गंबूह हा बालीमधील नृत्यनाट्याचा सर्वांत जुना प्रकार आहे. गंबूह नक्की केव्हापासून सुरू झाले हे स्पष्ट नसले तरी आज अस्तित्वात असलेले गंबूह पंधराव्या आणि सोळाव्या शतकात उदयास आलेले आहे. आजही बाली लोक त्यांच्या संस्कृतीला मूलतः माजापाहित संस्कृती म्हणून पाहतात. माजापाहित राजवंशाच्या काळात संगीत आणि नृत्यनाट्य हे दरबारातील प्रमुख उत्सवाचा भाग होते. माजापाहितच्या या नृत्यनाट्यामध्ये काळानुसार खूप कमी बदल झाले आहेत. बॅडेम आणि डीबोअर (काजा आणि केलोद) यांचे हे वांशिक नृत्यनाट्य आहे.

गंबूह या नृत्यनाट्याच्या बाबतीत बालीच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करता ‘गुनुंग अगुंग’ आणि ‘गुनुंग बतूर’ हे दोन शक्तिशाली मानले जाणारे पर्वत हे बालीच्या धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धाप्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. या पर्वतांनी बालीला वेगवेगळ्या भौतिक प्रदेशामध्ये विभागले आणि प्रादेशिक निष्ठा वाढवली जी त्या बदल्यात नृत्य आणि संगीताच्या शैलीसह काही विशिष्ट क्षेत्रांशी स्पष्टपणे संबंधित असलेल्या मार्गांने प्रकट झाली.

चौदाव्या शतकात बालीच्या राजघराण्यातील लोक केवळ कला सादरीकरणाला पाठिंबा देत नव्हते, तर ते स्वतःही कलाकार होते. बालीच्या दरबारातही ही पद्धत चालू होती. राजवंशाच्या पतनानंतर माजापाहित घराण्यातील बहुतेक लोक स्थलांतरीत झाले. बालीचा सुवर्णकाळ गेल्गेलच्या राज्यात होता. गेल्गेल राजा, दालेम बटरेंगगोंगशी संबंधित आहे, जो आजही केवळ त्याच्या राजकीय आणि लष्करी पराक्रमासाठी नव्हे, तर कलांना त्याच्या दूरदर्शी पाठिंब्यासाठी एक आख्यायिका बनून राहिला आहे. या दालेम बटरेंगगोंगच्या काळात बालीच्या कला भरभराटीला आल्या. त्यात नृत्यनाटक विशेषतः मुखवटा घातलेले नृत्यनाटक येते. सोळाव्या शतकातील गेल्गेल राजाने ब्लाम्बांगन, पूर्व जावा, बाली बेट, लोम्बोक आणि सुम्बावा बेटे समाविष्ट असलेल्या क्षेत्रावर सत्ता गाजवली. गेल्गेल राजवंशाच्या काळात हिंदू विचार बाली विश्वास प्रणालीमध्ये अविभाज्यपणे समाविष्ट झाले. तथापि १६५१ मध्ये गुस्ती अगुंग मारूती यांनी स्वतःला बालीचा शासक म्हणून जाहीर केले आणि संयुक्त गेल्गेल राजवंशाचा अंत झाला आणि एका सुवर्णयुगाचाही. राज्याचे विघटन झाले आणि १८०० पर्यंत बाली स्थिर झाले नाही. या राजकीय विखंडनाचा बाली कलांवर परिणाम झाला. हे सर्व कलाकार विविध ठिकाणी राजाश्रय घेऊ लागले आणि दरबारांची सेवा करू लागले. यात जरी प्राचीन धार्मिक विधींचे सादरीकरण कायम राहिले असले तरी, नाटकीय रीत्या बदलणाऱ्या राजकीय आणि सांस्कृतिक बाली संदर्भामुळे राजघराण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कलांचे नवीन प्रकार उदयास येऊ लागले. नृत्यनाटकांच्या या नव्या उदयोन्मुख प्रकारांपैकी एक म्हणजे बालीतील सर्व नृत्यनाटकांचा आधार गंबूह. गंबूह म्हणजे ‘मिश्रण’ किंवा ‘एकत्र करणे’ होय. गंबूहच्या माध्यमातून हे कलाकार पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील उच्च सुसंस्कृत जावानीज व बालीनीज दरबारी जीवनातील शिष्टाचार जपत असत.

