एक पारंपरिक चित्र

जंगली महाराज : (?—४ एप्रिल १८९०). सूफी, दत्त, नाथ आणि वारकरी अशा विविध धर्मसंप्रदायांशी संबंधित असलेले महाराष्ट्रातील एक धार्मिक सत्पुरुष. जंगली महाराज म्हणून परिचित. त्यांचे मूळ नाव मोहंमद शाह असे होते. त्यांचा जन्म आजच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी गावात झाला. त्यांचे बालपण होनमुर्गी जवळच्या आहिरवाडीत गेले. त्यांना बालपणापासूनच अध्यात्माची आवड होती. त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होती. ते एकपाठी होते. अक्कलकोटला गेल्यानंतर त्यांना ताहेरशाह कादरी यांच्याकडून सूफी संप्रदायाची दीक्षा प्राप्त झाली. त्यानंतर त्यांचा दत्त संप्रदायाशीही संपर्क आला. स्वामी समर्थ, नृसिंह सरस्वती, माणिकप्रभू अशा सत्पुरुषांशी त्यांची भेट झाली होती. पुढे त्यांनी नाथ संप्रदायी योग्यांसोबत योगसाधना केली. त्यांना मराठी, उर्दू, कन्नड, संस्कृत आणि फारसी भाषा अवगत होत्या. वेदवाङ्मय, ‘कुराण’ आणि इतरही धर्मग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता. ते व्यापक मानवतावादी दृष्टीने विचार करत असत. त्यांची कोणत्याही एका धर्माशी अथवा धर्मसंप्रदायाशी बांधिलकी नव्हती. ते स्वतः कष्ट करून उदरनिर्वाह चालवत. श्रमप्रतिष्ठेवर त्यांचा भर होता. अस्पृश्यता व जातिभेद यांचे ते कट्टर विरोधक होते.

सूफी संप्रदायाची दीक्षा मिळाल्यानंतर काही दिवसातच गृहत्याग करून त्यांनी भ्रमंतीला सुरुवात केली. जत, विजापूर, कुडची, जमखंडी, मिरज, नरसोबाची वाडी, रेठरे हरणाक्ष, नेर्ले, देहू, आळंदी आणि भांबुर्डे (पुणे) अशा विविध ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. तेथे अनेकजण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी रेठरे हरणाक्ष गावात एक मठही बांधला. तसेच घाट, धर्मशाळा, मठ, देवळे, मशिदी आणि दर्गे यांचे बांधकामही ठिकठिकाणी करविले. त्या त्या ठिकाणी सदावर्ते सुरू केली. या धर्मशाळा व मठांतून तसेच सदावर्तांमधून कोणत्याही जातिधर्मांच्या पांथस्थ स्त्री-पुरुषांना राहण्याची आणि जेवणाची सोय होती.

जंगली महाराजांची देहयष्टी उंचीपुरी व दणकट होती. ते कुस्तीचे रसिक होते. हमजाखान, बाबूमिया यांच्यासारखे पैलवान त्यांना मानत असत. भांबूर्ड्याला असताना त्यांनी रेड्याच्या झुंजी बंद करून कुस्त्यांचे आयोजन केले होते. ते लोकांना व्यायाम आणि कुस्ती शिकवत असत.

जंगली महाराजांवर वारकरी संप्रदायाचाही प्रभाव होता. लहानपणी त्यांनी संतचरित्रे आणि संतांचे ग्रंथ वाचले होते. आळंदी आणि देहूत वास्तव्य करत असताना त्यांची वारकरी संप्रदायाविषयीची गोडी वाढली. देहूत त्यांनी इंद्रायणीच्या घाटावर पुंडलिकाचे मंदिर बांधले. तुकाराम महाराजांचे जन्मस्थान ते निर्याणस्थान गोपाळपुरापर्यंतचा रस्ता आणि धर्मशाळाही बांधली. ग्राम प्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा झाडेही लावली. देहूत काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते पुण्यातल्या भांबुर्ड्याला (आजचे शिवाजीनगर) आले. त्या ठिकाणी असलेल्या रोकडोबा मंदिरात त्यांनी बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या. तिथे असलेल्या अनेक अघोरी धार्मिक प्रथा बंद करून अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. महाराजांना रिद्धिसिद्धी प्राप्त आहेत, असा प्रवाद असल्यामुळे सामान्य वारकरी मात्र त्यांच्यापासून दूर राहिले.

सद्गुरू श्री जंगली महाराज मंदिर, शिवाजीनगर, पुणे.

