अंतुले, अब्दुल रेहमान : (९ फेब्रुवारी १९२९ – २ डिसेंबर २०१४). महाराष्ट्र राज्याचे नववे मुख्यमंत्री. त्यांचा जन्म रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या आंबेत (जि. रायगड – पूर्वीचे कुलाबा) येथे गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची  असताना सुद्धा अंतुले यांच्यावर उत्तम संस्कार घडून आले. त्यांच्या जडणघडणीत आई जोहराबाई व वडील हाफीज अब्दुल गफूर यांचा मोठा वाटा होता. अंतुले यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर माध्यमिक शिक्षण मुंबई येथील अंजुमन इस्लाम हायस्कूलमध्ये झाले. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी स्वत:च्या गावात बोटी लावण्यासाठी लागणाऱ्या धक्क्याचे बांधकाम सार्वजनिक वर्गणीतून व स्वत: पाठीवर सिमेंटची पोती वाहून पूर्ण केले. त्यामुळे येथूनच त्यांच्या सामाजिक कार्याची, तसेच सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. पूढे ‘इस्माईल युनूस महाविद्यालय’ मुंबई येथून ते बी. ए. झाले. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक सांस्कृतिक-सामाजिक कार्यांत सहभाग घेऊन स्वतःचे व्यक्तित्व विकसित केले. बी. ए. नंतर वकिलीच्या शिक्षणास ते इंग्लंडला गेले. तेथे शिकत असताना सोव्हिएत एनसायक्लोपिडिया या ग्रंथात महात्मा गांधींबद्दल असलेल्या खोडसाळ मजकुराची दखल घेऊन त्यांनी आंदोलन उभारले होते. त्यांनी लंडनच्या ‘लिनकोलन्स इन्न’ येथून बॅरिस्टर पदवी मिळविली. इंग्लंडहून परतल्यानंतर वयाच्या तिसाव्या वर्षी अंतुलेंचा विवाह भिवंडी येथील नर्गीस हिच्याशी झाला. त्यांना तीन मुली व एक मुलगा आहे.

बॅरिस्टर अंतुले यांना आपला गाव ते आपला देश यांबद्दल आत्यंतिक प्रेम व अभिमान होता. त्यांनी गावापासून ते देशपातळीपर्यंत सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रांत निरनिराळ्या प्रकारचे काम करून आपला ठसा उमटविला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षांपासून ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त होते. सर्वप्रथम १९५७ मध्ये बॅरिस्टर अंतुले यांची ‘अखिल भारतीय काँग्रेस समिती’ वर सदस्य म्हणून निवड झाली. त्यांनी आपल्या बुद्धिचातुर्य व कष्टाने दिल्लीच्या नेत्यांवर छाप पाडली, तर दुसरीकडे गावातल्या सुधारणांसाठी ‘गावसुधार नवजीवन समिती’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत पूल बांधणे, रस्ते बांधणे, गावागावात एस. टी. ची बससेवा करणे अशा बऱ्याच महत्त्वाच्या ग्राम सुधारणा त्यांनी केल्या. कुलाबा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कामगारांशी व जनतेशी जनसंपर्काद्वारे व मोहिमांद्वारे गांधीजींचे विचार घराघरांत पोहचविण्याचे कठीण काम त्यांनी केले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींनी १९६० मध्ये त्यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनविले. या काळात त्यांचा राज्यातील सर्व नेत्यांशी संपर्क वाढून, इंग्लंडला जाणाऱ्या युवक काँग्रेसच्या शिष्ट मंडळात त्यांची निवड झाली. नंतर ते कुलाबा जिल्ह्याचे अध्यक्ष झाले. एकंदर बॅरिस्टर अंतुले यांच्या पक्षहितासाठी असलेली धडपड पाहून १९६२ च्या कुलाबा विधानसभा निवडणूकीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यामध्ये आपल्या संघटन कौशल्यामुळे ते तरुण व तडफदार आमदार म्हणून निवडून आले. या वेळी ते पक्षाच्या सरचिटणीसपदी होते. त्यानंतर १९६७ ला परत निवडून येऊन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करून राज्यमंत्री बनविले. तसेच १९६९-७२ या काळात त्यांच्याकडे विधी, न्याय, मत्सव्यवसाय, छोटी बंदर विकास, शिक्षण, इमारती आणि दळणवळण अशी महत्त्वाची खाती देण्यात आली. त्यांनी सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. १९७२ ते १९७६ पर्यंत ते मुंबईतील ‘अंजुमन-ए-इस्लाम’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष होते.

राष्ट्रपती राजवटीत १९८० मध्ये निवडणूका होऊन ९ जून १९८० रोजी बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्र राज्याचे नववे मुख्यमंत्री झाले. तडकाफडकी निर्णय घेणे हे त्यांचे वैशिष्ट्य. मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत त्यांनी त्वरीत निर्णय घेऊन ७ लाख ८० हजार शेतकऱ्यांची ४९ कोटी रुपयांची कर्जे माफ केली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनपेक्षा निराधारांना मिळणारी रक्कम (६० रुपये) जास्त होती, म्हणून बॅरिस्टर अंतुलेंनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पेन्शन कमीतकमी ६० रुपये केले. थळ-वायशेत खत प्रकल्प, मानखुर्द-नवी मुंबई रेल्वे प्रकल्प, चार लघुबंदरांच्या विकासाचे प्रकल्प इत्यादी प्रकल्प त्यांनी घडवून आणले. रत्नागिरी व औरंगाबाद या जिल्ह्यांचे विभाजन, लातूर, जालना, सिंधुदुर्ग ही नवे महसुली विभाग, तसेच कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नामकरण असे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. मराठी विश्वकोशाची गती वाढावी यासाठी त्यांनी स्वायत्तता दिली होती. बॅरिस्टर अंतुलेंनी आपल्या साधारणता दीड वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत अनेक महत्त्वपूर्ण कार्य केलीत; परंतु काही कारणास्तव त्यांनी जानेवारी १९८२ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री (१९८५-८१९), तसेच अतिरिक्त प्रभार म्हणून जल संसाधनमंत्री (१९९५-९६) आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक व्यवहार (२००४-०६) अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

बॅरिस्टर अंतुले यांना वाचन व लेखनाची आवड होती. त्यांनी लिहिलेल्या अपॉइन्मेंट ऑफ ए चीफ जस्टिस आणि पार्लमेंटरी प्रिव्हिलेजेस या दोन ग्रंथांतून त्यांचे लेखनकौशल्य दिसून येते. त्यांनी महाजन रिपोर्ट – अनकव्हर्ड आणि डेमॉक्रसी – पार्लमेंटरी ऑर प्रेसिडेन्शिअल ही दोन पुस्तके सुद्धा लिहिली आहेत.

अंतुले यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ : मेहेंदळे, विश्वास, यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण, पुणे, २०१२.

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.