अरजा, वेयांग वोंग, टोपेंग, जोगेड, केकक, लेगोंग बारोंग, कॅलोनारंग, सेंद्रातारी, बलिह-बलिहान ही विविध प्रकारची नृत्यनाटके बेबाली-गंबूह परंपरेशी जोडलेली आहेत. गंबूहने या सर्व बालीनीज नृत्यात नृत्यदिग्दर्शनाच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान दिले आहे. ‘ गंबूह’कडे नृत्य हालचालींचा समृद्ध संग्रह आहे. बालीनीज कलांच्या सादरीकरणामध्ये गंबूहने दिलेले संगीतमय योगदानही महत्त्वपूर्ण आहे. गंबूहचे जटिल सूर आणि ढोल वाजवण्याचे नमुने हे बालीनीज संगीताच्या सर्व शास्त्रीय नृत्य प्रकारांचा आधार बनले आहेत. गंबूह ही मागणी असलेली कला आहे. ज्यामध्ये केवळ कठीण नृत्यतंत्रच नाही तर संवाददेखील समाविष्ट आहेत. त्यासाठी संगीतकार आणि नर्तक दोघांनाही संगीताचा तो एक प्रकार समजणे गरजेचे आहे, जो अत्यंत गुंतागुंतीचा आणि सूक्ष्म आहे. साधारण चार ते पाच तासांची सादरीकरणे, त्यातली राज दरबारी भाषा, जटिल संगीत, नृत्यदिग्दर्शन आणि विनोदाचा अभाव हे प्रेक्षकांसाठी केवळ मनोरंजन करणारे नाही तर मेंदूला ताण देणारेही आहे.

गंबूहसाठी सर्वांत प्रसिद्ध आणि लोकप्रिय गंबूह भाग हे पंजी चक्रातील आहेत; जे बालीमध्ये मलाट म्हणून ओळखले जातात. हे पंजीचक्र कदाचित चौदाव्या शतकात रचले गेले असावे. आग्नेय आशियातील मूळ साहित्य आणि दंतकथेचे मिश्रण असलेले हे पंजीचक्र जटिल आणि व्यापक आहे. पंजीला आग्नेय आशियातील मुख्य भूमीत ‘इनाओ’ म्हणून ओळखले जाते आणि ते बर्मा, कंबोडिया, लाओस, थायलंड व मलेशिया मध्ये आढळते.

जावा आणि बालीमध्ये नायक रादेन पंजी हा पांडवांचा वंशज आणि विष्णूचा पुर्नजन्म मानला जातो. बौद्धपुण्यभूमीवरचे ते भावी बुद्ध आहेत. रादेन पंजी याची प्रिया चंद्रकिरणा आहे. मलाट इतिहासात रादेन पंजीच्या साहसाबद्दल वर्णन आहे. रादेन पंजी व त्यांची नववधू चंद्रकिरणा यांची लग्नाच्या आदल्या रात्री ताटातूट होते. त्यानंतरच्या काळात ते दोघे एकमेकांना शोधण्यात वर्षानुवर्षे घालवतात. केदिरी, मातरम आणि कहुरीपन सारख्या ऐतिहासिक पूर्व जावानीज राज्यांपासून भटकतात. ते दोघं अनेकदा वेगवेगळे वेश धारण करतात; परिणामी ते एकमेकांना ओळखत नसतानाही अनेकदा भेटतात. रादेन पंजी हा अत्यंत देखणा प्रतिभावान संगीतकार आणि एक उत्तम योद्धा आहे. तरल प्रणयरम्य असणारा तो आपल्या प्रेयसीला चंद्रकिरणाला अविरतपणे शोधत आहे. चंद्रकिरणा अत्यंत तेजस्वी असणारी एक महान योद्धा आहे. योद्धा असताना ती पुरूषाचे रूप घेते आणि पूर्व जावा मध्ये युद्धमोहिमा चालवते. एक महान शासक बनण्याचे तिचे ध्येय आहे. या नृत्य नाटकाच्या शेवटी ती आणि पंजी युद्धात भेटतात. सुरुवातीला ते एकमेकांना ओळखत नाहीत. अंतर्यामी ओळख पटते आणि ते एकत्र येतात. खूप वर्षे शांततेत राहातात. अशी साधारण या नृत्यनाट्याची कथा आहे.

