नाईक, सुधाकरराव : महाराष्ट्र राज्याचे माजी  मुख्यमंत्री, एक उत्तम प्रशासक व संघटक नेता. त्यांचा जन्म विदर्भातील गहुली जि. यवतमाळ येथे वडील राजुसिंग उर्फ बाबासाहेब आणि आई पार्वतीबाईया सधन शेतकरी कुटुंबात झाला. महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भुषविणारे वसंतराव नाईक यांचे ते पुतणे होय. सुधाकरराव यांचे बालपण सुखात गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुसदमधील नगरपरिषद शाळा क्र. २मध्ये झाले; तर १९५२ मध्ये दौलतखान, ए. व्ही. स्कूलमधून ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी मॉरिस महाविद्यालय, नागपूर (सध्याचे वसंतराव नाईक सामाजिक विज्ञान संस्था) येथे प्रवेश घेतला; परंतु काही दिवसांनी तेथील शिक्षण सोडून अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय (व्ही. एम. व्ही.) येथे बी. ए. ला प्रवेश घेऊन पदवी मिळविली. शिकत असताना महाविद्यालयातील निवडणुकांत स्वत: सहभागी न होता राजकीय डावपेच आखून आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यात ते तरबेज होते. बी. ए. नंतर त्यांनी शिवाजी विधी महाविद्यालय, अमरावती येथे कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि१९५९मध्ये कायद्याची पदवी संपादन केली; मात्र प्रत्यक्षात ते वकिली न करता स्वत:स समाजकार्यासाठी वाहून घेतले. त्यांच्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांचा प्रभाव होता. १९६०मध्ये वर्धा येथील सुमन पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून तेसुद्धा सामाजिक व शैक्षणिक कार्ये करीत आहेत.

सुधाकरराव यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात स्वत:च्या गावातूनच सरपंच पदापासून केली. त्यांनी समाजातल्या सामान्य माणसांबरोबर आपली नाळ जोडून त्यांच्या हितासाठी अनेक कार्ये केली. १९६२ते १९७२या काळात त्यांनी ग्रामीण भागातल्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी, निवासासाठी वसतीगृहे, शेतीचा विकास इत्यादी कामे केली. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन त्यांनी भूसंपादनाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे सचिव, तर १९७७मध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवड अशी त्यांची बढती होत राहिली.

काँग्रेस पक्षाने १९७८च्या महाराष्ट्र विधानसभेच्या वाशिम मतदारसंघात आमदारकीची तिकिट त्यांनादिली व ते निवडून आले. या काळात त्यांनी अनेक समाजहिताची कामे केली. त्यामुळे जनतेनी त्यांना पुढे१९८०, १९८५, १९९०आणि १९९९अशी एकूण पाच वेळा सलग निवडून दिले. ते एकूण १३ वर्षे राज्याचे मंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांच्याकडे शिक्षण, महसूल, गृहनिर्माण, दुग्धविकास, उर्जा, समाजकल्याण, सांस्कृतिक, पशुसंवर्धन, मत्सव्यवसाय, उद्योग, पुनर्वसन अशी महत्त्वपूर्ण खाती होती; त्यांनी ती कुशलतापूर्ण सांभाळली. महसूलमंत्री असताना त्यांनी वाड्या व तांड्यांना गावाचा दर्जा दिला; तर शिक्षणमंत्री असताना शिक्षणविषयक धोरणांच्या सर्वांगीण विकासासाठी तज्ज्ञ समिती नेमूण अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना, तंत्रनिकेतन, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मुलींसाठी प्रियदर्शनी वसतीगृहे इत्यादी कार्ये केली. अमरावती विद्यापीठाची (सद्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) निर्मिती त्यांच्याच कार्यकाळातली होय.

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर (१९९१) पी. व्ही. नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना केंद्रीय मंत्रीमंडळात संरक्षण या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी सोपविली. त्यामुळे २५ जून १९९१ रोजी शरद पवार यांनी आपले विश्वासू मित्र सुधाकरराव यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घोषित केले. त्या वेळी एकाच कुटुंबातला दुसरा व्यक्ती मुख्यमंत्री होणारा हा पहिलाच नेता होय. पदभार सांभाळताच सुधाकरराव यांनी काही कठोर परंतु योग्य निर्णय घेणाकरिता प्रशासनात शिस्त लावली. प्रथमत: त्यांनी एकूण बारा महामंडळांच्या अध्यक्षांचा कॅबिनेट दर्जा काढून त्यांना दिलेल्या लाल दिव्याच्या गाडीची सोय रद्द केली. महाराष्ट्रात पडलेल्या तीव्र दुष्काळी परिस्थितीला खंबीरपणे तोंड देऊन’जलसंधारण’ या नवीन खात्याची निर्मिती केली आणि ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा ध्यास घेतला. महिला व बालकांच्या आरोग्य आणि विकासाकडे लक्ष देऊन ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची निर्मिती केली. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी जादा पोलीसदल उभारले. बारा वर्षांपासून न झालेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका त्यांच्या कारकीर्दित प्रथमच झाल्या. त्यांनी दादर चैत्यनभूमीच्या नुतनीकरणासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले. सुधाकरराव यांनी आपल्या २० महिन्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण समाजोपयोगी कामे केलीत; परंतु अयोध्येतील बाबरी मशीद प्रकरणामुळे त्यांनी ५ मार्च १९९३ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जून १९९४ मध्ये त्यांची हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नेमणूक झाली. या काळात त्यांनी हिमाचल प्रदेशाच्या विकासकामातसुद्धा जातीने लक्ष दिले; परंतु तेथे फार काळ त्यांचे मन रमले नाही. त्यांनी १० सप्टेंबर १९९५ रोजी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला.

१९९८ मध्ये झालेल्या वाशिम लोकसभा निवडणुकीत सुधाकरराव विजय मिळवून अखील भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस झाले. पुढे १९९९ मध्ये काही कारणात्सव शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. याच वर्षी विधानसभेच्या निवडणुका होऊन राष्ट्रवादी पक्षाकडून सुधाकरराव विजयी झाले आणि जलसंधारण खात्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आले.

सुधाकरराव हे पदावर असतानाच त्यांना पक्षाघाताचा झटका येऊन त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

संदर्भ : गाडे, सोपान, श्री सुधाकरराव नाईक, पुणे.

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.