लाला गंगावणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तबला व ढोलकीवादक. संपूर्ण नाव लाला अमृत गंगावणे असे आहे. ते शिरूर जि.पुणे येथील राहणारे होते. ते पुण्याजवळील घोडनदी शिरूर येथे राज्य परिवहन महामंडळात नोकरीत होते. काम करीत करीत बसच्या पत्र्यावर वाजवण्याचा छंद त्यांना जडला. तेथूनच त्यांचा कलाक्षेत्राकडे प्रवास सुरु झाला. सुरुवातीस ते एका तमाशा मंडळात  ढोलकीवादक म्हणून कामाला लागले. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटातील गाण्यामधून तबला व ढोलकीवादन करून नावलौकिक मिळविला.

महाराष्ट्र  राज्य परिवहन महामंडळात ( एसटी) नोकरीस  असताना त्यांच्यातील दडलेला कलावंत जागा झाला. बस धुण्याचे काम करीत असताना बसच्या पत्र्यावर त्यांचा हात तालात वाजवण्यासाठी चालत राहायचा. येथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी एका तमाशा मंडळात ढोलकीवादक म्हणून रुजू झाले. त्यांना कलाक्षेत्रात आदराने लालाभाऊ म्हणून संबोधले जायचे. उपजतच कला अंगात भिनलेली असल्यामुळे त्यांनी अल्पावधीतच ढोलकीवादनावर हुकूमत मिळविली.  त्यांच्या तमाशा मंडळाचे जागोजागी कार्यक्रम होत असायचे तेव्हा त्यांच्या ढोलकीवादनाला रसिकांची प्रचंड दाद मिळायची. त्यांच्या ढोलकीवादनावर अनेक तमाशा नृत्यांगना बेभान होऊन नाचायच्या.

आपल्या ढोलकीवादनात शास्त्रशुद्धता यावी म्हणून त्यांनी तबला वादनाचे खास प्रशिक्षण घेतले. ते ज्या तमाशा मंडळात ढोलकीवादक म्हणून कार्यरत होते, त्या तमाशा मंडळाला यात्रा-जत्रा व विविध कार्यक्रमांसाठी खूप मागणी होती. अशातच त्यांचे तमाशा मंडळ संपूर्ण कलावंतासह मुंबईतील पिला हाऊस येथील बॉम्बे थेअटरला कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी या तमाशा मंडळाचा कार्यक्रम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक राज कपूर यांनी पाहिला.  राज कपूर हे सतत लोककलावंतात मिसळून राहायचे.  याच दरम्यान राजकपूर यांच्या ‘आवारा’ या चित्रपटातील ‘घर आया मेरा परदेसी…’ या गाण्याचे ध्वनीमुद्रण मुंबईतील ताडदेव येथील ‘फेमस ‘ स्टुडिओ मध्ये सुरू होते. यावेळी संगीतकार शंकर जयकिशन उपस्थित होते. सकाळ पासूनच सराव सुरू होता. संध्याकाळीचे आठ वाजले तरी राज कपूर यांना या गाण्याचा ठेका आणि वादन काही आवडत नव्हते.  यावेळी अनेक दिग्गज वादकांचा  कस लागला परंतू म्हणावे तसे काही जमत नसल्यामुळे राज कपूर संतुष्ट होत नव्हते.  शेवटी त्यांच्या डोक्यात आले की, मी काल रात्री पिला हाऊसला लावणी नृत्य बघायला आणि गाणे ऐकायला गेलो तेव्हा तेथे एक ढोलकीवादक अफलातून ढोलकीवादन करताना पाहिला. त्याचे ढोलकीवादन ऐकून मी मंत्रमुग्ध झालो. कार्यक्रमानंतर त्यांना नाव विचारले तर त्यांनी लालाभाऊ असे नाव सांगितले. ते तिकडे आहेत का बघा आणि असतील तर ढोलकीसकट त्यांना गाडीत घालून आणा असे फर्मान ढोलकीवादक दत्ताराम वाडकर यांना राज कपूर यांनी सोडले.  या आदेशाचे पालन करीत तात्काळ ढोलकीवादक दत्ताराम वाडकर हे थेट बॉम्बे थेअटरला पोहोचले.

