अंतर्गत माहितीचा गैरवापर करून केला जाणारा एक व्यवहार. म्हणजेच कंपनीची कामगिरी किंवा कंपनीच्या कोणत्याही धोरणात्मक निर्णयाबद्दलची अशी माहिती की, जी अजून सार्वजनिक झालेली नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचलेली नाही; मात्र तिचा वापर करून कंपनीच्या रोख्यांमध्ये (शेअर्स किंवा सिक्युरिटीज) व्यवहार करणे होय. जर कंपनीचा एखादा संचालक, अधिकारी किंवा इतर कोणताही कर्मचारी यांच्याकडे कंपनीची कामगिरी, आगामी योजना किंवा कंपनीद्वारे केली जाणारी संभाव्य कारवाई यांबद्दलची अशी माहिती की, जी संपूर्ण जगाला माहीत नाही आणि ती व्यक्ती स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने त्या माहितीचा वापर करत असेल, तर त्याला ‘अंतस्थ व्यवहार’ असे म्हणतात.

अंतस्थ व्यवहार या पद्धतीमध्ये संबंधित व्यक्तीचा किंवा इतर संस्थेचा फायदा करून देणे आणि किमतीवर परिणाम करू शकणाऱ्या संवेदनशील माहितीचा वापर करून कंपनीचा फायदा करून देणे या दोन गोष्टींचा समावेश होतो. खरे अंतर्गत माहिती असणारे (इनसाइडर्स) हे शक्यतो कंपन्यांचे उच्चपदस्थ लोक असतात. उदा., संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य इत्यादी. कॉर्पोरेट वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सल्लागार, तत्सम लोकसुद्धा एका अर्थाने कॉर्पोरेट इनसाइडर्सच असतात; कारण कंपनीच्या आत काय चालले आहे, हे त्यांना माहीत असते.

दुसऱ्या प्रकारचे अंतर्गत माहिती असणारे लोक हे कंपनीमध्ये मोठा हिस्सा बाळगून असतात. त्यांच्याकडे कंपनीच्या एकूण रोख्यांपैकी किमान ५ टक्के रोखे असतात. या दोन्ही प्रकारच्या इनसाइडर्सना त्यांच्याकडील रोख्यांच्या मालकीबद्दल वेळोवेळी नियामक मंडळाला कायद्यानुसार माहिती देणे बंधनकारक असते.

अलिकडच्या काळात जगभरात माहितीचा प्रवाह वेगाने वाढल्यामुळे ‘इनसाइडर’ या संज्ञेची व्याप्ती केवळ कंपनीचे उच्च अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सध्या जगभरात इनसाइडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किमान आठ प्रवर्गांतील घटकांचा समावेश होतो.

  • (१) कॉर्पोरेशन (कंपन्या) : यामध्ये उच्च कार्यकारी अधिकारी, संचालक मंडळ, सचिव यांचा समावेश होतो.
  • (२) गुंतवणूक बँकर्स : यामध्ये उच्च कार्यकारी अधिकारी, आर्बिट्रेज विभाग, संशोधन विश्लेषक, सचिव या पदाधिकाऱ्यांचा समावेश होतो.
  • (३) वकिली संस्था : केसेस सोपविलेले वकील, ज्या सहकाऱ्यांसोबत ते केसवर चर्चा करतात ते सहकारी, सचिव यांचा यामध्ये समावेश होतो.
  • (४) बँका आणि इतर कर्जदाते : व्यवहारात भाग घेणारे कार्यकारी अधिकारी आणि सचिव यांचा समावेश होतो.
  • (५) वित्तीय मध्यस्थ : यामध्ये स्वतंत्र आर्बिट्रेज संस्था, दलाल, वितरक, सुरक्षा विश्लेषक, बाजार विश्लेषक यांचा समावेश होतो.
  • (६) इतर मध्यस्थ : पत्रकार, प्रॉक्सी सॉलिसिटर, छपाई करणाऱ्या संस्था.
  • (७) संस्थात्मक गुंतवणूकदार : विमा कंपन्या, गुंतवणूक कंपन्या, बँकांचे विश्वस्त विभाग, निवृत्ती वेतन विभाग या पदाधिकाऱ्यांचा समावेश यामध्ये होतो.
  • (८) वैयक्तिक गुंतवणूकदार : सक्रीय विश्लेषक (जे केवळ सार्वजनिक माहिती प्राप्त करतात).

