कोर्त-रीअल, गॅस्पर (Corte-Real, Gaspar) : (१४५०? – १५०१?). प्रसिद्ध पोर्तुगीज मार्गनिर्देशक व समन्वेषक. त्यांचा जन्म अंदाजे इ. स. १४५० मध्ये, अझोर्स द्वीपसमूहातील तर्सेरा बेटावरील अँग्रा दू एरुईझ येथे झाला. अझोर्स द्वीपसमूह हा उत्तर अटलांटिक महासागरातील पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश आहे. त्यांचे वडील जोआओ व्हाझ कोर्त-रीअल हे पोर्तुगालच्या उमराव घराण्यातील होते, तसेच ते तर्सेरा बेटाचे गव्हर्नर होते. जोआओ व्हाझ यांच्या तीन मुलांपैकी गॅस्पर हा सर्वांत धाकटा मुलगा. साहसी आणि लष्करी वातावरणात वाढल्यामुळे गॅस्पर यांना लहानपणापासूनच दर्यावर्दी शोधमोहिमांचे आकर्षण होते. आपल्या वडीलांच्या उत्तर अमेरिकेकडील सफरींत गॅस्परचा सहभाग होता. पोर्तुगीज राजा मॅन्युएल पहिला (इ. स. १४९५ – १५२१) यांच्या दरबाराशी या कुटुंबाचे घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे त्यांना नवीन जगाच्या शोधात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली. जॉन कॅबट यांनी उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्याचा शोध लावल्यानंतर राजा मॅन्युएल पहिला यांनी हे भूभाग पोर्तुगीज हद्दीत येत असल्याचा दावा केला आणि पश्चिमेकडील नवीन भूमी शोधण्यात विशेष स्वारस्य दाखवले.

इसवी सन १५०० मध्ये राजा मॅन्युएल पहिला यांनी गॅस्पर यांना वायव्येकडून सागरी मार्गाने आशियाकडे जाण्याचा मार्ग (नॉर्थ वेस्ट पॅसेज) शोधण्यासाठी पाठविले. या मोहिमेसाठी जहाजे आणि कर्मचाऱ्यांची व्यवस्था गॅस्पर यांना स्वतःच्या खर्चाने करावी लागली. उन्हाळ्यात जून १५०० मध्ये लिस्बनहून निघालेले गॅस्पर, प्रथम अझोर्स बेटांवर थांबले आणि नंतर उत्तरेकडे प्रवास करत ग्रीनलंडच्या किनाऱ्यावर पोहोचले. त्यावेळी त्यांना वाटले की, त्यांनी पूर्व आशिया गाठले आहे; मात्र तेथील बर्फाचे डोंगर आणि प्रतिकूल हवामानामुळे त्यांना किनारी भागात उतरता आले नाही. त्यांनी भेट दिलेल्या प्रेदेशाच्या वर्णनात त्यांनी म्हटले होते की, तो प्रदेश हिरव्यागार दाट अरण्यांनी समृद्ध आहे. गॅस्पर यांनी उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्याला (न्यू फाउंडलंड बेटाला) स्पर्श केला असावा, असाही तर्क केला जातो. तेथून गॅस्पर लिस्बनला परतले. नॉर्थ वेस्ट पॅसेजचा शोध घेणे या आपल्या मूळ उद्देशात त्यांना फारसे यश मिळाले नसले, तरी या मोहिमेमुळे यूरोपीय नकाशांवर नवीन भूभागाची भर पडली.

