आपेगावकर (शिंदे), शंकरबापू मारुतीराव : (मार्च १९२१ – ९ जानेवारी २००४). ख्यातकीर्त भारतीय पखवाजवादक. त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील आंबेजोगाईजवळील आपेगाव येथे वारकरी कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा तुळजाराम शिंदे यांच्यापासून त्यांच्या घराला वारकरी संप्रदायाचा सुमारे १०० ते १२५ वर्षांचा समृद्ध वारसा लाभला. शंकरबापूंचे वडील मारुतीराव शिंदे स्वतः पखवाज वाजवीत, तर चुलते जनार्दनराव शिंदे हे आळंदी येथून वारकरी शिक्षणसंस्थेतून शिक्षण घेऊन आलेले. या दोघांकडून पखवाजाचे व वारकरी परंपरेचे प्राथमिक शिक्षण त्यांनी घेतले. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी पखवाजवादनास सुरुवात केली (१९२९).

आपेगावकर घराण्याचे आध्यात्मिक गुरू बंकटस्वामी महाराज नामसप्ताहासाठी आपेगाव येथे आले असता त्यांनी पखवाजासारख्या थोराड वाद्यावर लहान शंकर यांचे वादन पाहिले. त्यांनी पंढरीनाथबुवा पडेगावकर यांना आपेगावला राहून शंकरबापूंना पखवाज शिकविण्याची आज्ञा दिली. पंढरीनाथबुवांनी त्यांना दहा महिने पखवाजाचे शिक्षण दिले. यातूनच पुढे हळूहळू शंकरबापू सांप्रदायिक भजन व कीर्तनातून पखवाज वाजवू लागले. १९३५ – ३६ च्या सुमारास महाराष्ट्रात मुंबई हे शास्त्रीय संगीताचे एक महत्त्वाचे केंद्र होते. याच काळात शंकरबापूंची पखवाजवादनातील प्रगती गुरुवर्य बंकटस्वामी महाराजांच्या कानावर गेली. तेव्हा ते शंकरबापूंना मुंबईला घेऊन आले (१९३६). संगीतातील दर्दी आणि नवोदित कलावंतांसाठी निस्वार्थ भावनेने आर्थिक मदत करणारे रसिक सेठ विठ्ठलदास यांनी शंकरबापूंना बंकटस्वामी महाराजांच्या कीर्तनामध्ये पखवाजाची अवघड साथ करताना पाहिले आणि त्यांना पखवाजाचे शास्त्रीय शिक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्न करू लागले. त्याकाळचे प्रसिद्ध बीनकार उस्ताद इनायत हुसेन खान यांच्यासोबत पखवाजावर मथुरेचे पं. मख्खनलालजी उत्तम पद्धतीने साथ करत. बंकटस्वामी महाराज आणि सेठ विठ्ठलदास यांच्या विनंतीनुसार पं. मख्खनलालजी यांच्याकडे शंकरबापूंच्या रीतसर शिक्षणाचे गंडाबंधन झाले.

पं. मख्खनलालजी व त्यांचे गुरू पंडित आदित्यराय हे बाबू कुदऊसिंहजींच्या शिष्य परंपरेतील होते. शंकरबापूंनी गुरूगृही राहून १९३७ ते १९४५ पर्यंत खडतर साधना केली. शंकरबापूंचा पखवाजवादनाचा पहिला कार्यक्रम ठाकूरदास यांच्या दत्तमंदिरात उस्ताद अल्लादियाखाँ, मोगूबाई कुर्डीकर, बेहेरेबुवा अशी दिग्गज मंडळींसमोर झाला. पखवाजवादनाच्या अध्ययनाबरोबरच संगीतक्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांशी, संगीतविश्वाशी त्यांचा जवळून परिचय झाला. पं ओंकारनाथ ठाकूर, पं.रामकृष्णबुवा वझे, डागर बंधू, पाटणकरबुवा, लक्ष्मणप्रसाद चौबे, प्रा. देवधर, केसरबाई केरकर, बंदे अली खाँ, लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर अशा संगीतातील दिग्गज मंडळींचा सहवास शंकरबापूंना लाभला. त्यांच्यासोबत होणाऱ्या मैफलींमध्ये लय पकडणे, साथसंगतीच्या नियमांचा परिचय या प्रात्यक्षिकांतून बापूंना नवनवीन शिकायला मिळाले.

शंकरबापूंनी पखवाजवादनाचे अनेक कार्यक्रम केले. सर्वप्रथम १९५९ मध्ये राजस्थानचे सुप्रसिद्ध धृपद गायक पं. चतुर्भुज राठोड यांच्या धृपदगायनास शंकरबापूंनी  पखवाजाची उत्तम साथसंगत केली. पुढे डागर बंधूंचा कार्यक्रम ऐकण्यासाठी ते बापूंना मुंबई येथे घेऊन आले. जागतिक कीर्तीचे धृपद गायक उ. जहीरुनुद्दीन डागर व उ.फैयाजुद्दीन डागर यांच्या  धृपद गायनाचा कार्यक्रम होता. मात्र ऐन वेळेस काही कारणास्तव पखवाजाची साथ करणारे कलावंत न आल्यामुळे या कार्यक्रमाकरिता शंकरबापूंनी पखवाजाची साथ दिली (१९६२). शंकरबापूंनी अल्पावधीतच मैफलीची पकड घेतली. दोन तासांची मैफल सुमारे साडेचार तास चालली. तेव्हापासून डागर बंधूंनी शंकरबापूंनाच साथीसाठी घेण्यास सुरुवात केली आणि डागर बंधूंचे ध्रुपद गायन व शंकरबापूंची पखवाजसाथ हे समीकरण तयार झाले.