जंगली महाराजांनी भ्रमंती आणि वास्तव्य केलेल्या गावात त्यांचा शिष्यवर्ग होताच, त्याच बरोबर बडोदे, पुणे आणि मुंबईतही बराच शिष्यवर्ग होता. त्यांच्या शिष्यमंडळीत हिंदू, मुस्लीम, ब्राह्मण, शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया अशा विविध समाजस्तराचे लोक होते. त्यांच्याजवळ कोणताही भेदभाव नव्हता. भांबुर्ड्याचे इनामदार शिरोळे पाटील हे त्यांचे पहिले व प्रमुख अनुग्रहित शिष्य मानले जातात. रखुमाबाई गाडगीळ आणि तुळसाबाई इंगळीकर अशा कर्तृत्ववान महिलाही त्यांच्या शिष्या होत्या. लोकशाहीर पठ्ठे बापूरावांनी एका लावणीत गुरू म्हणून जंगली महाराजांचा उल्लेख केला आहे. सत्यशोधक विचारवंत कृष्णराव भालेकर यांनीही त्यांच्यावर पोवाडा रचला आहे. जमखंडी संस्थानचे अधिपती अप्पासाहेब पटवर्धन जंगली महाराजांना मानत असत.

जंगली महाराजांना धर्मगुरूंची दांभिकता व फसवेपणा याची चीड होती. त्यामुळेच पुढे त्यांची सत्यशोधक समाजाशी जवळीक निर्माण झाली. सत्यशोधक समाजाचे विचारवंत कृष्णराव भालेकर हे महाराजांचे शिष्य होते. ते जवळपास दोन वर्षे जंगली महाराजांच्या सहवासात त्यांच्या मठात राहिले. पुढे त्यांनी आळंदी येथे महाराजांकडून अनुग्रह घेतला. जंगली महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारसरणीतूनच कृष्णराव भालेकरांची वैचारिक जडणघडण झाली. भालेकरांचा वेदान्त, संतवाङ्मय आणि विविध धर्मग्रंथांचा अभ्यास महाराजांकडूनच झाला. जंगली महाराजांकडे वेदान्त शिकायला येणारे त्यांचे काही शिष्य मात्र व्यवहारात जातिभेद पाळत होते. अशांची भालेकरांना चीड होती. त्यामुळेच भालेकर केवळ आध्यात्मिक मार्गाने न जाता सामाजिक सुधारणेच्या मार्गाने गेले. जंगली महाराज, कृष्णराव भालेकर व महात्मा जोतिराव फुले यांच्यात सामाजिक प्रश्नांवर तात्त्विक चर्चा होत असत.

जंगली महाराजांच्या मार्गदर्शनाखाली १८८१ साली भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. हे भजनी मंडळ वारकरी संतांच्या अभंगांवर भजन करीत असे. तसेच मुक्ताई-ज्ञानदेव संवादाच्या अभंगांचे नाट्यरूप भजनी प्रयोग व संत एकनाथांच्या ‘हिंदू-तुरक संवाद’सारखी भारुडे सादर करत असे. सर्वसामान्य जनतेला संतविचारातील तत्त्वज्ञान सहजपणे अवगत करण्यासाठी नाट्यरूप भजन करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याच भजनी मंडळाकडून तुकाराम बीजेसाठी पुण्याहून देहूला पुंडलिकाची पालखी नेण्यात येते. त्याचबरोबर रेठरे हरणाक्ष येथील शिष्यांकडून रेठरे हरणाक्ष ते पंढरपूर असा ‘जंगली महाराज पालखी सोहळा’ आयोजित केला जातो.

पुण्यातील पाताळेश्वर लेण्यांच्या शेजारी जंगली महाराज मंदिर आहे, ते महाराजांच्या साधनेचे व समाधीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. तिथे दरवर्षी चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवस त्यांचा समाधी उत्सव साजरा केला जातो. इतर दिवशी पूजाअर्चा, आरती असे नित्यनेम पाळले जातात.

भांबुर्ड्यात त्यांचे निधन झाले. निधनानंतर एका बाजूला वारकरी संप्रदायाच्या प्रथेनुसार भजनी दिंडी काढण्यात आली, तर त्याचवेळी मुस्लीम धर्माला अनुसरून कुराण पठणही केले गेले. त्यांच्या पार्थिवाला विविध जातिधर्मांच्या लोकांनी खांदा दिला. व्यापक मानवतावादाची शिकवण देणारे थोर सत्पुरुष म्हणून जंगली महाराजांची सर्वत्र ख्याती आहे.

संदर्भ :

  • खांदवे, भाऊसाहेब, ‘दिनबंधु कृष्णराव भालेकर’, २०००.
  • बंडगर, ज्ञानेश्वर, ‘होय होय वारकरी’, कोल्हापूर, २०२४.
  • मोरे, सदानंद, ‘तुकाराम दर्शन’, पुणे, १९९६.
  • रेगे, डी. डी. ‘श्री सद्गुरु जंगली महाराज’, पुणे,

समीक्षक : श्यामसुंदर मिरजकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.