भारत सरकारची बंगळुरू येथे मुख्यालय असलेली भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO; इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) कृत्रिम उपग्रहासंदर्भात कार्य करीत आहे. इस्रोही संस्था अवकाशविज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध प्रकारे राष्ट्रीय कार्यात करण्याचा उद्देश समोर ठेवून कार्य करीत आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेल्या इस्रोने यासंदर्भात अग्निबाणांचे (रॉकेटांचे) प्रक्षेपण करून विविध प्रकारचे कृत्रिम उपग्रह आणि त्याअनुषंगाने यंत्रणा (प्रणाल्या) विकसित केल्या. भारताने १९७५ मध्ये आर्यभटया कृत्रिम उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून अवकाश कार्यक्रमात पदार्पण केले.
इस्रोने आर्यभट उपग्रहानंतर इन्सॅट (INSAT; इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टिम), जीसॅट (जिओसिंक्रोनस सॅटेलाइट), आयआरएस (IRS; इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट) अशा संदेशवहन व हवामान अभ्यास तसेच पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या बहुउद्देशीय उपग्रहांच्या मालिका यशस्वी केल्या आहेत. याचबरोबर सागरी निरीक्षण वातावरण अभ्यास, आपत्तीनिवारण, खगोलीय संशोधन, तंत्रज्ञान विकास, वैश्विक स्थाननिश्चिती इत्यादी विषय क्षेत्रांसाठीही उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. चंद्र आणि मंगळग्रहांकडे अवकाशयान पाठविलेल्या इस्रोने विद्यार्थ्यांसाठी उपग्रहनिर्मितीची संधी दिली आहे.
आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, आंतरजाल (इंटरनेट :वैश्विक पातळीवर संगणकप्रणाली एकमेकांशी जोडणारी यंत्रणा ) तसेच संरक्षण या उपयोजनांसाठी संदेशवहनाचे कार्य करण्यासाठी इन्सॅट आणि जीसॅट मालिकेतील प्रत्येकी २२ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. यांपैकी इन्सॅट मालिकेतील ११ उपग्रह हवामान निरीक्षणाचेही काम करतात, तर मेटस्टॅट (मिटिऑरॉलॉजिकल सॅटेलाइट) म्हणजेच ‘कल्पना’ हा एक खास उपग्रह हवामानाच्या अभ्यासासाठी वापरला जातो, तर जीसॅट मालिकेतील जीसॅट-३ हा उपग्रह शैक्षणिक कार्यासाठी (एज्युसॅट) आणि जीसॅट-४ हा उपग्रह आरोग्यविषयक कार्यासाठी (हेल्थसॅट) म्हणून कार्य करतात. या दोन्ही प्रकारांच्या उपग्रहमालिकांमधील सध्या १३ उपग्रह कार्यरत आहेत. संदेशवहनासाठी पहिला ‘ॲपल’ या कृत्रिम उपग्रहाचे १९८१ मध्ये प्रक्षेपण झाले. याखेरीज इस्रोकडून खाजगी आस्थापनांसंदर्भात; हौशी (अमॅच्युअर) रेडिओसंदेशवहनाचे कार्य करणारा हॅमसॅट तसेच अग्रणी आणि अनियारा या उद्योगसमूहांचे प्रत्येकी दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांसंदर्भात आयआरएस मालिकेत १०, भूपृष्ठनिरीक्षण करणाऱ्या रिसोर्स सॅटमालिकेत ७, जमिनीवरील विविध स्रोतांचे निरीक्षण करणाऱ्या कार्टोसॅट मालिकेत १०, सागर निरीक्षण करणाऱ्या ओशियन सॅटमालिकेत ३, सुदूरसंवेदन करणाऱ्या रिसॅटमालिकेत ४ तर वातावरणाचा अभ्यास करणारे मेघ, नेमो आणि निसार अशा ३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. पृथ्वी निरीक्षण करणाऱ्या उपग्रहांची सुरुवात भास्कर-१ आणि -२ या अनुक्रमे १९७९ आणि १९८१ मध्ये प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपासून झालेली आहे. याच दरम्यान १९८१ व १९८३ मध्ये रोहिणी आरएसडी-१ आणि डी-२ हे उपग्रह त्याच कार्यासाठी प्रक्षेपित करण्यात आले होते. याखेरीज पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी जीआयसॅट-१ आणि -२, आयएमएस-१, सरल, स्कॅटसॅट, स्रॉस-बी (स्ट्रेच्ड रोहिणी सॅटेलाइट सेरिज), आणि टेस असे ६ उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपित झालेल्या वरील उपग्रहांपैकी सध्या १२ उपग्रह कार्यरत आहेत.
