नाथ संप्रदायातील स्त्रिया. नाथ संप्रदायात नाथ योगींबरोबरच नाथ योगिनींनाही खूप महत्त्व आहे. या संप्रदायात शिवाबरोबरच शक्तीची उपासनाही प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथ कौल-योगिनी संप्रदायाचेही प्रवर्तक मानले जातात. तसेच नाथ-योगींबरोबर अनेक नाथ-योगिनींचे संदर्भ ग्रंथ, आख्यायिका व शिल्प यांमधून दिसून येतात. नाथ संप्रदायाच्या गुरू-शिष्य परंपरेमध्ये आदिनाथ व गिरिजा यांच्यानंतर मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ व इतर नाथ-योगींची क्रमवारी पाहायला मिळते. या संप्रदायात चामुंडा, त्रिपुरासुंदरी, हिंगलजा, भैरवी, बालसुंदरी यांची पूजा प्रचलित आहे. मत्स्येंद्रनाथांच्या बऱ्याच प्रतिमा या शाक्त मंदिरांजवळ आढळून आलेल्या आहेत. परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील खुराची देवी मंदिरात त्यांची प्रतिमा गर्भगृहात कोरण्यात आलेली आहे. गोरक्षनाथांच्या मते, ‘शक्तियुक्त शिव’ हेच अंतिम सत्य आहे. हे शिवतत्त्व शक्तियुक्त आहे. परंतु शक्ती ही शिवाहून भिन्न नसून ती तदंतर्गतच आहे. नाथपंथीयांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही योगसाधनेची दीक्षा दिली होती. एकंदरीत नाथ संप्रदायात शक्ती उपासनेचे महत्त्व दिसून येते.

नाथ-योगिनींचे एक शिल्प.

नाथ संप्रदायाच्या उदयापासून अनेक स्त्रिया नाथ संप्रदायात दीक्षित झालेल्या दिसून येतात. मयनावती, गोरक्षशिष्या मुक्ताबाई, विमलादेवी, आउसा व निवृत्तिशिष्या मुक्ताबाई अशा नाथ योगिनींची नावे सांगता येतील. शिवाय या संप्रदायात चौऱ्यांशी सिद्धांनाही महत्त्व असल्याकारणाने त्यात कनखला, मेखला, लक्ष्मींकारा व मनीभद्रा नावाच्या सिद्धिनी, नाथ संप्रदायाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानाव्या लागतील. कनखला व मेखला ह्या कानिफनाथांच्या शिष्या होत. नाथ संप्रदायातील काही तांत्रिक साधना नाथ-योगिनींशिवाय पूर्ण मानल्या जात नाहीत.

नाथ संप्रदायात विमलादेवी ही गोरक्षनाथांची प्रत्यक्ष शिष्या होती. नाथ संप्रदायातील १२ उपपंथांपैकी ‘आई’ पंथाची प्रवर्तक विमलादेवी समजली जाते. विमलामाईचा पंथ म्हणून हा ‘माईपंथ’ वा ‘आईपंथ’ म्हणून ओळखला जातो. या पंथाचे रोहतक व हरिद्वार येथे मठ आहेत. दाबिस्तानात आई पंथाचा उल्लेख येतो.

गोरक्षशिष्या मुक्ताबाईचे नाव नाथ संप्रदायात आदराने घेतले जाते. तिचा संदर्भ लीळाचरित्रात लीळा क्र. २२-२४ (पूर्वार्ध) दरम्यान ‘मुगुताबाई’ असा आलेला आहे. महानुभावीय परंपरेत सुरक्षित असलेल्या संक्षिप्त चरित्रामुळे आद्य मुक्ताबाईच्या जीवनाविषयी महत्त्वाची माहिती मिळते. लीळाचरित्रानुसार मुक्ताबाई विदर्भातील एलिचपूरच्या राजाची कन्या होती व नंतर उज्जैनच्या विक्रमादित्याची राणी बनली. तिने आपला दीर भर्तृहरीपासून परमार्थप्रेरणा प्राप्त केली होती. गोरक्षनाथांनी तिचे मूळचे ‘सत्यवंती’नाव बदलून ‘मुक्ताबाई’ असे नवीन सांप्रदायिक नाव तिला दिले होते. विरागी बनल्यावर ती श्रीशैलम पर्वतावर आश्रम उभारून योगसाधनेत मग्न झाली आणि योगिनी म्हणून तिची ख्यातीही झाली. महानुभाव पंथाचे प्रवर्तक चक्रधर व तिची भेट श्रीशैलम पर्वतावर तिच्या आश्रमात झाली होती. तिचा उल्लेख तत्त्वसार  व षट्स्थळ  या ग्रंथांत चांगदेवाचा गुरू म्हणून आलेला आहे. विसा खेचर आपल्या षट्स्थळ ग्रंथात आपली गुरू-शिष्य परंपरा आदिनाथ-मत्स्येंद्र-गोरक्ष-मुक्ताबाई-चांगा वटेश्वर-विसा खेचर अशी सांगतात. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात सालबर्डीच्या डोंगरावर गोरक्षशिष्या मुक्ताबाईचे भव्य समाधीमंदिर आहे.

