
जेन आयर : (१८४७). जागतिक स्तरावरील अभिजात साहित्यकृती. शार्लट ब्राँटी (१८१६-१८५५) या ब्रिटिश लेखिकेची ‘जेन आयर: एक आत्मकथन’ (Jane Eyre: An Autobiography) तीन खंडांमध्ये प्रसिद्ध झालेली कादंबरी. अत्यंत मनस्वी, जोमदार, बंडखोर आणि वाचकांना विश्वासात घेऊन थेट भिडणाऱ्या आत्मस्वरासाठी ही कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीत जेन आयर नावाच्या आत्मभान असलेल्या, जगरहाटी नाकारणाऱ्या आणि स्व-ओळख, स्वावलंबित्व, सामाजिक स्थान शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामान्य नायिकेची कहाणी आहे. एका अनाथ स्त्रीच्या भावनिक आणि वैचारिक विकासाचा प्रवास यांत रेखाटला आहे. विशिष्ट कालखंडात जन्मलेल्या एका स्त्रीच्या खाजगी अनुभवांचे कथन करणारी ही कादंबरी आहे. लेखिकेने लिंगभाव, गरिबी, विवाह अशा संकल्पनांची आणि वास्तवाची तत्कालीन सामाजिक स्थानाशी सांगड घालत, सामाजिक सत्तेचे सूक्ष्म हस्तांतरण कसे होते, याची वेगळ्या प्रकारे उकल केली आहे. या कादंबरीतून ब्राँटी यांनी ज्ञान, स्व-समर्थन, श्रेष्ठता आणि पुनरावृत्ती या संकल्पनांचा विणलेला गोफ लक्षणीय आहे.
कादंबरीचे कथानक अनेक उत्कंठावर्धक योगायोगाने भरलेले आहे. नायिका जेनचा लहानपणी श्रीमती रीड या श्रीमंत आत्याने केलेला सांभाळ, दिलेली सापत्न वागणूक, शिवाय सहानुभूती विरहित शिस्तीचे वातावरण आणि गरिबांवर उपकार केल्याचा आव आणणाऱ्या लोवूड संस्थेमध्ये झालेली तिची रवानगी, तिथे सहन केलेले कर्मठपणाचे आणि उपासमारीचे चटके, अशा वातावरणातील शिक्षण आणि त्यानंतर थॉर्नफिल्ड हॉल या हवेलीचे मालक एडवर्ड रोचेस्टर यांच्या अडेले नावाच्या लहानग्या मुलीची गव्हर्नेस (खाजगी शिक्षिका) म्हणून केलेली नोकरी. दरम्यान रोचेस्टर यांच्या प्रेमात पडून त्यांच्याशी लग्न करत असताना लग्नाच्या दिवशी, त्यांचे लग्न आधीच झाले असून बर्था मॅसन ही त्यांची पत्नी, वेडसर आणि हिंसक वागणुकीकरता हवेलीतच तिसऱ्या मजल्यावर बंदिस्त असल्याचे कळल्यावर हवेलीत मधूनच ऐकू येणाऱ्या चित्रविचित्र आवाजांचे रहस्य उलगडणे, तद्नंतर स्वाभिमानी जेनचे थॉर्नफिल्ड हॉल सोडून जाणे आणि काही दिवस हलाखीत काढल्यावर मार्श एंड नावाच्या एका इस्टेटीवर तिने आसरा घेणे, त्या कुटुंबातले सदस्य तिची दूरची भावंडे असल्याचे तिला कळणे, त्यातल्या एकाशी लग्न करून भारतात जाण्याच्या त्याच्या प्रस्तावाबाबत संभ्रमात असताना रोचेस्टरची साद ऐकू येणे आणि प्रेमाची कबुली देत जेनने त्यांच्याशी लग्न करणे, इत्यादी.
विवाहासारख्या पारंपरिक पद्धतीने होणारा कथेचा असा शेवट अनेक वाचकांना पटत नसला, तरी त्याने एका विचारी स्त्रीची कादंबरीभर पसरलेली अस्वस्थता आणि तिला पडलेले प्रश्न यांचा परिणाम नाहीसा होत नाही. कादंबरीचा अत्यंत खाजगी स्वर, माणूस म्हणून जेनची इतरांबरोबर आत्मिक पातळीवर बरोबरीची स्पष्ट जाणीव आणि थेट संबोधनांचा वापर (उदा. ‘वाचकहो, मी त्यांच्याशी लग्न केलं’), यामुळे कादंबरीची मांडणी वैशिष्ट्यपूर्ण होते. रखेल म्हणून राहण्याचा प्रस्ताव नाकारणे, ‘लग्न केल्यानंतर वैवाहिक जीवन समानतेच्या पायावर आधारित होतं.’ हे या पद्धतीचे निवेदन महत्त्वाचे आहे. तत्कालीन समाजाने एका अनाथ आणि गरीब मुलीसाठी निश्चित केलेले भागध्येय मान्य करायला जेनने दिलेला नकार. हे व्हिक्टोरियन काळातल्या स्त्रीच्या विकासाचे प्रतीक आहे. जेन ही चांगली वाचक आहे. ती वाचत असलेल्या अनेक पुस्तकांचे संदर्भ कादंबरीत येतात. गव्हर्नेस म्हणून नोकरी करत असतांना जगातल्या अज्ञात प्रदेशांना पाहण्याची व्यक्त होणारी तिची आस, स्त्रियांच्या मेंदूला विचारांचा आणि सक्रियतेला कामाचा अवकाश मिळाला पाहिजे हे अधोरेखित करते.
