खाँ, असद अली : (१ डिसेंबर १९३८—१४ जून २०११). अभिजात भारतीय हिंदुस्थानी संगीतातील जयपूर बीनकर घराण्याचे रुद्रवीणावादक. त्यांचा जन्म अलवर, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांच्या घराण्यात रुद्रवीणा वादनाची सुरुवात १८ व्या शतकात त्यांचे पूर्वज शाहजी साब यांच्यापासून झाली. त्यांचे पणजोबा रब्बज अली खाँ जयपूरच्या दरबारातील संगीतकारांचे प्रमुख होते. आजोबा मुशर्रफ खाँ अलवर येथे दरबारी संगीतकार होते आणि वडील सादिक अली खाँ ३५ वर्षे अलवरच्या दरबारात तसेच रामपूरच्या नवाबांकडे संगीतकार म्हणून कार्यरत होते. असद अली खाँ ११ व्या पिढीतील खंडारबानी धृपद शैलीचे प्रतिनिधी मानले जातात.
असद अली खाँ सुरांच्या सोबतीत लहानाचे मोठे झाले. त्यांच्या घरी वडिलांचा रात्री सुरू झालेला रियाज पहाटे पर्यंत चालत असे. त्यावेळी तान्ह्या असद अली खाँ यांना त्यांची आई वडिलांच्या खोलीत नेऊन ठेवीत असे. वयाच्या ५ व्या वर्षानंतर त्यांच्यासाठी वडिलांनी छोटा तानपुरा आणला आणि तेव्हापासूनच असद अली खाँ यांच्या रियाजाची सुरुवात झाली. त्यांचे वडीलच त्यांचे गुरु होते. नंतरच्या काळात जयपूरच्या बीनकर घराण्याच्या रुद्रवीणा वादनाच्या शैलीगत विद्यालयात १५ व्या वर्षापर्यंत संगीताचे तसेच वादनाचे शिक्षण त्यांनी घेतले.
कठोर शिस्त, सौंदर्यपूर्ण परिष्करण तसेच कलेविषयीचे मनस्वी प्रेम यामुळे असद अली खाँ यांच्या रुद्रविणेतून उमटणारे संगीत त्यांच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध करीत असे. त्यांच्या संगीतातून भक्तिरसाचा दरवळ आणि प्रत्येक सुरातून ईश्वरी प्रेमाचा संदेश प्रकट होत असे. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सांगीतिक शैलीतून ते अनेक रागांचे मूळ स्वरूप दाखवून देत. रुद्रविणेतून विशेष खुलून येणारे निवडक राग ते मैफलीत सादर करीत असत. गंभीर पण तेजस्वी दरबारी, जादुई तसेच मंत्रमुग्ध करणारे ललित, तोडी, मुलतानी, मारवा, श्री, पुरिया, चंद्रकंस आणि कोमल सौंदर्य असलेले यमन, बिहाग, बागेश्री, खमाज हे सर्व राग ते अप्रतिम रित्या सादर करत. त्यांच्या स्वरातील अचूकता तसेच त्यामध्ये अंतर्भूत असलेला भक्तीभाव यांच्या एकत्रित मिश्रणाने जोर-झालांच्या सादरीकरणात, श्रोत्याला एकाच वेळी शांतता आणि सूरतालांचा सौंदर्यपूर्ण पदन्यास अनुभवत असल्याचा भास होई. त्यांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, अफगाणिस्तान, इटली तसेच काही इतर युरोपीय देशांसह अनेक देशांत आपली कला सादर केली.
असद अली खाँ यांनी संगीताला जीवनशैलीप्रमाणे स्वीकारले होेते. रुद्रवीणा वादनासोबतच धृपदच्या चार विद्यालयांपैकी खंडार विद्यालयाचे ते शेवटचे गुरु होते. या प्राचीन वाद्याचे शिक्षण घेतल्याने भारतीय तरुण संगीतकारांना आर्थिक लाभ होणार नसल्याने, साहजिकच आजच्या आधुनिक भारतात ही कला नामशेष होत चालल्याची खंत त्यांना वाटत होती. १९६० ते १९८० च्या दरम्यान त्यांनी दिल्लीतील भारतीय कला केंद्र आणि दिल्ली विद्यापीठात संगीत व ललित कला विभागात अध्यापन केले. त्यावेळी त्यांनी रुद्रविणेसाठी पुरेसे विद्यार्थी नसल्यामुळे मुख्यतः संगीत शास्त्र आणि सतारीचे शिक्षण दिले. निवृत्तीनंतर खाजगी रित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. त्यामध्ये रुद्रवीणा शिष्यांमध्ये बहुतांश परदेशी विद्यार्थीच असत. असद अली खाँ यांनी आपल्या बहिणीचा मुलगा झकी हैदर यांना दत्तक घेऊन रुद्रविणेचे शिक्षण दिले. शिष्य तयार करताना ते कधीही गुणवत्तेत तडजोड करीत नसत. ते ऑल इंडिया रेडिओ केंद्रातही कार्यरत होते; मात्र त्यांच्या संगीताच्या फारशा ध्वनिमुद्रिका प्रकाशित झालेल्या नाहीत. २००९ साली भारतीय दिग्दर्शिका रेणुका जॉर्ज यांनी अनेक प्रयत्नानंतर उस्ताद असद अली खाँ यांच्यावर एक माहितीपट केला. उस्ताद असद अली खाँ यांचे रुद्रवीणा शिष्य कार्स्टन विके यांनी तयार केलेल्या ‘म्युझिक मसाला’ या माहितीपटात उस्ताद असद अली खाँ यांचे वर्ग आणि कार्यक्रम दाखविले आहेत.
असद अली खाँ यांना १९७७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच २००८ साली भारत सरकारने सर्वोच्च अशा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे वृद्धापकाळाने नवी दिल्ली येथे निधन झाले.
संदर्भ :
- https://www.india-instruments.com/asad-ali-khan-a-life-for-the-rudra-veena.html
समीक्षक : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.