गंबूह नृत्याचे पैलू – गंबूहमधील प्रत्येक पात्राची हालचाल आणि नृत्यदिग्दर्शन बाली तत्वज्ञान आणि आर्दश प्रतिबिंबीत करते. गंबूह प्रथम विकसित झाले, तेव्हा त्यातली स्त्री पात्रे पुरूष रंगवत असत. काही काळानंतर त्यात स्त्रियाही सहभागी होऊ लागल्या. गंबूहचा बराचसा भाग बालीनीज सर्जनशीलता आणि सौंदर्यशास्त्र प्रतिबिंबित करतो. यातली सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मुद्रा. यावर हिंदू धर्माचा प्रभाव जाणवतो. मात्र भरतनाट्यमच्या तुलनेत इथे खूप कमी मुद्रा वापरल्या जातात. यातील पात्रांचे मुखवटे हे त्या पात्रांचा दर्जा, वय, सुसंस्कृतपणा दर्शवतात. रादेन पंजी आणि चंद्रकिरणा यांच्या हालचाली नाजुक, तरल व प्रतिष्ठित (मनिस)असतात. ते कावी उच्चस्तरिय भाषेत बोलतात. यातले नोकर, सैनिक व प्रधान ह्या दुय्यम पात्रांना ‘केरास’ म्हणतात. एकमेकांकडे बोट दाखवून, मुठी आवळून दाणगटपणे भसाड्या आवाजात ते संभाषण करतात. मात्र मनिस व केरास ही पात्रे उत्तम वेशभूषा करतात. ते सोनेरी रंगाने रंगवलेल्या मण्या-मोत्यांनी व जरीने नक्षीकाम केलेले कपडे वापरतात. नर्तकांच्या डोक्यावर सुगंधी फुले आणि दर्जा दर्शवणारे उत्तम कोरीव काम केलेले चामड्याचे शिरोभूषण असते. भाषा व हावभाव हे चारित्र्याच्या स्थितीचे सूचक असतात.

गंबूहच्या विकासासह बालिनीज कलाकृतींमध्ये झालेले सर्वांत महत्त्वाचे बदल म्हणजे १) संगीताचे स्वरूप, चाल आणि रचना यांची वाढती गुंतागुंत; २) नृत्य व संगीत यांच्यातील समन्वय; ३) ढोलांचा प्रामुख्याने वापर.

गंबूहच्या संगीत साथीसाठी लांब बांबूची बासरी (गेमलन), सारंगी (रेबाब), झांज (सेंग सेंग), लाकडी हातोडीने वाजवण्याचे चर्मवाद्य (काजर), ढोल (केंडांग), बेल वृक्षाच्या लाकडाचे वाद्य (जेटोरॅन्ग) इत्यादींचा वापर केला जातो.

संदर्भ :

  • ‘आग्नेय आशियाई अभ्यास विद्यार्थी संघटना’ (मासिक), अन्वेषण, खंड क्र. १

समीक्षक : सुधीर पोटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.