देवधर, बाळकृष्ण रामचंद्र : (११ सप्टेंबर १९०१ – १० मार्च १९९०). प्रसिद्ध भारतीय संगीतज्ञ, संगीत शिक्षक व शास्त्रीय गायक आणि आवाज जोपासनशास्त्राचे एक अग्रगण्य अभ्यासक. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात मिरज (भूतपूर्व संस्थान व सांप्रत सांगली जिल्हा) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीच झाले आणि वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. मिरजेमध्ये नीलकंठबुवा अलूरमठ, विनायकबुवा पटवर्धन व अंशत: अब्दुल करीमखाँ यांच्याकडून त्यांनी संगीतशिक्षण घेतले. त्यानंतर ते मुंबईला विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्याकडे गांधर्व विद्यालयात पुढील संगीतशिक्षणासाठी गेले (१९१८). तेथे त्यांनी सुमारे चार वर्षे संगीताचा अभ्यास केला (१९२२). त्यांची हुशारी पाहून प्रथम गांधर्व महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाची आणि नंतर अध्यापनाची जबाबदारीही त्यांच्यावर विष्णु दिगंबरांनी टाकली. त्यांच्या परवानगीने संगीताबरोबरच विल्सन महाविद्यालयातून बी. ए. (इतिहास व अर्थशास्त्र) ही पदवी देवधर यांंनी संपादन केली (१९३०). पुढे पाश्चात्त्य संगीताच्या शिक्षणासाठी विष्णु दिगंबरांनी त्यांना जी. स्क्रिंझी यांच्याकडे पाठविले (१९२१–२६).

देवधर यांनी मुंबईत स्वतंत्र संगीत विद्यालयाची (इंडियन स्कूल ऑफ म्युझिक) स्थापना केली होती (१९२५). या विद्यालयात ध्रुपद, ख्याल, ठुमरी, भजन आणि गायकीचे विविध प्रकार व त्यांसाठी कमविण्याचा आवाज यांविषयी ते उत्तमप्रकारे मार्गदर्शन व अध्यापन करीत. हे विद्यालय पुढे देवधर्स स्कूल ऑफ इंडियन म्यूझिक या नावाने ओळखले जाऊ लागले (१९५८). चंद्रशेखर रेळे, कुमार गंधर्व, शीला पंडित ही त्यांची नामांकित शिष्यांची पहिली फळी होती. संस्थेमध्ये शिष्यांना जाचक अटींमध्ये न बांधता त्यांच्या क्षमतेनुसार आविष्काराची संधी ते देत असत. विविध घराण्यातील अनवट रागांचा व बंदिशींचा देवधरांकडे संग्रह होता. त्याचा उपयोग त्यांना विद्यार्थ्यांना शिकविण्याकामी झाला. लगावाने आणि मध्य लयीत, वेगवेगळ्या ढंगाने बंदिशींचे गायन करणे, ही त्यांची विशेषता होती. गायक गात असताना चिजांचे नोटेशन द्रुतगतीने करण्यात ते तरबेज होते. भातखंडे यांचा निकट सहवास त्यांना चार वर्षे लाभला. त्यांच्या हिंदुस्थानी संगीत पद्धती या ग्रंथाचा प्रभाव देवधरांवर होता. संथ चलन, कणस्वर, मींड, थोडीशी गमक, हलकीशी हरकत ह्यांचा प्रयोग ते करीत आणि रागाची सौंदर्यस्थळे शोधत ख्याल भरण्याचे कसब त्यांच्या गायनात होते. ते संगीतशास्त्रात पारंगत असले आणि मैफलीच्या तंत्राची त्यांना चांगली जाण असली, तरी देवधर स्वत: मैफलीचे गायक नव्हते; मात्र मैफल वा परिषद यांत गावयाचे राग व बंदिशी यांची टिपणे आधी काढून ठेवण्याची शिस्त त्यांनी शिष्यांना लावली. त्याकाळातील अनेक नामवंत गायक, वादक व संगीतज्ञ इत्यादी त्यांच्या संस्थेमध्ये सादरीकरण करीत. विविध सांगीतिक विषयांवरील सप्रयोग चर्चा यांमुळे विद्यार्थ्यांच्या अनुभवविश्वात भर पडत असे.

१९३१–३६ मध्ये देवधर चित्रपट व्यवसायाकडे वळले. श्रीकृष्ण फिल्म कंपनीने देवधरांची संगीत दिग्दर्शक म्हणून नियुक्ती केली होती. यापूर्वीच ग्रामोफोन कंपनीने त्यांच्या वाद्यवृंदाच्या (ऑर्केस्ट्राच्या) दोन रेकॉर्ड्स व एक गाण्याची रेकॉर्ड प्रसिद्ध केली होती. यानंतर ते पुन्हा ख्याल संगीताकडे आणि अनेक घराण्यांच्या चीजांचा चोखंदळ संग्रह करण्याच्या कामी व्यस्त झाले.

