गंगा नदीच्या दोन मुख्य शीर्षप्रवाहांपैकी एक शीर्षप्रवाह. भारताच्या उत्तराखंड राज्यातून वाहणारे अलकनंदा व भागीरथी हे गंगेचे दोन प्रमुख शीर्षप्रवाह आहेत. त्यांपैकी अलकनंदा नदी
ही भागीरथी नदीपेक्षा लांबीने अधिक असून ती भागीरथीपेक्षा अधिक पाणी वाहून आणते. अलकनंदा नदीची लांबी १९५ किमी. असून तिचे पाणलोट क्षेत्र १०,८८२ चौ. किमी. आहे. काही वेळा गंगा नदीचे भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी (कालीगंगा), धौलीगंगा व पिंडर हे पाच शीर्षप्रवाह मानले जातात. या पाचही नद्यांची उगमस्थाने भारताच्या उत्तराखंड राज्यातील बृहत हिमालय (हिमाद्री) पर्वतरांगांमध्ये, भारताकडील म्हणजेच दक्षिण बाजूवर आहेत. ही सर्व उगमस्थाने चीनचा स्वायत्त प्रदेश असलेल्या तिबेटच्या सरहद्दीपासून अगदी जवळ आहेत.
अलकनंदा नदीचा उगम उत्तराखंड राज्याच्या उत्तर भागात असलेल्या सतोपंथ व भगीरथ खरक या दोन हिमनद्यांच्या संगमस्थानातील जिव्हेतून होतो. हे उगमस्थान हिमालय पर्वतातील नंदादेवी या प्रसिद्ध शिखरापासून उत्तरेस ५० किमी. अंतरावर, समुद्रसपाटीपासून सुमारे ३,८८० मी. उंचीवर आहे. अलकनंदा नदीला तिच्या प्रवाहमार्गात अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यांपैकी सरस्वती, धौलीगंगा, नंदाकिनी, पिंडर या डाव्या तीरावरील प्रमुख उपनद्या असून मंदाकिनी ही उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी आहे. उगमानंतर अलकनंदा नदी मान या खेड्याजवळ वाहत आल्यानंतर केशव प्रयाग येथे तिला उजवीकडून मान खिंडीतून वाहत येणारी सरस्वती ही उपनदी येऊन मिळते. मान हे ठिकाण भारत–तिबेट सरहद्दीपासून केवळ २६ किमी. अंतरावर आहे. मानपासून पुढे ती खोल दरीमधून वाहू लागते. पुढे साधारण चार किमी. वर तिच्या काठावर बद्रीनाथ हे तीर्थक्षेत्र आहे. बद्रीनाथपासून पुढे गेल्यानंतर हनुमान चट्टी येथे तिला उजव्या तीरावर घृत गंगा ही उपनदी येऊन मिळते. हनुमान चट्टीपासून पांडुकेश्वर येथे आल्यानंतर ही नदी तीव्र उताराच्या प्रदेशातून व रुंद दरीतून वाहू लागते. त्यानंतर विष्णुप्रयाग येथे तिला डावीकडून धौलीगंगा ही उपनदी येऊन मिळते. त्यानंतर ती पश्चिमेकडे वाहत जाऊन जोशीमठ येथे येते. जोशीमठपासून पुढे हेलंग गावाजवळ अलकनंदा नदी ‘मेन सेंट्रल थ्रस्ट’ पार करते. मेन सेंट्रल थ्रस्ट हा भूशास्त्रीय प्रस्तरभंग असून हिमालयातील या ठिकाणी भारतीय भूपट्ट यूरेशियन भूपट्टाखाली घुसलेला आहे. त्यानंतर बिराही गावाजवळ तिला डाव्या तीरावर बिराही गंगा नदी मिळते. पुढे नंदप्रयाग नगराजवळ डाव्या तीरावर अलकनंदा नदीला नंदाकिनी ही उपनदी येऊन मिळते. त्यानंतर कर्णप्रयाग येथे डाव्या तीरावरून येणारी पिंडर ही उपनदी, तर रुद्रप्रयाग येथे उजव्या तीरावर मंदाकिनी उपनदी अलकनंदा नदीला येऊन मिळते. रुद्रप्रयागपासून पुढे आल्यानंतर पौडी गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर येथे अलकनंदा नदी रुंद दरीत प्रवेश करते. त्यानंतर अखेरीस देवप्रयाग येथे अलकनंदा नदीला उजवीकडून वाहत येणारी भागीरथी ही प्रमुख नदी येऊन मिळते. देवप्रयाग येथील अलकनंदा व भागीरथी या दोन नद्यांचा संयुक्त प्रवाहच पुढे प्रसिद्ध गंगा नदीच्या रूपात वाहू लागतो. गंगा नदी पुढे उत्तर भारतीय मैदानाच्या उत्तर सीमेवरील शिवालिक टेकड्यांमधून (बाह्य हिमालयातून) आग्नेयीस वाहत जाऊन ऋषिकेश येथे पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडते. हृषीकेशपासून पुढे सुमारे २५ किमी. अंतरावर असलेल्या व हिंदुंचे तीर्थक्षेत्र असलेल्या हरद्वारपासून गंगा नदी उत्तर भारतीय मैदानाच्या सखल प्रदेशात प्रवेश करते.