लालाभाऊ ज्या तमाशा मंडळासोबत आले होते त्यांचे सादरीकरण नुकतेच संपले होते. येथे ढोलकीवादक दत्ताराम वाडकर यांनी लालाभाऊंची भेट घेत सर्व हकिगत सांगितली. ते लालाभाऊंना ढोलकीसह सोबत घेऊन ताडदेव येथील फेमस स्टुडिओ मध्ये दाखल झाले. राज कपूर यांनी लालाभाऊंना सर्व गाणे समजवले.आणि सराव करून घेतला. त्यामुळेच ‘घर आया मेरा परदेसी.’ या गाण्यात लालाभाऊंचे ढोलकी वादन अप्रतिम झाले. त्यानंतर संगीतकार सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच चित्रपटात लालाभाऊंची ढोलकी वाजली. त्यांचे तबलावादनतही प्रभुत्व होते.  पाकिजा हिंदी चित्रपटात त्यांनी सुरेख वाजवलेली ढोलकी खूप गाजली.

हिंदी चित्रपट आझाद मधील जारे जारे ओ कारी बदरीया, अपलम चपलम, राधा ना बोले ना बोले रे, चोरी चोरी चित्रपटातील मन भावन के संग जाये गौरी…, पैगाम चित्रपटातील चलते चलते यूही कोई, इनही लोगोने लेख लिया दुपट्टा मेरा, काली टोपी लाल रुमाल चित्रपटातील दगा दगा वै वै वै, तेरे घर के सामने चित्रपटातील तू कहा ये बता, नागिन चित्रपटातील जादूगर सैया छोडो मेरी बैया, तेरी याद मे जलकर देख लिया, कठपुतली चित्रपटातील इतने बडे जहा मे आखिर, आह चित्रपटातील घर आया मेरा परदेसी, ऑपेरा हाऊस चित्रपटातील बलमा माने ना, बंदिनी चित्रपटातील ओ पंछी प्यारे, परख चित्रपटातील ओ सजना बरखा बहार, मधुमती चित्रपटातील आजा रे परदेसी मै तो कबसे खडी इस पार…, या लोकप्रिय गाण्यांना ढोलकीची अफलातून साथ देत ही गाणी लालभाऊंनी रसिकप्रिय केली. तर मराठी चित्रपट पुढचं पाऊल मध्ये जाळी मंदी पिकली करवंद. या गाजलेल्या गाण्यास त्यांचे कडक ढोलकीवादन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आहे. तसेच त्यांनी प्रसिद्ध तबला  ढोलकीवादक अण्णा जोशी व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लोकप्रिय ढोलकीवादक विजय चव्हाण यांच्यासमवेत लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांच्या लावणीच्या ध्वनिमुद्रिकामध्ये एकत्रीत ढोलकीवादन करून ही मुद्रिका लोकप्रिय केली.

वाद्यातील तालावर त्यांची हुकूमत होती. त्यामुळे रंगमंचावर त्यांचे ढोलकीवादन ऐकणे म्हणजे रसिकांसाठी एक वेगळेपण असायचे. वाद्यावर अफलातून बोटे फिरवीत त्यांचे वादन रंगून जायचे.  ढोलकीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या कलावंताने या वाद्यांचा बाज ढळू दिला नाही. ते तबल्यावर एकताल, दादरा, दीपचंदी या प्रकारचे ताल प्रचंड आत्मविश्वासाने वाजवायचे.  १९५३ साली ‘झांझर’ सिनेमात लालाभाऊंनी अफलातून तबला वाजवून एक वेगळेपण सिद्ध केले. त्यांनी संपूर्ण हयातीत ढोलकीवर जीवापाड प्रेम करीत त्यासाठीच आयुष्य समर्पित केले.  त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात तबला, ढोलकीवादन करून नावलौकिक प्राप्त केला. शेवटपर्यंत ढोलकीवर प्रेम करणाऱ्या या प्रतिभासंपन्न कलावंताचे वृध्दापकाळाने निधन झाले.

संदर्भ : क्षेत्रसंशोधन

समीक्षक : जगतानंद भटकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.