पाचव्या शतकातील बौद्ध टीकाकार बुद्धघोष यांनी दीघनिकायावर रचलेली  टीका आहे. पालि तिपिटकामधील सुत्तपिटकामधील पाच निकायांमधील पहिला निकाय. यामध्ये एकूण ३४ सुत्ते आहेत.”ही टीका किंवा अटठकथा, आपण दाठानाग (दंष्ट्रानाग) यांच्या विनंतीवरून लिहिली” असे बुद्धघोष म्हणतात. या टीकेत केवळ अर्थाचे विश्लेषण नसून दीघनिकायातील कठीण शब्द, त्यांची व्युत्पत्ती, अर्थ, सुत्तांचे निरनिराळ्या प्रकारे केलेले विवेचन यांचा समावेश आहे. तसेच, हा उपदेश व्यक्ती-स्थल-काल आणि परिस्थितीनुरूप उद्देशून दिलेला आहे. ही माहिती या ग्रंथात तपशीलवार दिली आहे. दाठानाग यांचे वास्तव्य सुमङ्गलपरिवेण येथे असल्याने या स्थानाच्या नावावरून या अटठकथेस “सुमंगलविलासिनी” असे नांव देण्यात आले आहे. सुमङ्गलविलासिनीचे १.सीलक्खन्धवग्गट्ठकथा, २. महावग्गट्ठकथा आणि ३. पाथिकवग्गट्ठकथा असे तीन भाग आहेत. भगवान  बुद्धांनी प्रतिपादित केलेल्या शील, समाधी आणि प्रज्ञा यांच्या अंगोपांगांचे सोदाहरण, सुलभ निरूपण सुमङ्गलविलासिनीत केलेले दिसून येते. या मधील आरंभकथा आणि निगमनकथेत–अट्ठकथा लिहिण्याची विनंती करणारे भदन्त दाठानाग, अट्ठकथेचे लेखक भदन्ताचार्य बुद्धघोष यांची माहिती, ग्रंथाची वैशिष्ट्ये, ग्रंथाची व्याप्ती या महत्त्वाच्या बाबी नोंदविलेल्या दिसतात. या ग्रंथांची रचना सुसूत्र पद्धतीने केलेली दिसते. बुद्धचरित्र आणि बुद्धकालीन अनेक व्यक्तिरेखांविषयी तपशीलवार माहिती ‘बोधि-परिच्छेद’ या शीर्षकांतर्गत समाविष्ट केलेली आहे. इतर ग्रंथांमध्ये आलेले संदर्भ पुनश्च उद्धृत करताना पुनरुक्ति करून इतर अट्ठकथांमध्ये आलेले त्यांचे निर्देश या ग्रंथात उद्धृत केलेले आहेत.

व्याकरण आणि भाषिकदृष्ट्या विचार करता या अट्ठकथेची भाषा पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाशी साधर्म्य असणारी दिसते. या अट्ठकथेत राजगीर येथे संपन्न झालेल्या पहिल्या धम्मसङ्गीतीपासून पाटलीपुत्र येथील तिसऱ्या धम्मसङ्गीतीपर्यंतचे अनेक दाखले आढळून येतात. श्रीलंकेतील ऐतिहासिक घटनांचाही उल्लेख काही ठिकाणी नोंदविलेला दिसतो. बुद्धकालीन भारतातील धार्मिक मतप्रवाह, राजकीय, सामाजिक, भौगोलिक, आर्थिक परिस्थिती त्याचबरोबर बुद्धकालीन अनेक व्यक्तिरेखांचा तपशील सुमङ्गलविलासिनीत नोंदविलेला असल्याने या ग्रंथास ऐतिहासिक दस्तावेज म्हणून महत्त्व आले आहे.

भदन्ताचार्य बुद्धघोषांनंतर त्यांचे निकटचे समकालीन भदन्ताचार्य धम्मपाल यांनी सुमङ्गलविलासिनीचे अधिक विश्लेषण करणारा ‘लीनत्थपकासनी’ हा टीकाग्रंथ लिहिला. इ.स.अठराव्या शतकात महाथेर ञाणाभिवंस धम्मसेनापती यांनी सुमङ्गलविलासिनीवर ‘साधुविलासिनी’ नावाची अभिनव टीका लिहिली. या टीकेत बुद्धकालीन भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या तसेच बुद्ध व त्यांच्या शिष्यांच्या कथादेखील सापडतात. जीवक, कौमारभृत्य, अंबष्ठ इ. बुद्धकालीन प्रसिद्ध व्यक्ती, भगवान बुद्धाची दिनचर्या इ. बद्दल माहिती अधिक विस्ताराने या ग्रंथामध्ये आली आहे. भौगोलिकदृष्ट्या कोसल, मगध, दक्षिणापथ इ. प्रांत व त्यातील नगरे याविषयी देखील माहिती या ग्रंथामध्ये मिळते. प्राचीन इतिहास जाणण्यासाठी सुद्धा हा ग्रंथ उपयुक्त आहे.

संदर्भ :

  • उपाध्याय भरतसिंह, ‘पालि साहित्य का इतिहास ‘, हिन्दी साहित्य सम्मेलन, प्रयाग, छठा संस्करण, २०००.
  • ऑस्कर व्हॉन हिनुबर,‘अ हँडबूक ऑफ पाली लिटरेचर ‘, वॉल्टर डी ग्रुटर, बर्लिन, १९९६
  • डांगे,सिंधू, भारतीय साहित्याचा इतिहास, भाग दुसरा, खंड पहिला, प्रकाशक – महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, म. गांधी रोड, नागपूर, १०. प्रथम आवृत्ती,१९७५.
  • तगारे गणेश वासुदेव, ‘पाली साहित्याचा इतिहास’ , प्रकाशक – महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, म. गांधी रोड, नागपूर, १०. प्रथम आवृत्ती, १९८२.
  • धम्मगिरी-पालि-गन्थमाला, खंड ११, विपश्यना विशोधन विन्यास, इगतपुरी, प्रथम आवृत्ती, १९९८.
  • बुशवेल रॉबर्ट इ., ‘एन्सायक्लोपेडिया ऑफ बुद्धिझम’, खंड १, मॅकमिलन रेफरन्स यु.एस.ए, २००३                                                                                                                                                                                                                                                                                                                          समीक्षक : राजश्री मोहाडीकर

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.