खान, शफाअत : (२१ नोव्हेंबर १९५२). आधुनिक मराठी प्रायोगिक नाटककार, नाट्यदिग्दर्शक व नाट्यप्रशिक्षक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात सावंतवाडी (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे झाला. त्यांच्या वडिलांची फिरतीची नोकरी असल्याने विविध ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. ते मुंबई विद्यापीठातून विज्ञान विषयातून पदवीधर झाले (१९७३). शफाअत खान यांनी समांतर रंगभूमीपासून नाट्यलेखनास प्रारंभ केला. नाटककार सतीश आळेकर यांनी अनुसरलेला विषण्णगर्भ सुखात्मिका (Black comedy – ब्लॅक कॉमेडी) हा नाट्यप्रकार त्यांनी परिणामकारक रीत्या हाताळला.

मुंबईचे कावळे (१९७६) हे शफाअत खान यांचे पहिले गाजलेले नाटक. हे मुक्तशैलीतील नाटक प्रखर सामाजिक-राजकीय विधान करणारे आहे. यात लेखकाने सत्तेचा दुरुपयोग तसेच व्यवस्थेच्या निर्ढावलेपणावर बोचऱ्या विनोदाने भाष्य केलेले आहे. त्यांच्या नाटकातील वास्तवदर्शनाने प्रेक्षक स्तिमित होतो. मुंबईतील धार्मिक-वांशिक दंगली किंवा स्वातंत्र्योत्तरकाळातील भारतातील ढासळत गेलेली राजकीय स्थिती यांचे त्यांनी केलेले औपरोधिक चित्रण हे त्यांच्या लेखणीचे रंजनापलीकडचे असणारे सामर्थ्य जाणवून देते. राहिले दूर घर माझे, शोभायात्रा (२०००) यांसारख्या नाटकांतून त्याची प्रचिती येते. समाजजीवनातील हिंसा, भ्रष्टाचार, खालावलेली नैतिक पातळी यांचे दाहक चित्रण आपल्या नाटकांतून करतानाच त्यांनी विषण्ण किंवा बोचरा विनोद वापरून भोवतीच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक वातावरणावर विश्लेषक भाष्य केले. गांधी आडवा येतो, ड्राय डे, भूमितीचा फार्स ही त्याची उदाहरणे होत. राहिले दूर घर माझे (१९९४) हे फाळणीच्या पार्श्वभूमीवरील गंभीर नाटक त्यांच्या एकूण लेखन प्रकृतीशी भिन्न पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. इसापनीती, पंचतंत्र आदींचा त्यांच्यावरचा संस्कार त्यांच्या भूमितीचा फार्स, मुंबईचे कावळे, किस्से – भाग १ व २, टाइमपास ( या एकांकिकेवर आधारित) या नाटकांतून आढळतो. भारतीय कथनशैलीचा विचारपूर्वक वापर त्यांनी त्यांच्या नाटकांमध्ये सातत्याने केला आहे.

शफाअत खान यांच्या प्रायोगिक रंगभूमीवरील कार्याची व नाट्यलेखनाची दखल घेऊन मुंबई विद्यापीठाने त्यांची  ‘अकादमी ऑफ थिएटर आर्ट्स’ या नाट्यविभागात अध्यापक म्हणून नियुक्ती केली. सुमारे बारा वर्षे त्यांनी तेथे अध्यापन केले. त्यानंतर याच विभागात प्रभारी संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले व अभ्यागत अध्यापक म्हणूनही ते कार्यरत होते. तसेच त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली आयोजित विविध कार्यशाळांतून प्रशिक्षण दिलेले आहे.

त्यांची सारे प्रवासी घडीचे (मूळ कादंबरी – जयवंत दळवी), गर्दीत गर्दीतला, पोलिसनामा (मूळ लेखक – दारिओ फो), नागमंडल (मूळ लेखक – गिरीश कर्नाड) इत्यादी काही नाटके अन्य प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यकृतींवर बेतलेली आहेत. याशिवाय त्यांनी वश्या प्रेमात पडला, आमार बंगला शोनार, , , काहूर, लव्ह स्टोरी, निशब्द, चॅनल हंगामा, लोभी राजा शहाणे माकड  इत्यादी दर्जेदार एकांकिका लिहिल्या. त्यांच्या बहुतेक नाट्यकृतींचे हिंदी, इंग्रजी, बंगाली, गुजराती आदी भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांनी थिएटर आणि थिएटर एक्स या रंगभूमीविषयक समूहाची सुरुवात करून याद्वारे अनेक नाटकांची सादरीकरणे केली. शिवाय त्यांनी दूरदर्शनासाठी गणूराया या मराठी, शोभायात्रा आणि देख तमाशा देख या हिंदी चित्रपटांचे पटकथा आणि संवादलेखन केले. गजरा, शहाणी माणसे या दूरचित्रवाणीवरील मालिकांचेही लेखन त्यांनी केले आहे. गांधी माय फादर या चित्रपटालाही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी वृत्तपत्रे (लोकसत्ता-लोकरंग) आणि काही मासिकांतूनही नाटकासंबंधी स्फुटलेखन केले आहे.

शफाअत खान यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९९७ व १९९९), नाट्यदर्पण पुरस्कार (१९८८), महाराष्ट्र कला निकेतन पुरस्कार (१९९९), महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार (२००२), मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा अनंत काणेकर पुरस्कार (२००३), नाट्यलेखनासाठीचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (२०१५-२०१६) इत्यादींचा समावेश असून २०१७ मध्ये त्यांना मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्राप्त झाला.

शफाअत खान यांच्या नाट्यकृती प्रहसन (फार्स) सदृश आहेत, असे काही समीक्षक म्हणणे आहे; कारण त्यांची लेखनशैली तिरकस, पण बोचरी विदुषकी पद्धतीची आहे. तिच्यावर भारतीय लोककला, लोककथा, मिथ्यकथा, गजाली यांचा प्रभाव जाणवतो. त्यात प्रगल्भतेबरोबरच सामाजिक समस्यांचे जिवंत चित्रण आणि मूल्यात्मक विचार असून विद्यमान परिस्थितीचा विश्लेषक म्हणून ते आपल्या नाट्यकृतींद्वारे भाष्य करतात. त्यामुळे नाट्यक्षेत्रात त्यांनी स्वत:चे असे एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे.

समीक्षक : सु. र. देशपांडे