गॅस्पर यांनी इ. स. १५०१ मध्ये तीन लहान मच्छीमारी नौकांसह आपल्या दुसऱ्या मोहिमेला सुरुवात केली. या सफरीत त्यांचा भाऊ मिग्वेल बरोबर होता. या वेळी त्यांनी मागील प्रवासापेक्षा अधिक पश्चिम दिशेने मार्गक्रमण केले. त्यांनी ग्रीनलंड टाळून बहुतेक सांप्रत लॅब्रॅडॉर प्रदेशाच्या किनाऱ्यावर लंगर टाकला असावा. या प्रदेशात त्यांना मोठ्या नद्यांची पात्रे, पाइनची घनदाट जंगले आणि विविध प्रकारची रानफळे आढळली. त्यामुळे हा भूभाग आशियापेक्षा भिन्न असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या मोहिमेचा एक अत्यंत विवादास्पद पैलू म्हणजे त्यांनी लॅब्रॅडॉरमध्ये अनेक स्थानिक आदिवासींना गुलाम म्हणून पकडले. त्यांना पोर्तुगालमध्ये विकून मोहिमेचा खर्च भरून काढण्याची त्यांची योजना होती. परतीच्या प्रवासात वादळामुळे त्यांची तीन जहाजे एकमेकांपासून विलग झाली. दोन जहाजे पकडलेल्या आदिवासींसह सुखरूप लिस्बनला पोहोचली; परंतु गॅस्पर स्वतः चालवत असलेले तिसरे जहाज समुद्रात कायमचे हरवले आणि त्यांचा पुढे कधीही पत्ता लागला नाही. इ. स. १५०१ नंतर गॅस्परच्या मोहिमेबाबत विशेष माहिती चर्चेत आली नाही. अगदी सुरुवातीच्या काळात न्यू फाउंडलंडपर्यंत किंवा कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत गेलेल्या मोहिमांपैकी गॅस्परच्या मोहिमा होत्या. गॅस्परच्या सपरींच्या मार्गांबाबत भिन्न भिन्न मतप्रवाह आढळतात.

गॅस्पर यांच्या अचानक गायब होण्यामुळे त्यांचे मोठे बंधू मिग्वेल कोर्त-रीअल यांनी इ. स. १५०२ मध्ये गॅस्पर यांना शोधण्यासाठी एक बचाव मोहीम हाती घेतली. मिग्वेलनेही उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यापर्यंत प्रवास केला; परंतु तोदेखील समुद्रात हरवला आणि परतला नाही. या दुःखद घटनांनंतर राजा मॅन्युएल पहिला यांनी कोर्त-रीअल बंधूंपैकी वास्को अनेस यांना पुढे कोणतीही शोध मोहीम हाती घेण्यास मनाई केली. अशाप्रकारे या कुटुंबाच्या शोधाची गाथा एका शोकांतिकेने संपली.

गॅस्पर हे पोर्तुगालच्या समृद्ध शोधयुगातील एक महत्त्वपूर्ण नाव ठरले. त्यांच्या शोधमोहिमांचे यूरोपात दूरगामी परिणाम झाले. विशेषतः न्यू फाउंडलंड प्रदेशातील मासे, लाकूड आणि इतर संभाव्य संसाधने यांबाबत पोर्तुगालमध्ये प्रचंड रस निर्माण झाला. यूरोपीय नकाशांवर ‘टेरा दे कोर्त-रीअल’ आणि ‘कॉडफिश लँड’ अशी नावे दिसू लागली. या शोधांमुळेच न्यू फाउंडलंड जवळच्या ग्रँड बँक या प्रसिद्ध मत्स्यक्षेत्रात पोर्तुगीज मासेमारी व्यवसायाला मोठी चालना मिळाली. आजही मेमोरियल युनिव्हर्सिटी ऑफ न्यू फाउंडलंडच्या सेंट जॉन्स परिसरात गॅस्पर यांच्या पुतळ्याद्वारे पोर्तुगीज मासेमारी समुदायाने दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते, जो त्यांच्या वारशाचे प्रतीक आहे. गॅस्पर यांचा इतिहास हा केवळ एका समन्वेषकाच्या साहसाचा भाग नसून तो नवीन जगाच्या शोधाच्या मानवी महत्त्वाकांक्षेचा आणि तिच्या अनपेक्षित परिणामांचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.

संदर्भ :

  • Lamb, Harold, New Found World: How North America Was Discovered and Explored, New York, 1955.
  • Parry, J. H., The Age of Reconnaissance, New York, 1963.
  • Prestage, Edgar, The Portuguese Pioneers, London, 1933.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.