मानाबे, स्युकुरो : (२१ सप्टेंबर १९३१). जपानमध्ये जन्मलेले अमेरिकन भौतिक व हवामानशास्त्रज्ञ. मानाबे आणि जर्मन सुमुद्रविज्ञानतज्ञ क्लाउस हासलमान यांना पृथ्वीच्या हवामानाचे भौतिक आराखडे, हवामन परिवर्तनाचे प्रमाण निश्चिती आणि जागतिक तापमानवाढीचा विश्वसनीय अंदाज यासाठी जटिल भौतिक प्रणालींबद्दलच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल २०२१ मधील भौतिकशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक अर्धे विभागून देण्यात आले. तसेच जॉर्जो पॅरीसी यांना अणू ते ग्रहांच्या प्रमाणापर्यंत भौतिक प्रणालींमधील विकार आणि चढउतारांच्या संशोधनाबद्दल अर्धे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
मानाबे यांचा जन्म जपानमधील शिन्रित्सू एहिमे गावात झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण जुन्या मिशिमे ज्युनिअर हायस्कूलमध्ये झाले. त्यांनी टोकियो विद्यापीठातून भूभौतिकी विषयात बी.ए. (१९५३), एम.ए. (१९५५) आणि डी.एस्सी (१९५८) पदव्या संपादन केल्यात. पुढे ते अमेरिकेतील यू. एस. हवामान केंद्र (नंतरचे नाव नॅशनल वेदर सर्व्हिस) येथे संशोधक हवामानशास्त्रज्ञ पदावर रुजू झालेत. काही वर्षांच्या अनुभवानंतर ते १९६३ मध्ये राष्ट्रीय अनुसंधान प्रयोगशाळेच्या जिओफिजिकल फ्ल्युड डायनॅमिक लॅबोरेटरी (जीएफडीएल) येथे रुजू झालेत. जीएफडीएल आणि प्रिन्सटन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने १९६७ मध्ये नियोजित करण्यात आलेल्या वातावरणीय आणि सागरीविज्ञान कार्यक्रमात ते सामील झालेत आणि पुढल्याच वर्षापासून (१९६८) प्रिन्सटन विद्यापीठाच्या विद्याशाखेत रुजू झालेत. तेथे ते १९९७ पर्यंत अधिव्याख्याता पदावर कार्यरत होते आणि २००५ मध्ये ते विद्यापीठाचे वरिष्ट हवामानशास्त्रज्ञही झालेत.
मानाबे १९६० पासून विकिरणशील वायूंचा प्रामुख्याने पाण्याची वाफ, कार्बन-डायऑक्साइड, ओझोन हवामानबदलांच्या संदर्भात अभ्यास करीत होते. आलेखाच्या कागदांवरील आणि महत्त्वाची आकडेवारी दृश्य स्वरूपात ते संक्षेपाने मांडत असत. त्यांनी हवामान आणि त्यातील बदलांच्या नोंदी पृथक्करणासाठी संगणकाचा वापर केला. त्यामुळे विदेचे निरीक्षण, विश्लेषण जलद करता आले आणि पृथ्वीवरील हवामानबदलाचे एक त्रिमित प्रारूप मांडता आले. त्यांनी प्रारूपाकरिता सूर्याकडून पृथ्वीकडे येणारे सर्व प्रकारांचे प्रारण, जमिनीकडून होणारे उष्णतेचे प्रारण, तापल्यामुळे होणारे हवेचे अभिसरण आणि जलचक्रामुळे हवेत होणारी उष्णतेची घट इ. पर्यावरणीय घटक विचारात घेतले होते. त्यांनी वातावरणातील अन्य घटक स्थिर ठेवल्यास, कार्बन- डायऑक्साइडचे हवेतील प्रमाण दुप्पट झाल्याने पृथ्वीच्या पृष्ठाचे हवामान सु. दोन अंश सेल्शियसने वाढेल, असा निष्कर्ष मांडला. हरितगृह वायू आणि जागतिक तापमान वाढ यांमधील आंतरसंबंध त्यामुळे माहीत झाले आणि मिथेन, कार्बन-डायऑक्साइड इ. घटक कमी करण्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या. परिणामी पृथ्वीवरील हवामान परिस्थिती सुधारण्यास सुरुवात झाली.
मानाबे यांना पुढील अनेक पुरस्कार व पदकांनी सन्मानित करण्यात आले : जपान मिटिऑरॉलॉजिकल सोसायटीचे फुजिवारा अॅवॉर्ड, अमेरिकन मिटीओरॉलॉजिकल सोसायटीचे क्लॅरन्स लेरॉय मायसिंगर अॅवॉर्ड, कार्ल गुस्ताफ रॉस्बी संशोधन पदक, असाही फाउन्डेशनचे ब्लू प्लॅनेट पुरस्कार, रॉजर रिव्हेल पदक, अमेरिकन जिओफिजिकल युनियनतर्फे विल्यम बोवी पदक, फ्रॅन्कलिन इन्स्टिट्यूट अॅवार्ड, रॉयल स्वीडिश अकॅडमीचा क्राफूर्ड पुरस्कार इत्यादी. तसेच ते वॉर्मिंग रिसर्च प्रोग्रॅम फ्रॉन्टियर रिसर्च सेंटर फॉर ग्लोबल चेन्जचे संचालक म्हणूनही नियुक्त करण्यात आले. त्यांचे शंभराहून जास्त शोधनिबंध नियतकालिकांमधून प्रकाशित आहेत. त्यांनी अँथनी ब्रोकोलीयांसह बियॉन्ड ग्लोबल वॉर्मिंग (२०२२) या पुस्तकाचे लेखन केले आहे.
कळीचे शब्द : #हवामानशास्त्र
संदर्भ :
- https://public.wmo.int/en/media/news/climate-scientists-win-nobel-prize-physics
- https://www.princeton.edu/news/2021/10/05/great-fun-manabe-wins-nobel-prize-physics-modeling-climate-change
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC8764662/
समीक्षक : रंजन केळकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.