लीळाचरित्रातील मुक्ताबाई व ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई ह्या भिन्न व्यक्ती सांगितल्या जातात. ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेल्या. या मुक्ताबाईला निवृत्तिनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली होती. रा. चिं. ढेरे यांच्या मते, चांगदेवाची मूळ गुरू गोरक्षशिष्या मुक्ताबाईच होती. परंतु ती दिवंगत झाल्यानंतर महाराष्ट्रात गाजत असलेल्या ज्ञानेश्वर मंडळातील बालयोगिनी मुक्ताबाईला त्यांनी गुरू म्हणून स्वीकारली असावी. आद्य मुक्ताबाईचा योगाचा संवाद त्यांना या द्वितीय मुक्ताबाईत आढळला आणि म्हणूनच त्यांनी तिचा सर्वभावे मुक्ताबाईचा पुनरावतार म्हणूनच स्वीकार केला.

ज्ञानदेवभगिनी मुक्ताबाईची गुरू-शिष्य परंपरा आदिनाथ-गोरक्षनाथ-गहिनीनाथ-निवृत्तिनाथ-मुक्ताबाई-चांगा वटेश्वर (चक्रपाणी)-विमलानंद-चांगा केशवदास-जनकराज-नृसिंह अशी आहे. मुक्ताबाईचा चांगा वटेश्वराशिवाय ‘चैतन्य’ नामक आणखी एक शिष्य असल्याचे सत्यमालनाथांनी सांगितले आहे.

बंगाल प्रांतातील गोविंदचंद्राची आई मयनावती ही जालंधरनाथांची शिष्या होती. तिने आपल्या पुत्रालादेखील नाथ संप्रदायात येण्याचे आवाहन केले होते. चक्रधरस्वामींची शिष्या ‘आउसा’ ही पूर्वी नाथपंथाची दीक्षित होती. ‘दीक्षिताची कन्या : उपासनियाची सून : नाथपंथी उपदेशु:’ असे तिचे वर्णन लीळाचरित्रात आले आहे. गोरक्षनाथांचा नामोच्चार करूनच ती भिक्षा मागत असे. या व्यतिरिक्त बहुडी योगिनीचा संदर्भ लीळाचरित्रातून प्राप्त होतो.

महाराष्ट्रातील काही मंदिरांवर नाथ संप्रदायाच्या अनुषंगाने नाथ-योगिनींचे शिल्पांकन केल्याचे दिसून येते. काही नाथ-योगिनी योगमुद्रेत साकारल्या आहेत. रत्नागिरी येथील पन्हाळे-काजी, बीड येथील कंकाळेश्वर मंदिर, ब्राह्मणी, दभोई व श्रीशैलम येथील वास्तूंवर नाथ-योगिनींची शिल्पे कोरण्यात आलेली आहेत. ओडिशा राज्यातील मेघेश्वर मंदिरातील एका शिल्पात गोरक्षनाथांसमवेत काही योगिनीही दाखविल्या आहेत. त्यांना या प्रतिमांमध्ये दंड, कर्णकुंडले, यज्ञोपवित, योगपट्टा इ. समवेत दर्शविले गेले आहे.

संदर्भ :

  • Sarde, Vijay, Archaeological Investigations of the Natha Sampradaya in Maharashtra (C.12th to 15th century CE), unpublished thesis submitted to the Deccan College, Pune, 2019.
  • कोलते, वि. भि., संपा., लीळाचरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७८.
  • ढेरे, रा. चिं. श्रीपर्वताच्या छायेत, पुणे, २०१५.

                                                                                                                                                                                    समीक्षक : अभिजित दांडेकर