क्वोलेक, स्टेफनी : (३१ जुलै १९२३ — १८ जून २०१४). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी अतिशय मजबूत आणि वजनाने हलक्या अशा केव्हलार या कृत्रिम तंतूचा शोध लावला.

क्वोलेक यांचा जन्म अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथे झाला. त्यांनी कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॅाजीमधून (सध्याचे कार्नेजी मेलॉन युनिव्हर्सिटी) रसायनशास्त्रात पदवी संपादन केली (१९४६). वैद्यकीय शिक्षणाच्या आर्थिक तरतुदीसाठी त्यांनी न्यू जर्सीच्या ड्युपाँट या संस्थेत प्रयोगशाळा मदतनीस म्हणून काम सुरू केले. तेथील काम त्यांना आवडल्याने त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय बदलून त्या संस्थेतच काम सुरू ठेवले. पुढे त्या ड्युपाँटच्या विलमिंग्टन  संशोधन प्रयोगशाळेत काम करू लागल्या (१९५०) आणि तेथूनच त्या सह-संशोधक या पदावरून सेवानिवृत्त झाल्यात (१९८६).

क्वोलेक यांनी पॉल डब्ल्यू. मॉर्गन यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅरामाइडांवर (अ‍ॅरोमॅटिक पॉलिअमाइड) संशोधन केले. अ‍ॅरामाइड हे बहुवारिक असून त्यापासून मजबूत, कठीण आणि ज्वाला-प्रतिरोधक तंतू बनविता येतात.  मॉर्गन यांच्या निदर्शनास आले की, रेणवीय साखळ्यांमधील बेंझीन रिंगांमुळे अ‍ॅरामाइडपासून कठीण तंतू तयार होतात, परंतु ते उच्च तापमानावर वितळत असल्याने त्यांना द्रावणातच तयार करावे लागतात. क्वोलेक यांनी पॉली-एम-फिनिलीन आयसोफ्थालामाइड तयार करण्यासाठी योग्य द्रावक आणि बहुवारिकनाच्या परिस्थिती निश्चित केल्या. ड्युपाँट कंपनीने १९६१ मध्ये ‘नोमेक्स’ या व्यापारी नावाने त्याला ज्वाला-प्रतिरोधक तंतू म्हणून बाजारात आणले. त्यानंतर त्यांनी आपले संशोधन पॉली-पी-बेंझामाइड आणि पॉली-पी-फिनिलीन टेरेफ्थालामाइडपर्यंत वाढविले. त्यांच्या असे लक्षात आले की, द्रावणामध्ये या संयुगांची रेणवीय संरचना नियमित आणि दांड्यासारखी असते. या दोन द्रव स्फटिक बहुवारिकांपासून तयार झालेल्या तंतूंमध्ये अभूतपूर्व कडकपणा आणि ताणशक्ती होती. पॉली-पी-फिनिलीन टेरेफ्थालामाइड यालाच १९७१ मध्ये ‘केव्हलार’ या व्यापारी नावाने व्यावसायिक रीत्या बाजारात आणले गेले. या तंतूचे पुढे धाग्यात रूपांतर झाले. हा धागा अतिशय मजबूत (स्टीलपेक्षा ५ पटींनी मजबूत) आणि वजनाने खूपच हलका आहे. त्याला उच्च दर्जाचा कठीणपणा असल्याने तो मोठे आघात सहन करू शकतो. त्याची उच्च तापमान सहन करण्याची क्षमता ४०० °C तापमानापर्यंत आहे. धागा गंजत नाही आणि तो वीज प्रवाहित करत नाही. या धाग्याची बहुतांश रसायनांशी प्रक्रिया होत नाही. हा धागा पेट घेत नाही आणि जळतही नाही. परंतु अतिनील किरणांनी या धाग्याची मजबूती घटते.

केव्हलार मधील या सर्व गुणधर्मांमुळे हा धागा बंदुकीच्या गोळ्यांपासून संरक्षण करणारे कपडे तयार करण्यासाठी, विमानाची तावदाने बनवण्यासाठी, चार चाकी वाहनांचे भाग बनवण्यासाठी, संरक्षक न कापले जाणारे कापड तयार करण्यासाठी, प्रचंड मजबूत दोरखंड बनवण्यासाठी, आगीपासून संरक्षण करणारे कपडे तयार करण्यासाठी (अग्नीशमन दलासाठी कपडे आणि आवश्यक गोष्टी), अतिशय हलक्या (वजनास कमी) दुचाकी बनवण्यासाठी इत्यादी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.

क्वोलेक यांच्या शोधामुळे आणि या धाग्याच्या निर्मितेमुळे क्रांतिकारी प्रगती झाली आहे. त्यामुळे, त्यांना पुढीलप्रमाणे अनेक पुरस्कार आणि मानसन्मानांनी सन्मानित करण्यात आले : ड्युपाँटचे ले वॉयजर मेडल, नॅशनल इन्वेनटर्स हॉल ऑफ फेम, नॅशनल मेडल ऑफ टेकनॉलॉजी, परकिन मेडल, नॅशनल वुमेन्स हॉल ऑफ फेम इत्यादी. त्यांच्या नावे १७ हून अधिक एकस्वे आहेत. त्यांनी भरपूर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच लहान मुलांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी बरेच उपक्रम राबविले.

क्वोलेक यांचे  विलमिंग्टन येथे  निधन झाले.

कळीचे शब्द : #केव्हलार

संदर्भ :

समीक्षक : दिलीप हेर्लेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.