खाँ, निसार हुसेन : (१९०६ ? — १६ जुलै १९९३). भारतातील हिंदुस्थानी संगीतातील रामपूर-सहसवान घराण्याचे प्रख्यात गायक. त्यांचे जन्मवर्ष १९०६ किंवा १९०९ असेही दर्शविले जाते. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बदायूँ येथे झाला. वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण त्यांचे आजोबा व त्याकाळचे नामांकित गवई उस्ताद हैदर खाँ यांच्याकडे झाले. उस्ताद हैदर खाँ हे रामपूर-सहसवान घराण्याचे संस्थापक इनायत हुसेन खाँ यांचे शिष्य होते. उतारवयातही हैदर खाँ रोज पाचसहा तास रियाज करत व सोबतीला आपल्या छोट्या नातवाला म्हणजेच निसार हुसेन खाँ यांना बसवत. त्यामुळे रामपूर-सहसवान घराण्याच्या घरंदाज गायकीचे उत्तम संस्कार निसार हुसेन खाँ यांच्यावर लहानपणीच कोरले गेले.
निसार हुसेन खाँ यांचे मुख्य शिक्षण त्यांचे वडील फिदा हुसेन खाँ यांच्याकडे झाले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी आपल्या गायनाचे पहिले सादरीकरण केले. या सादरीकरणाचा इतका बोलबाला झाला की थेट बडोद्याच्या महाराजांनी त्यांना शास्त्रीय संगीतातील पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचीही बडोदा येथेच दरबारी गायक म्हणून नेमणूक झाली. वडिलांच्या कठोर तालमीत वयाच्या अठराव्या वर्षीच निसार हुसेन खाँ एक परिपक्व गायक झाले आणि त्यांची बडोद्याच्या महाराजांनी दरबारी गायक म्हणून नेमणूक केली. निसार हुसेन खाँ यांनी अथक परिश्रमाने आपल्या गायकीला अधिक समृद्ध केले. त्यांच्याकडे विविध रागांचा आणि बंदिशींचा मोठा खजिना होता. गोवर्धन, तोडीसारखे अनवट रागही ते लीलया गाऊ शकत असत. उपजतच फिरता गळा असलेल्या निसार हुसेन खाँ यांचा आवाज मधुर व ठाशीव होता. अत्यंत पद्धतशीरपणे ते रागाची बढत करायचे. रागाची मांडणी आखीव असायची. त्यांच्या ताना एका सप्तकातून दुसऱ्या सप्तकात अलगदपणे फिरायच्या. तराणा या गायनप्रकारात निसार हुसेन खाँ यांनी मोलाची भर घातली. या गायनप्रकारावर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. द्रुतलयीतील त्यांचे तराणे लालित्यपूर्ण असत. त्यामध्ये तानांचा चपखल व विलक्षण वापर असे. बोलतान, गमक, सरगम तानकारी यांच्यामुळे त्यांचे तराणे गुंतागुंतीचे तरीही विलोभनीय असत. त्यांच्या तराण्यातील लयकारीवर श्रोते लुब्ध होत.
१९४० च्या दशकात निसार हुसेन खाँ हे भारतातील एक महत्त्वाचे गायक म्हणून गणले जाऊ लागले. एक यशस्वी आकाशवाणी कलाकार आणि संगीत सभेतील पसंतीचे कलाकार म्हणून त्यांनी नाव कमावले. बडोदा सोडल्यानंतर उत्तरप्रदेशातील बदायूँ या आपल्या जमस्थळी परतले. तेथील शांततापूर्ण वातावरणात संगीतशिक्षण, सादरीकरण आणि आकाशवाणीसाठी गायन यात ते रमून गेले.
निसार हुसेन खाँ यांनी आपल्या कारकीर्दीत मोजकेच पण उत्तम शिष्य घडवले. त्यांचे जावई हाफिज अहमद खाँ व गुलाम अकबर खाँ, त्यांचे चुलत बंधू गुलाम मुस्तफा खाँ शिवाय त्यांची मुले सरफराज हुसेन खाँ आणि झुल्फिकार हुसेन खाँ हे त्यांचे सुरवातीचे काही शिष्य होत. १९७७ साली निसार हुसेन खाँ आयटीसी संगीत संशोधन अकादमी, कोलकाता येथे वरिष्ठ गुरू म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी उत्तम शिष्य घडवले. गुरु म्हणून ते अत्यंत कडक शिस्तीचे होते. त्यांच्या कठोर तालमीत तयार झालेले राशिदखाँ यांनी पुढे जाऊन मोठे नाव कमावले.
त्यांच्या दैदिप्यमान सांगीतिक कारकीर्दीची दखल म्हणून निसार हुसेन खाँ यांना उदंड बहुमान प्राप्त झाले. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, गांधर्व महाविद्यालयाची डॉक्टरेट, मध्यप्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार, आयटीसी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा मानाच्या आणि महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
उत्तम शिष्य घडवणे व आपल्या गानकलेने श्रोत्यांना रिझवणे यात निसार हुसेन खाँ शेवटपर्यंत कार्यरत राहिले. त्यांचे कोलकाता येथे निधन झाले. मेहनतीने कमावलेल्या आवाजातील श्रोत्यांच्या कानात गुंजत राहणारे मधुर गाणे, चित्तवेधक तराणे आणि मोहक ताना यामुळे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात निसार हुसेन खाँ यांना एक अढळस्थान प्राप्त झाले आहे.
संदर्भ :
- https://sathee.iitk.ac.in/ncert-books/class-12/sangeet/hindustan-sangeet-gaayan-evm-waadan/chapter-09-sangeet-ke-pramukh-kalaakaaron-ka-parichay-va-yogadaan/
समीक्षक : सुधीर पोटे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.