बनारसीदास नामक एका जैन व्यापाऱ्याने इ. स. १६४१ साली हिंदी भाषेत लिहिलेले एक पद्यमय आत्मचरित्र. हिंदी साहित्यातील आत्मकथेचा एक पहिला प्रयत्न यादृष्टीनेही हे ‘अर्धकथानक’ लक्षणीय मानले जाते. बनारसीदास हा आग्र्याचा रहिवासी होता. हा ग्रंथ पूर्ण करताना त्याचे वय ५५ वर्षे होते. जैन धर्मातील मान्यतेनुसार तीर्थंकरांचे आयुष्य ११० वर्षे असते. बनारसीदासचे वय तेव्हा त्याच्या अर्धे असल्यामुळे काहीशा कडवटपणे त्याने ग्रंथाचे नाव ‘अर्धकथानक’ असे ठेवले. हा व्यवसायाने एक लहानसा दुकानदार होता. आपल्या रचनेबद्दल त्याला फार आशा नव्हती. हा ग्रंथ मित्र वाचतील आणि पठण करतील, तर वाईट लोक त्याची खिल्ली उडवतील, इतकेच तो त्या अनुषंगाने नमूद करतो. पुढील पिढ्यांपर्यंत स्वत:च्या जीवनातील अनुभव पोचवण्यासाठी आपण हा ग्रंथ लिहीत असल्याचे तो सांगतो.

यात उल्लेख असलेला कालदृष्ट्या सर्वांत जुना उल्लेख इ. स. १५४३ चा आहे. यावर्षी बनारसीदासचा आजोबा मूलदास याने तत्कालीन मोगल बादशाह हुमायूनच्या एका सरदाराच्या पदरी नोकरी पतकरल्याचे बनारसीदास सांगतो, परंतु त्या वेळी हुमायूनला इराणमध्ये परागंदा व्हावे लागले होते, हे तो नमूद करत नाही. बनारसीदासला इतिहासात थोडाफार रस असल्याचे दिसते, उदा., जौनपूर या त्याच्या मूळ गावाबद्दल लिहिताना तो तेथील मोगलपूर्व जौनपूरच्या सुलतानांचा थोडक्यात उल्लेख करतो. परंतु ‘अर्धकथानका’त उल्लेख असलेल्या बहुतांश राजकीय घटनांचा उल्लेख हा बनारसीदासच्या कौटुंबिक परिप्रेक्षातून, विशेषत: त्याच्या व्यवसायावर, कुटुंबावर किंवा भवतालावर झालेल्या परिणामाच्या भाषेत येतो. सर्वत्र सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून केलेल्या लेखनामुळे राजपुत्र सलीमच्या अकबराविरुद्धच्या उठावाची संभावना ‘निरर्थक कोलाहल’ यासारख्या शब्दांत केलेली आहे.

या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यात सर्वत्र आढळणारी मध्यमवर्गीय मूल्ये होत. यातील कथेची पार्श्वभूमी म्हणजे राजमहाल किंवा युद्धभूमी नसून सराया, बाजार, दुकाने इत्यादी होत. बनारसीदास हा शहरवासीयांचे दैनंदिन जीवन, त्यांचे व्यापारी जीवन आणि सामाजिक संबंध, व्यापारी वर्गाचे धार्मिक आणि सामाजिक जीवन व त्यांचे मोगल अधिकाऱ्यांशी असलेले संबंध यांसारख्या कैक पैलूंबद्दल यातून बहुमोल माहिती मिळते.

उत्तर भारतातील महत्त्वाची व्यापारी केंद्रे म्हणून बनारसीदास आग्रा, दिल्ली, जौनपूर, अलाहाबाद, पटना, खैराबाद या शहरांचा उल्लेख करतो. यांसह तुलनेने लहान अशा इतरही काही गंगेच्या खोऱ्यातील शहरांचा उल्लेख सापडतो. बनारसीदास जौनपूरचे वर्णन करताना तिथे बावन्न सराया असल्याचे लिहितो, तसेच कारागिरांच्या छत्तीस जातींचा उल्लेख करतो. बनारसीदास व त्याचा पिता हे दोघे मुख्यत्वेकरून सराफी व्यवसायात होते. त्याखेरीज कापड व इतर वस्तूंचाही धंदा ते करीत असत.