ब्रिटनच्या इतिहासातला धामधुमीचा व्हिक्टोरियन कालखंड, त्याचा वसाहतवादी इतिहास आणि त्या काळातल्या वैचारिक प्रवाहांचा उल्लेख कादंबरीत येतो. जेनचे निवासी शाळेतले शिक्षण, अनाथपण, रबर, कापड, शाई, यांचे दैनंदिन जीवनातले उल्लेख, सेंट रिवरची भारतात धर्मप्रचारक म्हणून जाण्याची इच्छा, जेनचे हिंदुस्थानी भाषा शिकण्याची सुरुवात या तपशिलांमधून तो काळ प्रतिबिंबित झाला आहे. शार्लट ब्राँटी त्यावेळेच्या सामाजिक वास्तवातील दाहकता झाकत नाही. विस्कळीत कुटुंबे, ताणलेले नातेसंबंध, मुलांचे पालन करणारे निर्दयी लोक, पत्नीला कैदेत ठेवणारे पुरुष, अशा सर्व व्यक्तिरेखा तत्कालीन भल्या-बुऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. रोचेस्टरला जेनने लग्नाला दिलेला पहिला नकार समीक्षकांना सामाजिक संस्थांना दिलेला नकार वाटतो.
मॅथ्यू अर्नोल्ड (१८२२-१८८८), चार्ल्स किंग्सले (१८१९-१८७५) यांच्या पारंपरिक समीक्षक नजरेला जेनचे आयुष्य निराधार, नैतिकदृष्ट्या असमाधानकारक, तपशिलांच्या अव्यवस्थेने भरलेले आणि हेतुविहीन वाटून त्यांनी कादंबरीचे वर्णन स्वप्नरंजन आणि मनोरंजक मिथक असे केले. जेनच्या रुपात एका सोशिक स्त्रीचे आत्मक्लेश बघण्याचा प्रयत्न केला. मात्र तेच आयुष्य स्त्रीवादी विचारसरणीला समानतेसाठी आणि स्व-ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या स्त्रीचे वाटते. विसाव्या शतकांतल्या स्त्रीवादी समीक्षकांना त्यात स्त्रीवादी विचारांची सुरुवातीची बीजे सापडतात आणि बर्थामध्ये जेनचे प्रतिरूप दिसते. समीक्षेच्या पुढच्या टप्प्यावर समीक्षकांनी ब्राँटींच्या कादंबरीतल्या अंतर्मनाला आणि निसर्गाच्या स्वैर, आत्मनिर्भर शक्तींना, रानटी न मानता पुनर्स्थापित केलेले दिसते. स्त्रीवादी ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वुल्फ (१८८२-१९४१) यांना ‘जेन आयर’ सारख्या कादंबऱ्यांचे सामर्थ्यशाली आवाहन त्यातल्या निसर्ग वर्णनात आणि मिथकांमध्ये दिसते. नायिकेचे आत्मभान हा सार्वभौमत्वाचा अजिंक्य किल्ला बनून राहण्याऐवजी सामाजिक संघर्षाची भूमी बनतो, असा अर्थ हेरॉल्ड ब्लूम (१९३०-२०१९) यांच्या सारखे समीक्षक लावतात.
एकोणिसाव्या शतकात प्रकाशित झालेल्या या कादंबरीची जगातल्या ६८ भाषांमधून, ६१८ भाषांतरित, संक्षिप्त आवृत्त्या असणाऱ्या पाठ्यांमधून तसेच सिनेमा, नाटक आणि टीव्ही मालिकांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये रूपांतरे झाली. ही साहित्यकृती केवळ ब्रिटिश न राहता जागतिक आणि अभिजात साहित्यकृती म्हणून पाहिली जाते.
संदर्भ :
- Brontë Charllote (writing as ‘Currer Bell’), Jane Eyer: An Autobiography, Smith, Elder and Co, 1847.
- Fagan, Joshua. Rewilding Charlotte Brontë: Jane Eyre, Interpretation and Literary Historiography. https://doi.org/10.1080/14748932.2025.2458695 Pages 258-272, Published online: 04 Jun 2025.
- Reynolds, Matthew et al. Prismatic Jane Eyre: Close-Reading a World Novel Across Languages, Open Books, 2023 https://prismaticjaneeyre.org/
- Smith, Margaret (Ed). World’s Classics: Jane Eyre (Jane Eyre, Third Edition, Charlotte Brontë, Juliette Atkinson and Edited by Margaret Smith), 2019, Oxford World’s Classics
समीक्षक : योगिनी सातारकर – पांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.