अभयारिष्ट हे आयुर्वेदातील पारंपरिक अरिष्ट प्रकारचे द्रवरूप औषध आहे. या औषधाचा उपयोग प्रामुख्याने पचनासंबंधीच्या समस्यांमध्ये केला जातो.

घटक : ‘अभया’ म्हणजे हरितकी (हिरडा). या अरिष्टातील मुख्य औषधी घटक हरितकी, मृद्वीका (काळ्या मनुका), विडंग, मधुक (मोहाची फुले) हे असून याव्यतिरिक्त गोक्षुर, धातुकी पुष्प (धायटीची फुले), दंतीमूळ, इंद्रवारुणी, मोचरस, त्रिवृत (निशोथ), गूळ इत्यादी घटक असतत. हिरडा श्रेष्ठ पचनवर्धक आणि सौम्य रेचक म्हणून काम करते. ते पोट साफ ठेवते, पोटातील वायू कमी करते, वातदोष संतुलित ठेवते आणि शरीरातील आम कमी करण्यास मदत करते. काळ्या मनुका पचनाचे कार्य सुधारतात व भूक वाढवण्यास मदत करतात. विडंग पोटातील कृमी कमी करण्यास मदत करते व पचन सुधारते. औषधाची कार्यक्षमता वाढवण्यास मोहाची फुले उपयोगी असतात. गोक्षुर मूत्रसंस्थेसाठी आणि पोटातील सूज कमी करण्यास उपयुक्त आहे. धातुकी पुष्प हे औषधाच्या किण्वन प्रक्रियेस (Fermentation) मदत करते. दंती मूळ व इंद्रवारुणी आतड्यांची स्वच्छता करण्यास मदत करतात. मूळव्याधातील रक्तस्राव नियंत्रित ठेवण्यासाठी मोचरस या ओषधीची मदत होते. त्रिवृतमध्ये उत्तम रेचक गुणधर्म असतो. गूळ औषधाला गोडवा आणतो व नैसर्गिक संरक्षण करतो. अभयारिष्ट हे औषध नैसर्गिक किण्वन प्रक्रियेद्वारे (Fermentation) तयार केले जाते.

लाभ : अभयारिष्ट हे औषध विशेषेकरून बद्धकोष्ठता या विकारात एक उत्तम नैसर्गिक रेचक (Laxative) म्हणून काम करते. याच्या सेवनाने मल मऊ होऊन पोट साफ होते व आतड्यांची कार्यक्षमता वाढते. हे औषध पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करते, त्यामुळे मूळव्याध (Piles) विकारात आराम मिळतो. शरीरातील वातदोष कमी करून पोट फुगणे किंवा पोटदुखी कमी करण्यास मदत करते. तसेच भूक वाढीसाठीही हे औषध उपयुक्त आहे. आधुनिक संशोधनानुसार अभयारिष्टमध्ये प्रतिऑक्सिडीकारक गुणधर्म आढळतात. तसेच शरीरामध्ये अन्नाचे प्रभावीपणे पचन व शोषण करणे आणि पचनसंस्थेशी संबंधित असणाऱ्या असंख्य सूक्ष्मजीवाणूंचे प्रमाण संतुलित ठेवणे यासाठी हे औषध गुणकारी आहे.

मात्रा : याची सामान्य मात्रा १५ ते ३० मिली. असून ते तितक्याच कोमट पाण्यात मिसळून जेवणानंतर दिवसातून २ वेळा घेतले जाते. मात्र रोग आणि रोगीच्या अवस्थेनुसार औषधाची मात्रा बदलू शकते. त्यामुळे वैद्यांच्या सल्ल्यानुसारच हे औषध घ्यावे.

औषध सेवन करताना घ्यावयाची काळजी : यामध्ये गूळ हा घटक असल्याने मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी हे औषध घेताना वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच गरोदर महिलांनी किंवा स्तनदा मातांनी वैद्यांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नये. याचे अतिप्रमाणात सेवन झाल्यास चक्कर येणे, डोकेदुखी, पोटदुखी, वारंवार शौच होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात.

पहा : आयुर्वेदिक औषधे सेवन करताना घ्यावयाची काळजी, हिरडा (पूर्वप्रकाशित नोंद).

संदर्भ :

  • अष्टांग संग्रह, चिकित्सास्थान (गुल्मचिकित्सा), अध्याय १०.
  • अष्टांग हृदय, चिकित्सास्थान (मात्राशितीय चिकित्सा), अध्याय ८.
  • चरक संहिता, चिकित्सास्थान (अर्शचिकित्सा), अध्याय १४.
  • भैषज्य रत्नावली, अर्शरोगाधिकार, अध्याय ९/१७५-१८०.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.