अँफिबोल गटातील कॅल्शियम-समृद्ध सिलिकेट खनिज. ॲक्ट‍िनोलाइट खनिजाचे नाव ॲक्ट‍िस (aktis;किरण) आणि लिथोज (lithos; दगड) या ग्रीक शब्दांवरून आले असून त्याच्या अर्थ किरणाकार स्फटिकरचने असा होतो. हे खनिज मॅग्नेशियम समृद्ध ट्रेमोलाइट आणि लोह समृद्ध फेरो-ॲक्टिनोलाइट यांमधील घटक आहे. रासायनिक संज्ञा Ca2(Mg,Fe)5(OH)2(Si4O11)2. यात मॅग्नेशियमच्या जागी लोह (Fe²⁺) २% पेक्षा अधिक प्रमाणात उपस्थित असते. लोहाचे प्रमाण अत्यल्प असल्यास ट्रेमोलाइट आणि लोहाचे प्रमाण वाढल्यास फेरो-ॲक्टिनोलाइट निर्माण होतो.

भौतिक गुणधर्म : रंग  फिकट ते गडद हिरवा, स्फटिक प्रणाली एकनताक्ष असून अँफिबोल गटाची दुहेरी साखळी सिलिकेट संरचना (Si₄O₁₁) यात आढळते. या  साखळ्यांमुळे ५६° आणि १२४° कोनातील विभंजन (cleavage) निर्माण होते. चमक काचेसारखी, पारदर्शकता पारभासी ते पारदर्शक, कठिनता ५-६, विशिष्ट गुरुत्व ३.०-३.२, आकार पात्यासारखे, स्तंभाकार, तंतुमय किंवा संपुंजित.

प्रकाशीय गुणधर्म : सूक्ष्मदर्शकाखाली ॲक्टिनोलाइट हिरवट रंगाचा दिसतो आणि मध्यम ते उच्च द्विवर्तन प्रदर्शित करतो. वर्णबदल हलक्या ते गडद हिरव्या छटा बदलताना आढळतात. ॲक्टिनोलाइट प्रामुख्याने मध्यम तापमान (३००–५००°C) व मध्यम दाबाच्या परिस्थितीत निर्माण झालेला हरित शिस्ट समजक (green-schist facies) आढळतो. अल्पसिलिक आग्नेय खडक, गॅब्रोंच्या रूपांतरणातून ते तयार होतात. प्लॅजिओक्लेज व पायरोक्सीन यांच्या अभिक्रियेमुळे ॲक्टिनोलाइट व क्लोराइट यांसारखी खनिजे तयार होतात.

आढळ : ॲक्टिनोलाइट खनिज रूपांतरित खडकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. कॅल्शियम-समृद्ध अवसादी खडक डोलोमाइट किंवा चुनखडक यांच्या रूपांतरणातून ट्रेमोलाइट–ॲक्टिनोलाइट निर्मिती होते. संपर्क रुपांतरण प्रक्रियेमुळे ग्रॅनाइट व इतर कॅल्शियम-समृद्ध खडकांमध्ये ते तयार होते. भारतामध्ये आर्कीयन व प्रोटोझोइक पट्ट्यांमध्ये विशेषतः कर्नाटक, राजस्थान व छत्तीसगड परिसरातील रूपांतरित खडकांमध्ये ते आढळते.

उपयोग : ॲक्टिनोलाइट हे निर्देशांक खनिज किंवा सूचक खनिज (index mineral) म्हणून हरित शिस्ट समजकचे निदर्शक आहे. त्याच्या उपस्थितीवरून भूगर्भीय इतिहासातील तापमान-दाब स्थितीचा अंदाज येतो. ट्रेमोलाइटपासून ॲक्टिनोलाइटकडे होणारा रासायनिक बदल हा लोहाच्या वाढत्या प्रमाणाचे द्योतक आहे, ज्यामुळे रूपांतरणीय श्रेणी समजण्यास मदत होते. तंतुमय ॲक्टिनोलाइट ॲस्बेस्टस गटात समाविष्ट असल्यास श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करून कर्करोगाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे खाणकाम व बांधकाम क्षेत्रात त्याचे हाताळणी करताना सुरक्षा उपाय आवश्यक असतात.

रासायनिक विविधता, हिरवा रंग, विशिष्ट विभंजन कोन आणि हरित शिस्ट समजकमधील उपस्थिती यांमुळे भूगर्भशास्त्रीय अभ्यासात त्याला विशेष स्थान आहे.

संदर्भ :

  • Deer, W.A., Howie, R.A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals, Longman, 1992.
  • Klein, C., & Dutrow, B. Manual of Mineral Science, Wiley, 2007.
  • Nesse, W.D. Introduction to Mineralogy, Oxford University Press, 2012.
  • Winter, J.D. Principles of Igneous and Metamorphic Petrology, Pearson, 2010.
  • Yardley, B.W.D.  An Introduction to Metamorphic Petrology, Longman, 1989.

                                                                                           समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.