऊ लागले. स्वतंत्र सिद्धांत व प्रतीमानांचा वापर सुरू झाला व त्यातूनच औद्योगिक भूगोल या आधुनिक विद्याशाखेचा जन्म झाला.
साधनसंपत्ती भूगोल : साधनसंपदा भूगोल ही एक आर्थिक भूगोलाची स्वतंत्र आणि महत्त्वपूर्ण शाखा समजली जाते. साधनसंपदेचे वितरण, विकास आणि वापर ही आधुनिक साधनसंपदा भूगोलाची महत्त्वपूर्ण संकल्पना मानली जात असून या साधनसंपदेच्या अतिरिक्त वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, नष्ट होऊ पाहणाऱ्या साधनसंपदेचे संवर्धन व त्यास पर्यायी साधनसंपदा निर्माण करून त्यांचा विकास करणे इत्यादी घटकांचा अभ्यास साधनसंपदा भूगोलात केला जातो. मानवाच्या सर्व प्रकारच्या आर्थिक प्रक्रियेसाठी साधनसंपदा हाच घटक महत्त्वपूर्ण असतो. उदा., उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल; शेती व्यवसायासाठी जमीन, पाणी, खते, बी-बियाणे, कीटकनाशके, आवश्यक तेथे तंत्रज्ञान व मनुष्यबळ आणि मासेमारी व्यवसायासाठी सागरपृष्ठ, मत्स्यबीज, नद्या, सरोवरे, कालवे, बोटी, जहाजे, जाळे, मत्स्यबीज संवर्धन केंद्र, मस्त्यबीज वाढ व विकासासाठी आवश्यक असलेले पूरक हवामान आणि माशांचे अन्न म्हणून वापरले जाणाऱ्या शैवाल वनस्पतीसारख्या साधनसंपदेची आवश्यकता असते.
व्यापारी भूगोल : ही एक आर्थिक भूगोलाची प्रमुख शाखा आहे. प्राचीनकाळी जगामध्ये असलेली प्रादेशिक विभिन्नता व उत्पादनातील विविधतेमुळे वस्तूविनिमयातून व्यापार सुरू झाला, असे मानले जाते. व्यापारी भूगोलात जागतिक व्यापार प्रदेश, प्रमुख उत्पादने व त्यांचे उत्पादन व वितरण, आयात-निर्यात, व्यापारी संघटना, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यापार समतोल, जागतिक नाणेनिधी व जागतिक व्यापारी संघटना इत्यादी कालपरत्वे बदलणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो.
पर्यटन भूगोल : मानवी उत्क्रांतीबरोबरच पर्यटन व्यवसायाचा उगम झाला. बदलत्या परिस्थिती आणि जीवनशैलीनुसार पर्यटन स्थळांची निवड, विकास, पर्यावरणीय संवर्धन आणि नियोजनामध्ये भौगोलिक घटकांचे महत्त्व अधोरेखित झाल्यानंतर पर्यटन भूगोल ही आर्थिक भूगोलाची वेगळी शाखा अस्तित्वात आली. पर्यटन भूगोलामध्ये पर्यटन स्थळांचा उगम, स्थान, रचना, प्रकार, विकास; पर्यटन स्थळांचा व भेट देणाऱ्या पर्यटकांचा, पर्यटन स्थळांच्या सभोवताली निर्माण होणाऱ्या विविध व्यवसायांचा; तेथील पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक व राजकीय बाबींवर झालेल्या परिणामांचा; एखाद्या भौगोलिक प्रदेशाचे सर्वेक्षण करून मागणी व गरजेनुसार पर्यटन पूरक स्थळांची निर्मिती, विकास व नियोजन इत्यादी महत्त्वपूर्ण घटकांचा अभ्यास केला जातो.
