( स्थापना -१९६६ ).
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया ही संशोधन संस्था पुण्याला टेकडी येथे असून ती देशात सुरक्षित, प्रदूषणरहित आणि अधिक कार्यक्षमतेच्या वाहनांच्या निर्मितीसाठी संशोधन करते. ही संस्था वाहनांसंबधी संशोधन व विकास, चाचण्याद्वारे विश्लेषण करणे, प्रमाणपत्रे देणे, कायदे तयार करणे इत्यादी कामे हाती घेते, त्यात एकजिनासीपणा आणत असते.
भारत सरकारच्या अवजड उद्योग खात्याच्या अखत्यारीत असलेली ही संस्था देशातील मोटर उद्योगाच्या नियंत्रणाखाली कार्यरत असते. येथे नमून्यांच्या विश्लेषण कामासोबतच साधनां-उपकरणांचे वर्गीकरणदेखील केले जाते. मोटर व्यवसायात लागणारी वाहनांच्या विविध भागांची नावीन्यपूर्ण रचना, त्यासंबधीचे तंत्रज्ञान उद्योजकांना पुरवून उत्पादनाला चालना देणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानके वापरून मालाची तपासणी करण्याचे काम या प्रयोगशाळेत चालते. नवनव्या इंजिनाच्या नि वाहनाच्या प्रतिकृती (models) तयार करून त्यांची उपयुक्तता तपासली जाते. वाहनांच्या एकूण सुरक्षिततेसाठीदेखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरची मानके वापरून त्यांची ग्वाही दिली जाते. वाहनाच्या विविध भागांवर गतीमुळे येणारा ताण, त्यांचा अती वापर, होणारी झीज, घर्षण अशा विविध पैलूंचा येथे अभ्यास होतो. वाहनांच्या उभारणीसाठी लागणार्या शक्तीशाली लोंखंड आणि ॲल्युमिनियमच्या मिश्रधातूंचे रासायनिक, भौतिक, चलनशक्तीविषयक अशा नाना गुणधर्मांचा तपासणी येथे केली जाते. या सार्या विविध तपासणीतून मिळणारी माहिती (डेटाबँक) संस्थेत उपलब्ध असतात.
पेट्रोल, डीझेल, एल.पी.जी, सी.एन.जी. या इंधंनावर धावणार्या इंजिनांची केलेली निर्मिती ही हलक्या व जडवाहनांसाठी वापरली जातात. गंधकरहित इंधंनावर धावणारी यूरो-४ वाहने प्रदूषण करत नाहीत व त्यांचा विकास या संस्थेने केला आहे. त्याहीपुढे भविष्यात येणार्या यूरो-५ व यूरो-६ इंधंनांना संयुक्तिक ठरणारी इंजिने विकसित करण्यावर ही संस्था पावले उचलत आहे. वाहनांच्या धुराड्यातून बाहेर पडणार्या प्रदूषकांची व त्याद्वारे होणार्या हवेच्या प्रदूषणाची मोजमाप करणार्या चासिस डायनॅमो मीटर या साधनाची सुविधा याठिकाणी उपलब्ध असते. इंजिनाशी निगडीत विविध भागांची आणि घटकासंबधी येथे संशोधन होत असते. तसेच त्यांची तपासणी करण्याच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. वाहनांसाठी वापरली जाणारी इंधने, वंगणे, धक्काशोषक तेले, ब्रेक ऑइल, शीतलक (कुलंट), ग्रीजेस; यांचे विविध चाचण्यांद्वारे विश्लेषण करणार्या सुविधा तेथल्या प्रयोगशाळांत उपलब्ध आहेत. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात तज्ञ बनू इच्छिणार्या होतकरू तरुणांना प्रशिक्षण देण्याचे कार्य या संस्थेत हाती घेतले जाते. जगभरच्या मोटर उद्योगात विकसित होणार्या तंत्रज्ञांनाची माहिती पुरवणारी पत्रिका येथून प्रकाशित होत असते. अशाप्रकारे, वेगवेगळ्या वाहनांचा सर्वांगीण विकास करत देशाला गतिशील ठेवण्याच्या कामात ही संस्था कार्य करते.
कळीचे शब्द : #संशोधनसंस्था #भारत #पुणे #महाराष्ट्र #जडवाहतूक #प्रदुषण #इंधन
संदर्भ :
समीक्षक – अ. पां. देशपांडे