कॉलिंझ, विल्यम : ( २५ डिसेंबर १७२१ – १२ जून १७५९ ). प्रसिद्ध ब्रिटीश कवी. १८ व्या शतकातील इंग्रजी साहित्यातील एक ख्यातनाम कवी म्हणून कॉलिंझ ओळखला जातो. त्याची कवितेची निर्मिती ही स्वच्छंदतावादी कवितेच्या उदयापूर्वी झाली आहे. त्याच्या कवितेची निवेदनशैली ही नव अभिजातवादी असून, त्याच्या कवितेचा आशय हा स्वच्छंदतावादी आहे. त्यांचा जन्म चिचिस्टर, ससेक्स येथे झाला. त्याचे वडील शहराचे महापौर राहिलेले होते, शिवाय स्थानिक व्यवसायातही त्यांचे योगदान होते.

कॉलिंझने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मॅग्डालेन महाविद्यालयातून काकाच्या मदतीने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन जीवनातच त्याने नियतकालिकांमधून त्याच्या पहिल्या कविता प्रकाशित केल्या. उमेदीच्या वयात अनेक महत्त्वाकांक्षी वाङ्मयीन संकल्प त्याने केले होते. आजार आणि अनुषंगिक अडचणी यामुळे त्याचे हे संकल्प पूर्णत्वास गेले नाहीत. तरीही जी वाङ्मयीननिर्मिती त्याने कवितेच्या स्वरूपात केली, ती निर्मिती काळाच्या आणि आशय – शैलीमुळे लक्षणीय ठरली. त्यामुळे त्याची साहित्यिक कारकीर्द अल्प असली तरी मात्र त्यांचे साहित्यिक योगदान उल्लेखनीय आहे. उत्कृष्ट गीतात्मक ओडरचनेबाबत कॉलिंझ याची ख्याती आहे.

कवी आणि समीक्षक जोसेफ वार्टन यांच्याशी त्याची चांगली मैत्री होती. कॉलिंझने वयाच्या १७ व्या वर्षी पर्शियन इक्लॉग्स (१७४२) या चार काव्य रचनांची निर्मिती पोप पस्तोरल्सच्या प्रभावाखाली केली. हंबली अ‍ॅड्रेस टू सर थॉमस हॅन्मर (१७४४) या नावाची कविताही नंतरच्या काळात प्रकाशित झाली होती. नंतरच्या काळात लंडन आणि रिचमंड या शहरात त्यांचे वास्तव्य होते. रिचमंडला त्यांची भेट कवी जेम्स थॉमसन यांच्याशी झाली. थॉमसनच्या प्रभावाखाली कॉलिंझने ओडरचनेवर लक्ष केंद्रित करून त्याचे कवितालेखन पुन्हा सुरू केले. कॉलिंझने १७४६ मध्ये ओडिज ऑन सेव्हरल डिस्क्रिप्टिव्ह अँड ऑलिगोरीक हा संग्रह प्रकाशित केला. पुढील काळात त्याने ऍन ओडी ऑन दि पॉप्युलर सुपरस्टीशन्स ऑफ हाईलँड्स ही कविता लिहिली, मात्र ती अपूर्ण होती. १७४४ ते १७४६ दरम्यान कॉलिंझने आपली बहुतेक महत्त्वाची कविता लिहिली आहे. उत्कृष्ट गीतात्मक ओडरचनेमधील पुढील रचना प्रसिद्ध आहेत- ओड टू ईव्हनिंग, ओड टू सिंप्लीसिटी आणि ओड ऑन द पॉप्युलर स्यूपरस्टिशन्स ऑफ द हायलॅंड्स ऑफ स्कॉटलंड. वेचक शब्दयोजना, गेयता, निर्दोष रचना आणि चिंतनशीलता हे त्यांच्या काव्यरचनेचे लक्षणीय विशेष होत. कॉलिंझ याची प्रतिभा फार तरल आहे. तो वर्ण्यविषयाच्या अंतरंगात फार खोलवर पाहू शकतो. कॉलिंझची शेवटची कविता, ऍन ओडी ऑन दि पॉप्युलर सुपरस्टीशन्स ऑफ हाईलँड्स अपूर्ण जरी असली तरी, त्याच्या साहित्यिक महत्तेची क्षमता या अर्धवट कवितेतूनही दिसून येते. जगाकडे पाहण्याचा त्याचा नैसर्गिक दृष्टिकोन, कलात्मक स्वभावाविषयीचा त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या शोधक भाषेमुळे त्याच्याकडे एकोणिसाव्या शतकातील अंतर्मुख कवी म्हणून बघितल्या जाते. ओडिज ऑन सेव्हरल डिस्क्रिप्टिव्ह अँड ऑलिगोरीक विषयांवर त्यांची लेखनशैली निश्चित परिपक्वतेची आहे यावर टीकाकार सहमत आहेत.

१७५० दरम्यान मानसिक आजाराने गाठले होते. मानसिक आजार आणि शारीरिक दुर्बलतेमुळे तो या काळात तो कोणतेही काम पूर्ण करू शकला नाही. दीर्घ आजारपणातच चिचिस्टर येथे आपल्या बहिणीच्या घरी त्याचे अकाली निधन झाले.

संदर्भ :