(पुष्कराज). ॲल्युमिनियम आणि फ्ल्युओरीनपासून बनलेले एक सिलिकेट खनिज. रासायनिक संज्ञा : Al₂SiO₄(F,OH)₂. फ्लोरिनचे प्रमाण जास्त असल्यास स्फटिक अधिक स्थिर असतो. ‘टोपॅझ’ शब्द ग्रीक टोपॅझिऑनपासून आल्याचे मानले जाते. ‘टोपॅझ’ हा संस्कृत शब्द ‘तपस’शी संबंधित असू शकतो, त्याचा अर्थ ‘उष्णता’ किंवा ‘अग्नी’ असा होतो. बहुतेक टोपॅझ अग्निजन्य खडकांच्या शिरा आणि फटींमध्ये स्फटिकांच्या रूपात वाढतात.

टोपॅझ पेग्मटाइटच्या पोकळ्यांमध्ये किंवा रायोलाइट खडकाच्या कुहरांमध्ये आणि आंतरकणीय जागेमध्ये आढळतो. टोपॅझ स्फटिक मॅग्मा थंड होण्याच्या शेवटच्या टप्प्यात वाढत असून वायुमुक्त तंत्राचा अवलंब करताना स्फटिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले फ्ल्युओरीन सोडतात. समचतुर्भुजी प्रणालीत टोपॅझ स्फटिक बनतो.

भौतिक गुणधर्म : स्फटिक रूप स्तंभाकार, स्फटिक सामान्य, रंग रंगहीन, पिवळा, निळा, गुलाबी, तपकिरी किंवा हिरवा.

सामान्य टोपॅझ त्याच्या नैसर्गिक अवस्थेत रंगहीन असतो. परंतु सूक्ष्म घटकांच्या अशुद्धतेमुळे तो फिकट निळा किंवा सोनेरी-तपकिरी ते पिवळा-नारिंगी रंग धारण करतो. टोपॅझचा रंग त्याच्या मूलभूत रासायनिक रचनेच्या घटकापेक्षा त्याच्या स्फटिक रचनेतील अशुद्ध घटकांमुळे होतो. क्रोमियम घटकामुळे टोपॅझमध्ये नैसर्गिक गुलाबी, लाल आणि जांभळा रंग दर्शवतो. टोपॅझ स्फटिक रचनेत अणू पातळीवरील अपूर्णतेमुळे पिवळा, तपकिरी आणि निळा रंग धारण करतो. तपकिरी रंगाच्या टोपॅझला काही वेळा ‘स्मोकी क्वार्ट्झ ’ समजून फसगत होते.

चमक काचेसारखी, विदलन अत्यंत स्पष्ट, एका दिशेत (तलस्थ), कठिनता ८ (काठिण्य जास्त असले तरी त्यातील स्पष्ट विदलनामुळे तो तुटण्याची शक्यता असते). टोपॅझ मॉझ कठिनता मापनपट्टी मधील सूचक खनिजांपैकी एक आहे. भंग शंखाभ, विशिष्ट गुरुत्व ३.४– ३.६, जवळजवळ हिऱ्याइतके आहे.

रंगहीन टोपॅझ मुबलक प्रमाणात आढळतो आणि त्याला निळा रंग देण्यासाठी अनेकदा त्यावर प्रक्रिया केली जाते. निळ्या टोपॅझला लंडन ब्लू टोपॅझ, स्विस ब्लू टोपॅझ, इम्पिरियल टोपॅझ किंवा स्काय ब्लू टोपॅझ अशी नावे आहेत.

इम्पिरियल टोपॅझ हा मध्यम लालसर नारिंगी ते नारिंगी-लाल रंगाचा असून तो रत्नाच्या सर्वांत महागड्या रंगांपैकी एक आहे.

प्रकाशीय गुणधर्म : आकार सामान्यतः दाणेदार किंवा लहान त्रिकोणी स्फटिक. रंग साधारणतः रंगहीन. वर्णबदल हलका (फिकट) ते मध्यम. (विशेषतः निळ्या/गुलाबी प्रकारात). उठाव मध्यम, विदलन एक दिशेत स्पष्ट विदलन रेषा दिसतात. अपवर्तनांक १.६१–१.६४.

काट निकोलखालील गुणधर्म : द्विवर्तन मध्यम (सु. ०.००८–०.०१०), विलोपन समांतर, यमलन काही स्फटिकात सामान्य यमलन दिसते. व्यतिकरण रंग प्रथम श्रेणीतील फिकट पिवळे किंवा राखाडी असून टोपॅझ द्विदिशखनिज असल्यामुळे स्पष्ट व्यतिकरण रंग दर्शवितो.

प्राप्तिस्थान : टोपॅझ मुख्यतः ग्रॅनाइट पेग्मटाइट, रायोलाइट व टिन-धातुक ग्रॅनाइट खडकांत आढळतो. उच्च तापमानाच्या शिरांमध्ये, उष्णजलीय द्रवांमधून क्वार्ट्झ, कॅसिटेराइट (SnO₂) इत्यादींसह टोपॅझ स्फटिक तयार होतात. तसेच टिन आणि टंगस्टन धातुक क्षेत्रांशी टोपॅझच्या स्फटिकीकरणाशी निकट संबंध असतो. प्लेसर निक्षेपटोपॅझ कठीण व रासायनिक दृष्ट्या स्थिर असल्यामुळे अपक्षय प्रक्रियेनंतर रत्न गुणवत्तेचे स्फटिक नदीकिनारी व गाळात निक्षेपित होतात.

राजस्थान, झारखंड, ओडिशा व आंध्र प्रदेश येथे पेग्मटाइट खडकांत टोपॅझ आढळतो. राजस्थानातील काही भागात रत्नगुणवत्तेचे नमुने मिळतात. जागतिक स्तरावर ब्राझील हा टोपॅझचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. विशेषतः मिनास जेराइस प्रांत उत्कृष्ट निळा व इम्पिरियल टोपॅझसाठी जगप्रसिद्ध; रशिया -उरल पर्वतरांग, पाकिस्तान- कट्लंग व गिलगिट क्षेत्र, श्रीलंका- प्लेसर निक्षेप. मेक्सिको, यूएसए (उटा., कोलोरॅडो) येथेही टोपॅझ आढळतो.

संदर्भ :

  • Bastos F.M. The Gemstones of Brazil, Gems & Gemology, Vol. 10, No. 7, pp. 195-201,1961.
  • Dickinson,C. and Moore, W.J. Paramagnetic Resonance of Metal Ions and Defect Centres in Topaz,Journal of Physical Chemistry, Vol. 71, No. 2, pp. 231-240, 1967.
  • Menzies A. The Mineralogy, Geology and Occurrence of Topaz, Mineralogical Record, Vol. 26, No. 1, pp. 5-53, 1995.
  • Ramchandran,T. & Panjikar J. Gemstones -Properties & Identification, Pangem Publishers,  Pune, 2016.
  • Simon & Schuster’s, Guide to Gems and Precious Stones, K. Lyman, 1996.

समीक्षक : उदय कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.