भारतातील नियामक व्यवस्था : अंतस्थ व्यवहार ही १९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि त्यानंतर एक अवांछनीय (चुकीची) प्रथा म्हणून मानली गेली. भारतातील सच्चर समिती (१९७९), पटेल समिती (१९८६) आणि अबिद हुसेन समिती (१९८९) या प्रमुख तीन समित्यांनी अंतस्थ व्यवहारचे नियमन आणि नियंत्रण करण्याची गरज अधोरेखित करून विविध सूचना दिल्या आणि विशिष्ट व्यवहारांवर बंदी घालण्याची शिफारस केली.

सेबी आणि अंतस्थ व्यवहार : गुंतवणूकदारांच्या संरक्षणाचा एक भाग म्हणून ज्या लोकांकडे कंपनीची माहिती मिळण्याचा इतरांपेक्षा जास्त अधिकार आहे, अशा लोकांकडून होणाऱ्या चुकीच्या आणि फेरफार करणाऱ्या पद्धतींना आळा घालण्यासाठी सेबीने काही नियम आणि बंधने आणली आहेत. सेबीने स्थापनेनंतर लगेचच अंतस्थ व्यवहार प्रतिबंधक नियम जारी केले. या नियमांत इनसाइडर्स, किंमत संवेदनशील माहिती, रोख्यांमधील व्यवहार, अप्रकाशित माहिती, अंतस्थ व्यवहारवर बंदी, अंतस्थ व्यवहाराची चौकशी, मोठे रोखे भागधारक, संचालक आणि इतरांद्वारे त्यांच्या हिताची माहिती जाहीर करणे, सूचिबद्ध कंपन्यांसाठी आदर्श आचारसंहिता, अंतस्थ व्यवहार आणि कॉर्पोरेट प्रकटीकरण धोरण अशा व्यापक सुधारणा २००२ मध्ये करून या नियमांमधील संज्ञा स्पष्ट केल्या.

भारतीय रोखे बाजार आणि जागतिक रोखे बाजार यांमध्ये अंतस्थ व्यवहारची अनेक प्रकरणे उघडकीस आलेले आहेत. उदा., (१) हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड आणि युटीआय प्रकरण : अंतस्थ व्यवहारसंबंधी १९९६ मध्ये घडलेल्या प्रकरणाने १९९२ च्या नियमांमधील पळवाटा शोधून त्या दुरुस्त करण्याचा धडा दिला. या प्रकरणामुळेच सेबीला २००२ मध्ये आपल्या नियमांमध्ये सुधारणा करणे भाग पडले.

(२) रजत गुप्ता आणि गोल्डमन सॅक्स अंतस्थ व्यवहार प्रकरण : अमेरिकेमधील हे एक अग्रगण्य आणि उच्चभ्रू (हाय प्रोफाईल) प्रकरण आहे. यामध्ये भारतीय वंशाचे प्रसिद्ध सीईओ आणि मॅकिन्से या नामवंत कन्सल्टिंग संस्थेचे सल्लागार रजत गुप्ता यांचा समावेश होता. गॅलियन घोटाळ्यात कट रचणे आणि रोखे फसवणुकीच्या चार फौजदारी गुन्ह्यांतर्गत जून २०१२ मध्ये गुप्ता यांना अंतस्थ व्यवहारच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले. ऑक्टोबर २०१२ मध्ये त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची, अतिरिक्त एक वर्ष देखरेखीखाली सुटकेची आणि ५ दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे २३.७२ कोटी रुपये) दंड भरण्याची शिक्षा सुनाविण्यात आली.

थोडक्यात, अंतस्थ व्यवहार हा देशाची अर्थव्यवस्था बळकट करणे, स्थानिक रोजगार वाढविणे, वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणे इत्यादींसाठी देशाचा कणा मानला जातो. यामध्ये कोणत्याही व्यवसायातील भागीदारी करताना गोपनीयतेला अत्यंत महत्त्व आहे. ही गोपनीयता बाहेरील स्पर्धात्मक बाजारात टिकून राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरते.

संदर्भ :

  • Marcial, Gene, 7 Commandments of Stock Investing, 2008.
  • Rustagi, R. P., Fundamentals of Financial Management, New Delhi, 2019.
  • Weston, J. Fred; Chung, Kwang S.; Hoag, Susan E., Mergers, Restructuring and Corporate Control, Pearson India Education Services, 2015.

समीक्षक : संतोष दास्ताने

अनुवादक : रिता शेटीया


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.