विज्ञान-तंत्रज्ञान आणि शैक्षणिक प्रयोजनासाठी प्रक्षेपण केलेल्या उपग्रहांमध्ये; खगोलशास्त्रीय संशोधनासाठी आर्यभट-१ ( इस्रोचा पहिला उपग्रह ), ॲस्ट्रोसॅट आणि स्रॉसनामक मालिकेत ए,बी, सी आणि सी-२ असे एकूण ४ उपग्रह आहेत. आयनांबराचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी एमसॅट तर सूक्ष्मगुरुत्वाकर्षणाचे संशोधन करण्यासाठी एसआरर्इ -१ आणि -२ असे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. तंत्रज्ञानासंदर्भात एएएम, अनुसॅट (अण्णा युनिव्हर्सिटी सॅटेलाइट ), अनुसॅट-२, आयआरएन एसएस१-ए, १-बी; प्रथम, परीक्षित, स्वयम्, जुगनू, सत्यभामासॅट, एसआरएमसॅट, एम-रेझीन्स, आरटीपी आरएस-१ या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपण केलेले रोहिणी आरएसडी-१ आणि डी-२ या उपग्रहांनी तंत्रज्ञान विकासाचेही कार्य केले आहे. तंत्रज्ञान विकासासाठी एकूण १५ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. याखेरीज बहुउपयोजन असलेला युथसॅट हाही एक उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. यांपैकी परीक्षित, जुगनू, एसआरएमसॅट,पायसॅट आणि एनआययूसॅट हे उपग्रह पृथ्वी निरीक्षण करणारे सुध्दा असून, ते पुढीलप्रमाणे शैक्षणिक संस्थांशी जोडले गेलेले होते. परीक्षित (मणिपाल इन्स्टिट्यूटऑफटेक्नॉलॉजी, मणिपाल-कर्नाटक), पायसॅट (पीर्इएस इन्स्टिट्यूटऑफटेक्नॉलॉजी, बंगळुरू), जुगनू (आयआयटी, कानपूर), एसआरएमसॅट (एसआरएम विद्यापीठ, चेन्नर्इ), आणि एनआययूसॅट (नुरूल इस्लाम विद्यापीठ, कन्याकुमारी); तर स्वयम् (अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे).
भारताची स्वतंत्र आधुनिक पद्धतीची पृथ्वीवरील स्थान निश्चित करणारी प्रणाली (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम; जीपीएस) उभारण्यासाठी इस्रोने भारतीय प्रादेशिक दिशादर्शन उपग्रह प्रणालीच्या अनुषंगाने आयआरएनएसएस या मालिकेत ७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले असून काही उपग्रह प्रस्तावित आहेत.
भारताकडून उपग्रहांच्या अनुषंगाने इस्रोने चंद्राचे निरीक्षण करण्यासंदर्भात चांद्रयान या नावाने मोहिमा आखल्या आहेत. यामध्ये यशस्वी झालेली चांद्रयान-१ ही मोहिम चंद्राला प्रदक्षिणा घालणारी आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उपकरण प्रणाली सोडणारी आहे. चंद्रावर सोडलेल्या उपकरणांमध्ये भूप्रदेशांचे छायाचित्ररूपी मोजमाप करणारे उपकरण, उच्चवर्णपटीय चित्रण करणारे साधन, लेसर किरणांच्या माध्यमातून भूस्वरूपाचे निरीक्षण करणारे उपकरण, क्ष-किरणांच्या माध्यमातून वातावरणाचा अभ्यास करणारे साधन यांखेरीज शोधक नामक उपकरणात चांद्रभूमीवर उतरताना दृश्यीय वर्णपटात चित्रण आणि वातावरणाच्या उंची व दाबाचा अभ्यास करणारी उपकरणे आहेत. भारताची चांद्रयान-२ मोहिम प्रस्तावित असून या मोहिमेत चंद्रभूमीवर फिरणारे खास वाहन पाठविण्यात येणार आहे.
भारताने इस्रोच्या माध्यमातून मंगळ ग्रहाच्या कक्षेतून अभ्यास करण्यासाठी मंगळयान ही अंतराळ मोहिम ( मार्स ऑर्बीटर मिशन ) राबविली आहे. यामध्ये मंगळाच्या कक्षेत फिरणाऱ्या यानातील उपकरणांच्या मदतीने तेथील वातावरण आणि मंगळभूमीचा अभ्यास-संशोधन केले जाणार आहे. यासंदर्भातील उपकरणांमध्ये रंगीत छायाचित्रे टिपणारी प्रणाली, औष्णिक वर्णपटात निरीक्षण करणारे साधन, मिथेन वायूचे संवेदक, वातावरणीय संरचनेचे विश्लेषण करणारी यंत्रणा आणि उच्चवर्णपटीय चित्रण करणारे साधन यांचा समावेश आहे.
इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य ही सूर्यमोहिम आखलेली आहे. या मोहिमेत सूर्याच्या दिशेनेसुमार १५ लाख किलोमीटर अंतरावर एक यान पाठवून सूर्यकिरणे, सौरकण, सौरकिरीट, सौरवर्णपट आणि चुंबकीय वातावरण इत्यादींच्या अभ्यासासाठी ७ उपकरणांच्या प्रणाली वापरून संशोधन केले जाणार आहे.
भविष्यातील अवकाश मोहिमांसंदर्भात वातावरणात पुनर्प्रवेश करू शकेल असे यानाशी जोडल्या जाणाऱ्या खासप्रणालीचे (कोष-कॅप्सूल) प्रयोगकरून संबंधित रचनेची (मॉड्यूल) यशस्वी चाचणी इस्रोने केली आहे.
उपग्रहांच्या अनुषंगाने इस्त्रोने आजतागायत ६४ उड्डाणे साध्य करून विविध उपग्रह तसेच अंतराळयान मोहिमांचे शतक पार केले आहे. अवकाशयान उड्डाण तंत्रज्ञानात खास प्रावीण्य प्राप्त केलेल्या इस्रोने २०९ परदेशी उपग्रहांचेही प्रक्षेपण केले आहे. यामध्ये ध्रुवीय अवकाशयान उड्डाण मोहिमेद्वारे एकाच वेळी १०४ उपग्रहांना यशस्वीरित्या अपेक्षित कक्षेत स्थापित केले आहे, ज्यामध्ये भारताचे केवळ ३ तर उरलेले अन्य देशांचे उपग्रह होते. ही भारताची विशेष कामगिरी मानली जाते.
समीक्षक – बाळ फोंडके