अँफिबोल या प्रमुख खनिज गटातील हॉर्नब्लेंड ही अनेक साधर्मी असलेल्या खनिज घटकांची माला (Hornblende series) असून हे अँफिबोलाइट या खडकामध्ये मुख्य घटक असतात. आब्राहाम गॉटलोप व्हेर्नर यांनी १७८९ मध्ये एका जर्मन शब्दावरून हॉर्नब्लेंड हे नाव ठेवले. पूर्वी हा जर्मन शब्द कोणत्याही गडदरंगी प्रचिनाकार धातुकांत (कच्च्या रूपातील धातूंमध्ये) आढळणाऱ्या खनिजासाठी वापरीत असत; मात्र त्यातील धातू मिळविता येईल एवढ्या प्रमाणात ते त्यात नसते. यातील पाण्याच्या अंशामुळे हे तसे रुपांतरीत खडकांतील महत्त्वाचे खनिज आहे, पण प्राप्त परिस्थितीत अग्निज खडकामध्येही काही वेळा ते अल्प प्रमाणात आढळतात. क्वचित परिस्थितीत ते मुख्य खनिज रूपातही आढळतात. उदा., डायोराइट खडक (पातालिक – अंतर्वेधी प्रकारात). या खनिजाचे स्फटिक एकनताक्ष समूहाचे व प्रचिनाकार असतात. ते स्तंभाकार व तंतुमय रूपांत किंवा समांतर सुयांसारख्या स्फटिकसमूहांत आणि भरड व सूक्ष्मकणांच्या रूपांतही आढळते. पाटन (110) परिपूर्ण; कठिनता ५-६; विशिष्ट गुरुत्व ३.२; चमक काचेसारखी व तंतुमय प्रकाराची पुष्कळदा रेशमासारखी; रंग गडद हिरव्या ते काळ्या छटा; कस पांढरा वा रंगहीन; दुधी काचेप्रमाणे पारभासी; भंजन उपशंखाभ.

हॉर्नब्लेंड याची सामान्य रासायनिक संघटन (Ca, Na)(Mg, Fe, Al)5 (Al, Si)8 O22 (OH, F)2. ॲल्युमिनियम हे मूलद्रव्य ट्रेमोलाइटमध्ये नसते, तर हॉर्नब्लेंडमध्ये असते. हा यांत असलेला मुख्य रासायनिक फरक आहे. मॅग्नेशियम व लोह यांच्या बदलणार्‍या प्रमाणानुसार ही माला बनते. बंद नळीत हॉर्नब्लेंड तापविल्यास पाणी मिळते. स्फटिकाकार, पाटन व गडद रंग ही हे खनिज वेगळे ओळखण्याची वैशिष्ट्ये आहेत.

हॉर्नब्लेंड हे व्यापकपणे आढळणारे व रूपांतरित खडक निर्माण करणारे महत्त्वाचे खनिज असून ते जगभरातील रूपांतरित व अग्निज या दोन्ही खडकांत आढळते. शिलारसाच्या स्फटिकीकरणातील शेवटच्या टप्प्यांत व रूपांतरणातील मुख्यत: मध्यम विभाग टप्प्यात, पाण्याच्या सान्निध्यात पायरोक्सिनात बदल होऊन ते तयार होतात. रूपांतरणाने तयार झालेल्या हॉर्नब्लेंडला पुष्कळदा युरालिटिक हॉर्नब्लेंड किंवा युरलाइट म्हणतात.

संदर्भ :

  • https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=10175167

समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर