(ऑर्थाइट). विरल मृत्तिका मूलद्रव्यांनी (Rare Earth Elements; REE) समृद्ध असलेले एपिडोट गटातील एक सिलिकेट खनिज. स्कॉटिश खनिजशास्त्रज्ञ टॉमस ॲलन (Thomas Allan) यांच्या सन्मानार्थ त्याला ॲलॅनाइट असे नाव देण्यात आले.

रासायनिक संघटन : रा. सं.(Ca,REE)2(Al,Fe)3(SiO₄)(Si₂O₇)O(OH). ॲलॅनाइट हे कॅल्शियम, लोह, ॲल्युमिनियम आणि विरल मृत्तिका मूलद्रव्यांचे जटिल सिलिकेट खनिज आहे. यामध्ये प्रामुख्याने सिरियम, लँथॅनम, निओडिमियम, प्रासिओडिमियम आणि समॅरियम यांसारखी मूलद्रव्ये आढळतात. तसेच थोरियम आणि युरेनियमचे अल्प प्रमाणात घटक असतात. ॲलॅनाइट हे सोरोसिलिकेट (द्विसिलिकेट) गटातील खनिज आहे. त्याची स्फटिकीय रचना एपिडोट गटातील खनिजांसारखी असून सिलिकेट चतुष्फलक (SiO₄) आणि दुहेरी सिलिकेट गट (Si₂O₇) यांच्या संयोगाने तयार झालेली असते. कॅल्शियमच्या जागी विरल मृत्तिका मूलद्रव्यांचे प्रतिस्थापन होत असल्यामुळे त्याच्या रासायनिक संघटनात मोठी विविधता आढळते. थोरियम आणि युरेनियमच्या किरणोत्सर्गामुळे कालांतराने स्फटिक रचनेचे अंशतः विघटन होऊन खनिज विस्फटित (Metamict) अवस्थेत परिवर्तित होऊ शकते.

भौतिक आणि प्रकाशीय गुणधर्म : रासायनिक संरचनेत मोठ्या प्रमाणात विविधता आढळत असल्यामुळे त्याचे भौतिक गुणधर्मही बदलत असतात. रंग सामान्यतः गडद तपकिरी, काळा, हिरवट-काळा किंवा लालसर-तपकिरी. रंग करडा ते तपकिरी-करडा. चमक काचेसारखी ते राळेसारखी (resinous). अर्धपारदर्शक ते अपारदर्शक. एकनताक्ष (मोनोक्लिनिक; Monoclinic) स्फटिकप्रणाली. स्फटिक स्तंभाकार, पाटीसारखे किंवा अनियमित कणांच्या स्वरूपात किंवा संपुंजित, विखुरलेल्या दाणेदार स्वरूपातही आढळतात. कठिनता ५.५–६. विशिष्ट गुरुत्व ३.५–४.२. विदलन अपूर्ण असून भग्नता असमान ते शंखाभ असते. ठिसूळ (brittle) स्वरूपाचे खनिज. सूक्ष्मदर्शीखाली ते पिवळसर-तपकिरी, तपकिरी किंवा हिरवट-तपकिरी रंगाचे दिसते. यामध्ये तीव्र बहुरंगीपणा (strong pleochroism), उच्च उठाव (high relief) आणि मध्यम ते उच्चद्विवर्तन (birefringence) आढळते. थोरियम आणि युरेनियमच्या उपस्थितीमुळे काही नमुने सौम्यकिरणोत्सर्गी असू शकतात. ॲलॅनाइटमधील किरणोत्सर्गी घटकांच्या स्व-किरणोत्सर्गामुळे त्याच्या स्फटिक रचनेचे नुकसान होते, त्यामुळे ते सामान्यतः विस्फटित अवस्थेत आढळते. विस्फटित नमुन्यांमध्ये प्रकाशीय गुणधर्मांमध्ये अनियमितता दिसून येते.

आढळ : ॲलॅनाइट हे प्राथमिक खनिज असून ते अग्निज खडकांच्या स्फटिकीकरणाच्या अंतिम अवस्थेत तयार होते. ग्रॅनाइट, ग्रॅनोडायोराइट, माँझोनाइट, सायेनाइट तसेच ग्रॅनिटिक पेग्माटाइटमध्ये आढळणारे एक गौण खनिज आहे. रूपांतरित खडकांमध्ये उदा., नाइस, शिस्ट, ॲम्फिबोलाइट, मिग्माटाइट आणि स्कार्न यांमध्येही ते आढळते. जलतापीय (Hydrothermal) प्रक्रियांमुळे निर्माण झालेल्या शिरांमध्येदेखील तयार होऊ शकते. काही जड खनिजयुक्त वाळूमध्येही अपक्षयजन्य (Detrital) ॲलॅनाइट आढळते. झिर्‌कॉन, मोनाझाइट, अपेटाइट, बायोटाइट आणि हॉर्नब्लेंड यांसारखी खनिजे त्याची सामान्य सहचारी खनिजे आहेत.

ॲलॅनाइट जगातील अनेक देशांमध्ये आढळते. भारतात ॲलॅनाइट राजस्थानातील अरवली – दिल्ली पट्टा, कर्नाटकातील धारवाड क्रेटॉन, आंध्रप्रदेश व ओडिशातील पूर्वघाटक्षेत्र, तसेच तमिळनाडू आणि केरळमधील ग्रॅन्युलाइट व चार्नोकाइट प्रदेशांमध्ये आढळते. हे क्षेत्र विरल मृत्तिका मूलद्रव्यांच्या संभाव्य संसाधनांसाठी महत्त्वाचे मानले जातात.

उपयोग व महत्त्व : ॲलॅनाइट हे विरल मृत्तिका मूलद्रव्यांचे एक महत्त्वपूर्ण वाहक खनिज आहे. त्यांचे प्रमुख व्यावसायिक धातुक नाही, परंतु अनेक विरल मृत्तिकाधातूंच्या निक्षेपांमध्ये त्याचे महत्त्वपूर्ण योगदान असते. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील मेरी कॅथलीन येथे स्कार्नमध्ये आढळणाऱ्या युरेनियम साठ्यात विरल मृत्तिका मूलद्रव्यांच्यासाठी ॲलॅनाइटचे खनन करण्यात आले होते. भू-कालमापन (Geochronology) करण्यासाठी ॲलॅनाइट हे एक उपयुक्त खनिज असल्याचे मानले जाते.

संदर्भ :

  • Deer, W. A., Howie, R. A., & Zussman, J. An Introduction to the Rock-Forming Minerals  (3rd ed.); The Mineralogical Society, London, 2013.
  • Klein, C.; Hurlbut, C. S. Manual of Mineralogy (after James D. Dana); Wiley: New York, 1993.
  • Nesse, W. D. Introduction to Mineralogy (3rd ed.); Oxford University Press, New York, 2017.

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.