विपणन भूगोल : प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय उद्योगधंद्यांमधून आणि व्यवसायांतून उत्पादित केल्या जाणाऱ्या वस्तू गरजेनुसार व मागणीनुसार व्यापाराच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी पोहोचविल्या जातात. उत्पादित वस्तू उत्पादन ठिकाणापासून ग्राहकापर्यंत पोहोचविणे गरजेचे असते. विपणन भूगोलामध्ये उत्पादित वस्तू ग्राहकापर्यंत कशी पोहोचविली जाते, त्यासाठी वस्तू वितरणाच्या कोणत्या माध्यमाचा वापर केला जातो, विपणनाचे भौगोलिक व प्रादेशिक वितरण आणि बाजारपेठांचे स्थान व वितरण काय आहे यांचा अभ्यास केला जातो.
वाहतूक भूगोल : वाहतूक भूगोल ही एक आर्थिक भूगोलाचीच प्रमुख उपशाखा आहे. या विद्याशाखेत वाहतुकीची विविध साधने, वाहतुकीच्या मार्गांचे जाळे, त्यांचा परस्परांशी असलेला सबंध व समायोजनाची क्षमता, त्यांचे प्रादेशिक विकासातील स्थान व सहभाग इत्यादी महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास केला जातो.
सामाजिक सेवेचा भूगोल : सामाजिक सेवेचा भूगोल ही एक आर्थिक भूगोलाची नव्याने निर्माण झालेली शाखा आहे. या शाखेमध्ये अनेक सामाजिक सिद्धांत, समाजशास्रीय संकल्पना, समाजातील विविधतेचा सामाजिक सेवेशी संबंधित असलेले विविध तत्त्वे आणि प्रक्रियांचा भौगोलिक प्रदेशनिहाय आर्थिक दृष्टीकोनातून तुलनात्मक अभ्यास केला जातो.
मनोरंजनाचा भूगोल : मनोरंजनात्मक साधनसुविधांची तरतूद खाजगी संस्था व मंडळे, शासकीय संघटना इत्यादींद्वारा केली जाते. उद्याने, क्रीडांगणे इत्यादींची गरज, विशेषत: आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खेड्यापाड्यांमध्ये, असते. बहुतेक सर्व शहरांतून नगरपालिकांमार्फत अशा प्रकारची व्यवस्था केली जाते. सार्वजनिक उद्याने, क्रीडांगणे, पोहण्यासाठी तलाव, सहलींसाठी निसर्गरम्य व प्रेक्षणीय स्थळे इत्यादी सुविधांचा त्यात अंतर्भाव होतो. नाटक-चित्रपटगृहे, सभागृहे, वाचनालये, व्यायामशाळा, संग्रहालये इत्यादींची तरतूदही केली जाऊन सार्वजनिक मनोरंजनाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर भागविल्या जातात. मोठमोठ्या शहरांतून प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये, क्रीडांगणे, संगीतसभागृहे इत्यादींचा अंतर्भाव असतो. या सर्व गोष्टींचा अभ्यास मनोरंजनाच्या भूगोलात केला जातो.
महत्त्व : आर्थिक भूगोल ही एकोणीसाव्या शतकामधील विकसित होत असलेली मानवी भूगोलाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण शाखा समजली जाते. पृथ्वीवर प्रचंड वेगाने होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाच्या म्हणजेच परिसराच्या संरक्षणाची गरज जगात सर्वत्र वाढत आहे. मानवाच्या आर्थिक उन्नतीसाठी केल्या जाणाऱ्या विविध क्रिया-प्रक्रिया पर्यावरणाची कळत-नकळत अविरत हानी करीत असतात. याची जाणीव व सभोवतालच्या परिसराच्या संरक्षणाचे स्मरण मानवी समाजाला करून देणे, त्याबद्दल जागृती निर्माण करणे हे आर्थिक भूगोल तज्ज्ञांचे तसेच अभ्यासकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. या दृष्टीने आर्थिक भूगोल या शाखेच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
संदर्भ :
- खतीब, के. ए., आर्थिक भूगोल, पुणे, १९९८.
- घारपुरे, विठ्ठल, आर्थिक भूगोल, नागपूर, २०१३.
- Katyayan, Arun, Fundamentals of Agriculture Vol-1, Varanasi, 2019.
- Majid, Hussain, Human geography, Nagar, Jaipur, 2018.
- Siddhartha, K., Economic Geography, Allahabad, 2018.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.