गंगा नदीचा दुसरा मुख्य शीर्षप्रवाह असलेल्या भागीरथी नदीचा उगम हिमानी प्रदेशात असलेल्या गंगोत्री हिमनदीच्या टोकाशी असलेल्या हिमगुहेतून होतो. गंगोत्री हे हिंदु धर्मियांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे उगमस्थान समुद्रसपाटीपासून सुमारे ३,००० मी. उंचीवर आहे. प्रत्यक्षात भागीरथी (गंगा) नदीचा उगम गंगोत्रीच्या आग्नेयीस २१ किमी. अंतरावर असलेल्या गोमुखातून होतो. पुराणकथा व आख्यायिकांनुसार भगीरथाने हिमालयात घोर तपश्चर्या करून गंगेला स्वर्गातून पृथ्वीवर आणले, त्यावरूनच गंगेच्या या शीर्षप्रवाहाला भागीरथी म्हणून संबोधले जाते. पुराणकथांमधून गंगा नदीच्या उगमाचा स्त्रोत भागीरथी नदी हाच मानला गेला आहे. पश्चिम बंगाल राज्यातील गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशातील गंगेची दक्षिणवाहिनी शाखासुद्धा भागीरथी या नावाने ओळखली जाते.
अलकनंदा नदीप्रणालीने उत्तराखंड राज्यातील चमोली, रुद्रप्रयाग, टेहरी गढवाल व पौडी गढवाल या जिल्ह्यांचे जलवहन केले आहे. गढवाल प्रदेशातील अनेक नद्या अलकनंदा नदीला येऊन मिळतात. त्यांपैकी पाच प्रमुख नद्यांच्या संगमस्थानांना पंचप्रयाग असे म्हटले जात असून ती सर्व हिंदुंची तीर्थयात्रेची स्थळे आहेत : विष्णुप्रयाग, येथे धौलीगंगा नदी; नंदप्रयाग, येथे नंदाकिनी नदी; कर्णप्रयाग, येथे पिंडर नदी; रुद्रप्रयाग, येथे मंदाकिनी नदी आणि देवप्रयाग, येथे अलकनंदा नदीला भागीरथी नदी येऊन मिळते आणि गंगा नदीची निर्मिती होते.
उगमापासून ते मुखापर्यंत (देवप्रयागपर्यंत) अलकनंदा नदीच्या काठावर अनेक गावे वसली आहेत. यांमधील बहुतेक गावे लोकप्रिय पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रा स्थळे आहेत. बद्रीनाथ, विष्णुप्रयाग, जोशीमठ, चमोली, गोपेश्वर, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर व देवप्रयाग ही या नदीच्या काठावरील प्रमुख गावे व तीर्थस्थाने आहेत. ही नदी प्राचीन साहित्यात अत्यंत पवित्र मानली गेली आहे. चारधाम यात्रेचा भाग असलेले बद्रीनाथ हे गाव अलकनंदा नदीच्या काठावर आहे.
अलकनंदा नदीपात्रात राफ्टिंग हा जलक्रिडाप्रकार मोठ्या प्रमाणात खेळला जातो. अलकनंदा नदीखोऱ्यात ३७ जलविद्युतनिर्मिती प्रकल्प असून त्यांतील बरेचसे प्रकल्प पूर्ण झाले
आहेत, काहींची उभारणी चालू आहे, तर काही नियोजित आहेत. त्यांपैकी बद्रीनाथ, तपोवन, थाराली, तिलवाडा, उर्गम, विष्णुप्रयाग, कालीगंगा-१, कालीगंगा-२, कोटली भेल-१ बी, कोटली भेल-२, मध्यमहेश्वर (मधमहेश्वर), तपोवन विष्णुगढ, श्रीनगर व सिंगोली भटवारी हे प्रमुख प्रकल्प आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५८ हा उत्तराखंड राज्यातील अनेक पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जोडणारा एकमेव प्रमुख महामार्ग आहे. एकूण ५३८ किमी. लांबीचा हा महामार्ग हिमालयातील भारत-तिबेट सीमेजवळील मान गावापासून सुरू होतो व बद्रीनाथ, जोशीमठ, चमोली, विष्णुप्रयाग, नंदप्रयाग, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर व देवप्रयाग या अलकनंदा नदीच्या काठावरील गावांना जोडतो. देवप्रयागपासून पुढे हा महामार्ग हृषिकेश, हरद्वार, रूडकी, मुझफरनगर, मीरत (मेरठ) या शहरांमधून जातो आणि दिल्लीजवळील गाझियाबाद येथे संपतो.
संदर्भ :
- Bharati, Radhakant, Rivers of India, National Book Trust, 2008.
- Singh, R. L., India, A Regional Geography of India, The National Geography Society of India, 1971.
समीक्षक : बाबर मुहम्मद शेख
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.