देवधर यांनी प्लॉरेन्स (इटली) येथील जागतिक संगीत परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी म्हणून भाग घेतला (एप्रिल १९३३). त्यावेळी त्यांनी ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, चेकोस्लोव्हाकिया आदी देशांना भेटी दिल्या. शिवाय फ्रान्समधील संगीत परिषदेतही ते सहभागी झाले. त्यांची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे सन्मान्य कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली (१९५२). त्यानंतर १९५७ मध्ये त्यांची पुनर्नियुक्ती झाली. ते युनोस्कोतर्फे आयोजित केलेल्या आग्नेय आशियाई संगीत परिषदेसाठी भारताच्या सांस्कृतिक प्रतिनिधिमंडळातून मनिला (फिलिपीन्स) येथे उपस्थित होते (१९५५). १९५८ मध्ये ते पूर्व यूरोपात भारतीय सांस्कृतिक मंडळांबरोबर गेले. या सुमारास त्यांनी रशिया, पोलंड, युगोस्लाव्हाकिया आदी देशांना सदिच्छा भेट दिली. तेथे ते भारतीय संगीताचे वेगळेपण, त्यांची प्राचीनता याबाबतही विवेचन करीत असत. यूरोपच्या दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांची बनारस हिंदू विश्वविद्यालयात संगीत विभागाचे डीन (१९६१-६४) म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर राजस्थानमधील वनस्थळी महाविद्यालयात संगीत विभागाचे प्रमुख प्राध्यापक म्हणून त्यांनी १९६४-६८ दरम्यान अध्यापन केले.

देवधरांची संगीतशास्त्रातील महनीय कामगिरी म्हणजे आवाजजोपासनाशास्त्र (व्हाईस कल्चर) विषयीचे संशोधन होय. याकरिता त्यांनी न्यूयॉर्क येथे १९५८ नंतर काही वर्षे ‘सायन्स ऑफ व्हाईस कल्चर’ च्या संशोधनात प्रा. एंगल्स यांच्या हाताखाली संशोधन-अध्यापन केले आणि ही पद्धती वा शोध भारतीय संगीताला कसा लागू करता येईल, याचा धांडोळा घेतला आणि त्याचा प्रयोग देवधर्स इंडियन स्कूल ऑफ म्युझिकमध्ये आपल्या विद्यार्थ्यांवर केला. त्यांच्या अनुपस्थित विद्यालयाची विस्कटलेली घडी त्यांनी माजी शिष्य जमवून पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा अनवट रागांची तालीम सुरू केली.

संगीतकलाविहार या मासिकाचे संपादक म्हणून देवधरांनी १९४८ पासून हे मासिक सु. १२ वर्षे चालविले. त्यात त्यांनी स्वत: व इतरांनी लिहिलेल्या घराण्यांची वर्णने प्रसिद्ध केली. पुढे त्यांनी संगीतकलाविहारातील लेखांचे संकलन करून थोर संगीतकार हे द्विखंडात्मक पुस्तक सिद्ध केले (१९७४), याशिवाय त्यांनी आपल्या गुरुंचे चरित्र गायनाचार्य पं. विष्णु दिगंबर (१९८५) या शीर्षकार्थाने लिहिले. शिवाय त्यांचे व्हाईस कल्चर (१९८३) हे पुस्तक प्रसिद्ध असून पिलर्स ऑफ हिंदुस्थानी म्युझिक (१९९३) याची दुसरी आवृत्ती निघालेली आहे.

देवधर यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमीची अधिछात्रवृत्ती (१९६४), थोर संगीतकार या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९७४), पद्मश्री पुरस्कार (१९७६) इत्यादींचा समावेश आहे. ते संगीत नाटक अकादमीच्या (नवी दिल्ली) कार्यकारी मंडळाचे सदस्य होते (१९५६). तसेच संगीत नाटक अकादमीने आयोजित केलेल्या उत्तर हिंदुस्थानी संगीत कार्यशाळेचे ते संचालक होते.

देवधर यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले. कुमार गंधर्व, सरस्वतीबाई राणे, वसुंधरा श्रीखंडे, पंढरीनाथ कोल्हापुरे, लक्ष्मी गणेश तिवारी, अशोक रानडे ह्यांसारख्या त्यांच्या शिष्यांनी त्यांचे संगीत प्रसार-प्रचाराचे कार्य नेटाने पुढे सुरू ठेवले.

संदर्भ :

  • कोल्हापुरे, पंढरीनाथ; संपा. संगोराम, श्रीरंग, गानयोगी शिवपुत्र, पुणे, १९९९.
  • Deshpande, Waman Hari, Between Two Tanpuras, Mumbai, 2013 (Reprint).

समीक्षक : सु. र. देशपांडे