कुदऊसिंह घराण्याचे एकल पखवाजवादन, धृपद साथसंगत, बिनकार-पखवाज साथसंगत, तबला-पखवाज जुगलबंदी, रुद्रवीणा-पखवाज जुगलबंदी यांसारखे कार्यक्रम त्यांनी अनेक संगीत समारोहांत सादर केले. स्वामी हरिदास समारोह, मुंबई (१९७०), घराना संमेलन, आग्रा (१९७१), संगीत नाटक अकादमी आयोजित धृपद समारोह (१९७७), कला अकादमी, पणजी (१९७९), डागर सप्तक, कोलकाता (१९८३) , पटना संगीत नाटक अकादमी (१९८४), तानसेन समारोह, ग्वाल्हेर (१९८४), भारत भवन, भोपाळ (१९९३), दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर द्वारा आयोजित औरंगाबाद संगीत समारोह (२०००), संगीत नाटक अकादमी, दिल्ली द्वारा आयोजित आंबेजोगाई धृपद समारोह (२००१), महाराष्ट्र शासन आयोजित संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशताब्दी महोत्सव, पैठण यांसोबतच वृंदावन, दिल्ली, जयपूर, वाराणसी, नाथद्वारा, इंदौर, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, मुंबई अशा अनेक शहरांत आयोजित संगीत संमेलनातून व सांप्रदायिक सप्ताहांतून शंकरबापूंनी पखवाजवादन केले.

कर्नाटक पद्धतीचे थोर मृदंगवादक पालघाट मणीअय्यर व शंकरबापू यांची षण्मुखानंद हॉल येथील जुगलबंदीही रंगली. तसेच वारकरी संप्रदायातील अनेक गायकांना शंकरबापूंनी पखवाजाची साथसंगत केली. त्यांनी सुमारे ४०० ते ५०० मैफिली केल्या. याबरोबरच संगीतक्षेत्रातील कथक नृत्यसम्राट पं. बिरजू महाराज, पं. भीमसेन जोशी, पं. जसराज, पं. हृदयनाथ मंगेशकर, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उ. झाकीर हुसेन, सरोदवादक उ. अमजद अली खान अशा दिग्गज कलावंत मंडळींबरोबरही शंकरबापू यांनी अनेक मैफिली केल्या.

शंकरबापूंच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल पद्धतीने संगीत शिक्षणाची सोय “महात्मा गांधी मिशन” औरंगाबाद येथे करण्यात आली (१९९७). तेथे नृत्य, गायन, वादन या तीनही कलांचे शिक्षण दिले जाते.

शंकरबापूंनी आपल्या सांगीतिक जीवनात अनेक पदेही भूषविली. यामध्ये विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद त्यांनी भूषविले. श्रीक्षेत्र पैठण येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित संत ज्ञानेश्वर सप्तशताब्दी महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी संपन्न झालेल्या ज्ञानेश्वरी सप्ताहाचे प्रमुख संयोजक म्हणून ते कार्यरत होते. शंकरबापूंनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची जोपासना केली. २००० मध्ये शासनाकडून त्यांच्यावरील एका माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. ह.भ.प. तुकाराम महाराज खडकेलिखित स्वानंद सुखनिवासी श्रीसद्गुरू जोग महाराज चरितामृतसागर या १ जानेवारी २०२० मध्ये प्रकाशित झालेल्या ओवीबद्ध ग्रंथात शंकरबापू आपेगावकर यांच्या अलौकिक जीवनकार्याचे ओवीबद्ध चरित्र आपणास पहावयास मिळते.

गुरुकुल पद्धतीने पखवाजाचे शिक्षण संगीत अकादमीमध्ये शंकरबापू व त्यानंतर त्यांचे सुपुत्र व शिष्य उद्धवराव हे देत आहेत. वय वर्ष आठ ते साठपर्यंतचे विद्यार्थी येथे पखवाजाचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे सुपुत्र उद्धव आपेगावकर पखवाजाच्या दोन्ही परंपरा समर्थपणे पुढे चालवीत आहेत. शास्त्रीय वादनात महाराष्ट्र, भारत आणि जगभर गेल्या ६० वर्षांपासून आपेगावकरांचा पखवाजाचा प्रचार-प्रसार अविरत सुरू होता. आजही हे कार्य उद्धवरावांच्या माध्यमातून चालू आहे.

अनेक मानसन्मानांनी शंकरबापूंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये कालनिर्णय सन्मान, मुंबई (१९७९), ताल विलास, सूरसिंगार संसद, मुंबई (१९८०), पखवाज तालविलास, अल्लादियाखाँ अकादमी, भोपाळ (१९८०), पखवाज पंडित, शिकोहाबाद, मध्य प्रदेश (१९८१), बनारस येथील “स्वाती तिरूनाद” हा मानाचा पुरस्कार (१९८२), पखावज रत्न, धृपद समारोह, इंदूर (१९८६), भारत शासनाकडून “पद्मश्री” या पुरस्काराने सन्मानित (१९८६), ताल रत्न, स्वर साधना समिती, मुंबई (१९८७), वारकरी मृदंग भूषण, महाराष्ट्र शासन (१९९१) इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

शंकरबापू आपेगावकर यांचे आपल्या मूळ गावी आपेगाव येथे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

संदर्भ :

  • धृपद संगीत आश्रम, डागर सप्तक स्मरणिका, कोलकाता, १९८३.
  • पद्मश्री शंकरबापू आपेगावकर षष्ट्यब्दीनिमित्त प्रकाशित, तालगौरव स्मरणिका, १९८२.
  • ह.भ.प. खडके, तुकाराम महाराज, स्वानंद सुखनिवासी श्रीसद्गुरु जोग महाराज चरितामृतसागर, २०२१.