अँफिबोल समूहातील एक महत्त्वाचे खनिज. रासायनिक संज्ञा (Mg,Fe)₇Si₈O₂₂(OH)₂. यामध्ये मॅग्नेशियम (Mg) आणि लोह (Fe) यांचे प्रमाण बदलते. लोहाचे प्रमाण वाढल्यास रंग अधिक गडद दिसतो. हे जलयुक्त सिलिकेट (Hydrous silicate) असून त्यामध्ये हायड्रॉक्सिल (OH) गट असतो. सिलिकॉन आणि ऑक्सिजन मिळून तयार झालेल्या सिलिकेट संरचनेत मॅग्नेशियम व लोह आयनांची भर असते.

भौतिक गुणधर्म : रंग : करडा, तपकिरी, हिरवट-तपकिरी किंवा पिवळसर-तपकिरी. लोहाचे प्रमाण वाढल्यास रंग अधिक गडद दिसतो. रेषा पांढरी ते करडी. चमक काचेसारखी ते मोत्यासारखी. तंतुमय प्रकारात रेशमी चमक दिसते.

पारदर्शकता अर्धपारदर्शक ते अपारदर्शक. कठिनता ५.५ — ६. त्यामुळे ते काचेला थोड्याफार प्रमाणात ओरखडा देऊ शकते. विशिष्ट गुरुत्व २.८ ते ३.२. विदलन दोन दिशांत स्पष्ट, सु. ५६° आणि १२४° कोनांत छेदतात. हे अँफिबोल समूहाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. भंजन असमान किंवा तंतुमय. स्फटिक प्रणाली समचतुर्भुजी. स्फटिक प्रामुख्याने स्तंभाकार किंवा तंतुमय रूपात आढळतात. स्फटिक प्रवृत्ती लांब, सुईसारखे  किंवा तंतुमय स्फटिक; काही वेळा मोठे दंडगोलाकार स्फटिक. तंतुमय प्रकारात खडबडीत स्पर्श, तर सघन प्रकारात घट्ट व कणखर रचना.

अँथोफिलाइटचे हे भौतिक गुणधर्म त्याला अँफिबोल समूहातील इतर खनिजांपासून वेगळे ओळखण्यास मदत करतात. विशेषतः ५६° – १२४° विदलन कोन, मध्यम कठीणपणा आणि तंतुमय/स्तंभाकार स्फटिकरूप ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.

प्राप्तिस्थान : अँथोफिलाइट प्रामुख्याने उच्च श्रेणीच्या रूपांतरित खडकांमध्ये, विशेषतः नाइस, शिस्ट आणि अतिमॅफिक खडकांमध्ये आढळते. मॅग्नेशियमयुक्त खडकांच्या रूपांतरामुळे याची निर्मिती होते.

फिनलंड, अमेरिकेचे संयुक्त संस्थाने, नॉर्वे आणि कॅनडा येथे प्रमुख साठे आढळतात. विशेषतः फिनलंडमध्ये याचे उत्कृष्ट स्फटिक आढळतात. भारतात अँथोफिलाइटचे साठे झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू आणि राजस्थान येथे आढळतात. विशेषतः धारवाड क्रेटॉन प्रदेशात आणि दक्षिण भारतातील रूपांतरित पट्ट्यांमध्ये याची नोंद आहे.

संदर्भ :

  • Deer, W.A., Howie, R.A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals, Longman, 1992.
  • Walter Schumann,Robert Bradshaw, Handbook of Rocks, Minerals, and Gemstones, 1993.
  • Nesse, W. D., Introduction to Optical Mineralogy, Oxford University Press, 2004
  • Read, H., Rutley’s  Elements of Mineralogy, 24th edition, Londan, 1947.

         समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.