स्वामी हरिहरानंद आरण्य : (४ डिसेंबर १८६९ – १८ एप्रिल १९४७). तपस्वी योगी, ग्रंथकार व कपिल मठाचे संस्थापक. स्वामी हरिहरानंद आरण्य यांचा जन्म पश्चिम बंगालमधील एका सधन कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना भौतिक गोष्टींपासून विरक्ती होती. औपचारिक शिक्षणापेक्षा आध्यात्मिक ज्ञान व मोक्षमार्गाचे त्यांना कुतूहल होते. त्यामुळे त्यांनी लहानपणीच संन्यास दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गावर निष्ठापूर्वक वाटचाल चालू केली. हरिद्वारचे भोलानंद गिरी महाराज यांच्या सूचनेनुसार त्यांनी बनारस येथे राहून प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास केला.

स्वामीजींनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास पूर्ण करून खडतर साधना करण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी गयेजवळील बाराबार टेकड्यांमधील गुहेमध्ये सहा वर्षे राहून आध्यात्मिक साधना पूर्ण केली. या काळातील त्यांच्या जीवनाचे वर्णन त्यांचे शिष्य स्वामी धर्ममेघ आरण्य यांनी केले आहे. स्वामीजींनी त्यानंतर या प्रदेशातून स्थलांतर करून पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील त्रिबेणी येथे साधना सुरू ठेवली. यानंतर वाराणसी, हरिद्वार, ऋषीकेश आणि हिमालयातील इतर अनेक ठिकाणी त्यांनी अध्यात्मिक साधना केली. या काळामध्ये सांख्य-योगाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी स्वामीजींनी बंगाली व संस्कृत भाषेमध्ये लेखन केले. खडतर साधनेतून आलेल्या स्वानुभवांवर आधारित असलेले त्यांचे सर्व ग्रंथ तर्कशुद्ध व भेदक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. पतंजली मुनींची ‘योगसूत्रे’ व त्यावरील व्यास मुनींचे भाष्य या विषयावरील स्वामी हरिहरानंद आरण्य यांचा ‘भास्वती’ हा संस्कृत व बंगाली भाषेतील टीका ग्रंथ भारतीय तत्त्वज्ञानातील एक मानक संदर्भग्रंथ मानला जातो. वैदिक परंपरेतील योगाच्या काही ग्रंथांमध्ये आणि गौतम बुद्धांच्या शिकवणीमध्ये साम्य आढळून आल्यामुळे स्वामीजींनी बौद्ध धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी ते पाली भाषा शिकले. भारताच्या विविध भागांतून तसेच तिबेट आणि श्रीलंकेतून उपलब्ध झालेल्या बौद्ध-धर्म संबंधातील हस्तलिखितांचा देखील त्यांनी अभ्यास केला. त्यांनी काही बौद्ध ग्रंथांचे बंगालीमध्ये भाषांतर केले. त्यापैकी ‘धम्मपद’ आणि शांतीदेवांचे ‘बोधिचर्यावतार’ हे उल्लेखनीय आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी बंगाली भाषेत ‘अपूर्व भ्रमण वृत्तांत’, ‘भ्रांतिनाश ओ सुदेशना’, ‘समाप्ती’, ‘सरल सांख्य योग’, ‘सृष्टिसार’, ‘योगकारिका’, ‘कर्मतत्त्व’ आणि ‘स्वाध्यायरत्नम्’ हे ग्रंथ लिहिले. पुढील काळात त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ इंग्रजी भाषेत अनुवादित केले गेले. स्वामी धर्ममेघ आरण्य यांनी संस्कृत आणि बंगाली न जाणणाऱ्या साधकांसाठी स्वामी हरिहरानंद यांचे विचार हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधून पोहोचवले. स्वामीजींना विसाव्या शतकातील बंगालमधील महत्त्वाच्या विचावंतांपैकी एक मानले जाते.
स्वामींच्या एका शिष्याने गुरूंचे कायम निवासस्थान म्हणून मधुपूर (पूर्वीच्या बिहार व सध्याच्या झारखंड राज्यातील ठिकाण) येथे कृत्रिम गुहा असलेले एक घर स्वत: निर्माण केले. येथे १४ मे १९२६ रोजी स्वामीजी वास्तव्यास आले. नंतरच्या काळात हेच ठिकाण ‘कपिल मठ (आश्रम)’ म्हणून परिचित झाले. स्वामीजींनी पुढील २१ वर्षे येथेच राहून अभ्यास आणि ध्यानधारणा केली. याच ठिकाणी आध्यात्मिक एकांतवासामध्ये स्वामीजींचे निधन झाले. स्वामी हरिहरानंद आरण्य यांची ही परंपरा त्यांच्या शिष्यांनी कपिल मठामध्ये श्रद्धापूर्वक जपली आहे. सांख्य-योगाला जीवनातील एकमेव ध्येय म्हणून स्वीकारणाऱ्या त्यांच्या अनुयायांना राहण्यासाठी गुहेजवळच मठ बांधण्यात आला.

कपिल मठ : हा प्रामुख्याने सांख्य, योग आणि संबंधित भारतीय दर्शनांच्या प्रचारासाठी आणि सत्य साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य करणारा एक जगप्रसिद्ध आश्रम आहे. स्वामी हरिहरानंद आरण्य यांच्यानंतर स्वामी धर्ममेघ आरण्य (१८९२ – १९८५) व स्वामी भास्कर आरण्य (१९४२ – फेब्रु. २०२६) यांनी समर्थपणे साधनेचा व सांख्य-योग तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसाराचे कार्य चालू ठेवले. सध्या स्वामी करुणा प्रकाश आरण्य हे कपिल मठाचे नवीन आचार्य (पीठाध्यक्ष) आहेत. सांख्य आणि योग तत्त्वज्ञानाच्या प्रकाशात निर्वाण धर्माची जोपासना करणे, तात्विक व नैतिक ज्ञानाचा प्रसार करणे आणि सत्य आणि मुक्तीच्या शोधात असलेल्या साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे ही कपिल मठाची प्रमुख कार्ये आहेत. तसेच या मठातील साधकांनी सांख्य आणि योग दर्शनावर आधारित असलेली संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये अनेक प्रमाणित पुस्तके व ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथसंपदेचे जतन करणे आणि ते साधकांमध्ये वितरित करणे हे मठाचे एक महत्त्वाचे कार्य आहे. या मठामार्फत दररोज मोफत वैद्यकीय सेवा पुरवली जाते. कपिल मठाच्या पश्चिम बंगालमध्ये कर्सियांग (दार्जिलिंग) आणि त्रिबेणी (हुबळी) येथे अधिकृत शाखा आहेत.
संदर्भ :
- Hariharananda Aranya, Swami, Yoga Philosophy of Patañjali with Bhāsvatī, State University of New York Press, 1983.
- Hariharananda Aranya, Swami, Sāṁkhya Across the Millenniums, Kapil Math, 2005.
- Hariharananda Aranya, Swami, The Sāṁkhya Catechism, Kapil Math, (various editions).
- Hariharananda Aranya, Swami, Yogakārikā, Kaivalyadhama, 2008.
- https://kapilmath.com/swami-dharmamegha-aranya/
- https://kapilmath.com/summary-of-acharyas/
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
