पृथ्वीवरील आर्थिक महत्त्व असणारे आणि औद्योगिक व इतर कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांचा अभ्यास करणारे एक महत्त्वाचे शास्त्र. आर्थिक भूविज्ञान हा विषय सर्व खनिज स्रोतांची उत्पत्ती, त्यांचे प्रगटीकरण, वितरण आणि उपयुक्तता यांवर आधारित आहे. भूविज्ञान अथवा पृथ्वी विज्ञान ही शाखा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आढळणारे खडक आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया यांसंबंधी अभ्यास करते. या विषयामध्ये खनिजशास्त्र, खडक विज्ञान (पेट्रॉलॉजी), भौतिक भूविज्ञान, आर्थिक भूविज्ञान यांसारख्या बऱ्याच उपशाखा महत्त्वाच्या आहेत.

विसाव्या शतकापासून अनेक आर्थिक खनिजे राष्ट्रीय जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देत आले आहेत. शेतीप्रमाणेच खनिजांसाठीही उत्खनन करणे ही मानवाची मूलभूत गरज बनली आहे; कारण आपल्या दैनंदिन जीवनात दररोज अनेक खनिजांचा वापर केला जात असतो. त्यामध्ये सोने, चांदी, लोह, तांबे, कार्बन इत्यादी धातू आणि गैर धातूंचा वापर खनिज साठ्यातून होतो. आज वापरत असलेल्या बहुतेक उत्पादनांसाठी हे धातू मूलभूत कच्चा माल तयार करतात. उदा., तांबे, झिंक, सिलिका, कथील, सोन्याचे रिज इत्यादी. अशा सुमारे ३८ घटकांचा उपयोग भ्रमणध्वनी आणि संगणकांच्या निर्मितीमध्ये केला जातो.

भूगर्भशास्त्रज्ञांनी खनिजांच्या साठ्यास अयस्कसाठा (ओरे डिपॉझिट) असे संबोधले आहे. धातूचा अर्थ घन, नैसर्गिकरित्या उद्भवणाऱ्या खनिज सांद्रता म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो, जो आर्थिक दृष्ट्या उत्खनन केला जाऊ शकतो. त्यामध्ये धातू व गैरधातू अशी दोन्ही खनिजे समाविष्ट असतात. द्रव स्वरूपात उद्भवणारे इंधनदेखील (पेट्रोलियम) एक प्रकारचे आर्थिक खनिज साठाच आहे. हे खनिज उत्खननाद्वारे काढले जाऊन त्यातील मूल्यवान घटक शुद्धीकरण किंवा इतर प्रक्रियेद्वारे प्राप्त केले जातात. खडकांमध्ये उपस्थित असलेल्या वेगवेगळ्या खनिजांच्या एकत्रिकरणाच्या प्रक्रियेमुळे त्यातून विविध खनिजे आढळून येतात.

कच्च्या खनिजांमध्ये क्वचितच धातूचा साठा १०० टक्के असतो आणि तो खडकांमध्ये खनिज प्रक्रियेदरम्यान तयार झालेल्या इतर खनिजांशी संबंधित असतो. कच्च्या धातूचा घटक कच्च्या धातूचा काळ म्हणून संबोधित केला जातो. संबंधित खनिज ज्यांचे कोणतेही व्यवसायिक मूल्य नसते, त्यांना गँग खनिज (गँग मिनरल) म्हणून ओळखले जाते. धातूची आर्थिक किंमत ही धातूची टक्केवारी आणि कोणत्याही क्षेत्रापासून खाण घालता येईल अशा एकूण टनाद्वारे व्यक्त केलेल्या साठ्याच्या कालावधीद्वारे मोजली जाते.

आर्थिक खनिज स्रोतांचे धातू व गैरधातू, खनिज इंधन, रत्न आणि औद्योगिक खनिजे अशा एकूण चार श्रेणींमध्ये विस्तृतपणे वर्गीकरण केले जाते.

  • (१) धातू व गैरधातू : यामध्ये सोने, चांदी, लोखंड, तांबे, शिसे, जस्त इत्यादी धातू व गैरधातुंचा समावेश होतो.
  • (२) खनिज इंधन : यात कोळसा, तेल, नैसर्गिक वायू इत्यादींचे खनिज इंधन म्हणून वर्गीकरण केले जाते.
  • (३) रत्न : यामध्ये माणिक आणि हिरे या धातूंचा समावेश होतो.
  • (४) औद्योगिक खनिजे : बांधकामाच्या वाळूपासून अभ्रकापर्यंतच्या (मिका) अन्य खनिज आणि व्यवसायिक महत्त्व असलेल्या खडकांचे औद्योगिक खनिजांमध्ये वर्गीकरण केले जाते.

भारत हा अनेक खनिज साठ्यांनी समृद्ध असा देश आहे. भारतातील खाण उद्योगाने भारताच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेच्या ढोबळ घरेलू उत्पादनातील योगदान २.२ टक्क्यांपासून ते सुमारे ११ टक्क्यांपर्यंत बदलते. हा उद्योग भारतात सुमारे सात लाख औद्योगिक क्षेत्रांच्या रोजगार संधी पुरवितो. महाराष्ट्रात प्रामुख्याने तेल व नैसर्गिक वायू, मँगॅनीज, कच्चे लोह, दगडी कोळसा, बॉक्साइटक्रोमाइट, सिलिमनाइट, केनाइट, बॅरेट, झेलाइट्स व दुय्यम सिलिका इत्यादी खनिजे आढळतात.

संदर्भ :

  • दुबे, विद्यासागर, भारत का आर्थिक भूगोल, लखनौ, १९६८.
  • Verma, D. N., Economic Geology, Centrum Press, 2012.

अनुवाद : अविनाश कुलकर्णी

समीक्षक : संतोष दास्ताने


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.