‘अर्धकथानका’त व्यापाराचे नीतिनियम, विशेषत: भागीदारीतील व्यापारासंबंधीच्या नियमांची सखोल माहिती मिळते. बनारसीदासने यात त्याचे व त्याच्या वडिलांचे काही अनुभव नोंदवलेले आहेत. त्याच्या मते, सर्व भागीदारांना नफा व तोट्यात समसमान वाटा मिळत असे. भागीदारी विसर्जित करायची असल्यास हिशेब वेगवेगळे ठेवले जात. भागीदारी संपवण्याआधी सर्व भागीदारांची परवानगी घेऊन, योग्य त्या सर्व रकमांचा भरणा करावा लागे. यासाठी एक लिखित अहवाल तयार करून त्यावर सर्व सदस्यांची स्वाक्षरी घ्यावी लागत असे. याखेरीज काही लहान व्यापारी स्वत: उत्पादनप्रक्रियेत भाग घेत असल्याचेही उदाहरण यात स्वत: बनारसीदासच्याच जीवनातले दिलेले आहे, उदा., आग्र्यात व्यापारात अपयश आल्यावर बनारसीदासने त्याच्या बायको व सासूकडून थोडी आर्थिक मदत घेऊन, त्यातून थोडे भरड कापड विकत घेतले आणि ते धुवून पांढरे करून विकले.

तत्कालीन पद्धतीप्रमाणे बनारसीदासच्या शिक्षणात अक्षरओळख, पत्र व करारांचे लेखन, हिशेब, अंकगणित, भाषा, रत्नतपासणी इ. प्रत्यक्ष व्यापारात उपयोगी पडणाऱ्या गोष्टींचा भरणा होता. वयाच्या तेराव्या वर्षी त्याने व्यापारास सुरुवात केली, मात्र त्याचा पिता खरगसेनच्या तुलनेत त्याला यश आले नाही.

बनारसीदासचे तरुणपण आणि अकबराच्या कारकीर्दीची शेवटची वर्षे साधारण सारखीच वर्षे असून, त्या वेळी राजपुत्र सलीमने अकबराविरुद्ध केलेल्या उठावाखेरीज अकबर मरण पावला त्यावरील सामान्य गावकऱ्यांची प्रतिक्रियाही त्याने नोंदवली, ती रोचक आहे. अकबर मरण पावल्याचे कळताक्षणी जौनपूरमधील सर्व व्यापार थंडावला, लोकांनी घरेदारे बंद केली आणि जाडेभरडे कपडे घालून बसले व पैसाअडका आणि मौल्यवान वस्तू लपवून ठेवल्या. कदाचित यानंतरच्या यादवी युद्धाकरिता म्हणून ही खबरदारी घेतली, असे मानले तरी बनारसीदासच्या वर्णनावरून लोकांना खरेच यामुळे मोठा खेद वाटला असे दिसून येते. खुद्द बनारसीदासही हे ऐकून चक्कर येऊन पडल्याचे त्याने नमूद केले आहे. अकबरानंतरच्या जहांगीर आणि शाहजहान या दोघा मोगल बादशहांच्या निधनाचे वर्णन मात्र एका ओळीत भावनाविरहित पद्धतीने त्याने केलेले आहे.

अर्धकथानकात धार्मिक उल्लेखही अनेक सापडतात, विशेषत: तत्कालीन सर्वसामान्य लोकांद्वारे आचरणात आणल्या जाणाऱ्या जैन धर्मासंबंधीचे उल्लेख आहेत. यावरून तत्कालीन जैन समाजातर्फे बरेच हिंदू आचारही पाळले जात असल्याचे दिसून येते. खुद्द बनारसीदास प्रत्येक माणसाच्या जातीचा उल्लेख करताना आढळतो. जैन धर्माच्या शिकवणुकीमुळे जन्म, मृत्यू, परलोक आणि कर्मसिद्धांत, इ. गोष्टींची ‘अर्धकथानका’त बरीच चर्चा आढळत असली तरी बनारसीदास त्याच्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना दिसतो. तो सश्रद्ध असला तरी काही प्रसंगी त्याने त्याच्या आईवडिलांच्या काही धार्मिक समजुतींची चेष्टाही केलेली आढळते, उदा., पुत्र होण्याच्या इच्छेने त्याच्या आईवडिलांनी मोठ्या भक्तिभावाने सतीची यात्रा केली, तरी वाटेत त्यांच्याकडील सामान लुटले गेले, याची त्याने खिल्ली उडवली आहे. तसेच एका नवजात बाळाला तीर्थंकरांना अर्पण करण्याचा विधी करताना एका पुजाऱ्याने अंगी दिव्य शक्तीचा संचार झाल्याचे नाटक केल्याचे वर्णनही त्याने उपरोधिक शैलीत केलेले आहे. स्वत: बनारसीदास हा तीर्थंकरांखेरीज काही काळ शंकरालाही पुजताना दिसून येतो. बऱ्याचदा त्याच्या प्रार्थनेमागील कारण हे शुद्ध भौतिक असल्याचे दिसून येते, उदा., आपल्याला पुरेसे धन मिळावे अशी प्रार्थना करताना तो दिसून येतो.

बनारसीदासने जैन धर्मातील अंधश्रद्धा आणि बाह्य कर्मकांडावर टीका केली व सत्य स्वरूपाचे चिंतन करण्यावर भर दिला. वाईट विचार मनात ठेवून जर कुणी कर्मकांडे पार पाडली तर त्याला त्याचे पुण्यप्रद फल मिळेल का, असा थेट प्रश्न त्याने उपस्थित केला. परंपराप्रेमींना हे पटणे शक्य नव्हते. यामुळेच पुढे मेघविजयसारख्या जैन आचार्याने ‘युक्तिप्रबोध’ नामक ग्रंथात बनारसीदास आणि बनारसिया संप्रदायावर टीकाही केलेली आहे.

‘अर्धकथानक’ हा ग्रंथ कुलवृत्तांत/वंशावळ आणि आत्मचरित्र या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आहे. त्यात मध्यमवर्गीय परिप्रेक्षातून तत्कालीन सांस्कृतिक मूल्यांचे उत्तम वर्णन येते. कित्येक वेळेस ही मूल्ये परस्परविरोधी दिसतात, तसेच वैयक्तिक कल आणि सामाजिक अथवा कौटुंबिक अपेक्षांमधील संघर्षही यात दिसून येतो,

तत्कालीन हिंदी साहित्याचे एक उत्तम उदाहरण म्हणूनही अर्धकथानकाचे महत्त्व मोठे आहे. त्याची शैली साधी सरळ असून, आजमितीसही हिंदी भाषिक प्रदेशात प्रचलित असलेल्या कैक म्हणींचा उल्लेख त्याच्या लेखनात दिसून येतो. इ. स. सतराव्या शतकातील उत्तर भारतातील जनसामान्यांचा आढावा घेणारा हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहिल्यानंतर दोनच वर्षांत बनारसीदासही मरण पावला.

संदर्भ :

  • Vanina, Eugenia, “The ‘Ardhakathanaka’ by Banarasi Das : A Socio-Cultural Study”, Journal of the Royal Asiatic Society, Third Series, Vol. 5, No. 2, pp. 211-224, July 1995.
  • प्रेमी, नथुराम, ‘कविवर बनारसीदास विरचित अर्धकथानक’, हिंदी ग्रंथरत्नाकर, मुंबई, १९५७.

समीक्षक : निखिल परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.