कालमेट,आल्बेर : ( १२ जुलै १८६३ – २९ ऑक्टोंबर १९३३ ).

फ्रेंच जीवाणुशास्त्रज्ञ.  त्यांचे संपूर्ण नाव लेआँ शार्ल आल्बेर कालमेट. क्षयरोगाला प्रतिबंधक करणाऱ्या बीसीजी या लसीचा शोध त्यांनी कामीय गेरँ यांसमवेत लावला. दुर्बल आणि अक्षम केलेल्या मायकोबॅक्टिरियम बोव्हीस या जंतूपासून त्यांनी ही लस तयार केली. तसेच त्यांनी सर्पविषाला प्रतिकार करणारे पहिले अँटीव्हेनम विकसित केले, त्यालाच कालमेटस्-सिरम असे संबोधले आहे.

कालमेट यांचा जन्म फ्रान्समधील नीस (Nice) या शहरात झाला. पाश्चर इन्स्टिट्यूटमधील ते एक महत्त्वाचे अधिकारी होते. नौदलात वैद्यक म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा असल्याने ते ब्रेस्ट (Brest) येथील स्कूल ऑफ नेइव्हल फिजीशन मध्ये रुजू झाले होते (१८८१). नंतर हाँगकाँग येथील नेइव्हल मेडिकल कार्पोरेशनमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात केली (१८८३). याठिकाणी त्यांनी डॉ.‍ पॅट्रिक मन्सन (Patrik Manson) यांच्याबरोबर काम केले. डॉ. मन्सन यांचा फायलेरिया या हत्तीरोगासाठी कारणीभूत असणाऱ्या परोपजीवी जंतूचे डासांमार्फत होणारे संक्रमण या विषयावर अभ्यास होता. फायलेरियासिस या विषयातच कालमेट यांनी देखील आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांची सेंट पीअर आणि मिकलॉन (Saint pierre and Miquelon) येथे नियुक्ती झाली (१८८७). त्यानंतर त्यांनी मलेरिया, स्लीपिंग सिकनेस आणि पेलाग्रा (ब जीवनसत्वाच्या अभावाने होणारा रोग) या रोगांवर वेस्ट आफ्रिका, गाबाँ  (Gabon) आणि फ्रेंच काँगो (French Congo) येथे संशोधन केले.

कालमेट फ्रान्सला परत आल्यानंतर लूई पाश्चर आणि एमिल रुक्स (Emile Roux) यांच्याबरोबर भेट झाली (१८९०). यांपैकी एमिल रुक्स हे तर कालमेट यांचे जंतूशास्त्रातील प्राध्यापकच होते. याठिकाणी ते सहयोगी झाले आणि पाश्चर यांनी त्यांना फ्रेंच-इंडोचायनाच्या सायगॉन (Saigon) येथे पाश्चर इन्स्टिट्यूटची शाखा स्थापन करून चालविण्याची जबाबदारी दिली. याच ठिकाणी त्यांनी टॉक्सिकॉलॉजी या इम्यूनॉलॉजीशी अतिशय घनिष्ठ संबंध असलेल्या स्वतंत्र विषयास स्वतःला झोकून दिले. त्यांनी सर्प आणि मधमाशांच्या विषाचा तसेच अनेक वनस्पतीतील विषारी घटकांचा अभ्यास केला. त्यांनी देवी (small pox) आणि रेबीज या रोगाच्या प्रतिबंधासाठीच्या लसी तयार करण्याचे नियोजन केले. तसेच पटकी (cholera) या रोगांवर व अफू आणि तांदळाच्या किण्वन क्रियेवर अभ्यास केला.

कालमेट १८९४ मध्ये पुन्हा फ्रान्सला परत आले आणि सर्पविषाला प्रतिबंध करणारे पहिले अँटीव्हेनम विकसित केले. यासाठी त्यांनी घोड्यांचा वापर केला. सर्पविष टोचलेल्या घोड्यांच्या रक्तद्रव्यापासून त्यांनी अँटीव्हेनम तयार केले. यालाच त्यांनी कालमेटस्-सिरम असे संबोधले. यानंतर ब्राझिलियन डॉक्टर व्हाइटल ब्राझील (Vital Brazil) यांनी या क्षेत्रात काम सुरू केले. त्यांनी सर्प, विंचू आणि कोळी यांच्या विषाला प्रतिकार करणारे अनेक अँटीव्हेनम तयार केले.

याखेरीज कालमेट, ए. ई. जे. येर्सँ (यर्सिन)(Alexandre Yersin) यांच्याबरोबर बुबॉनिक प्लेग या रोगाला प्रतिबंध करणारे रक्तद्रव्य विकसित करण्यामध्येही सहभागी झाले. यर्सिन यांनी यर्सिनिया पेस्टीस (Yersinia pestis) या बुबॉनिक प्लेगच्या जंतूंचा शोध लावला होता. त्यांनतर कालमेट पोर्तुगाल येथील ओपोर्तोमधील प्लेगच्या  साथीवर अभ्यास व मदत करण्यासाठी गेले.

कालमेट यांना १८९५ मध्ये रुक्स यांनी लिल (Lille) शहरातील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या शाखेच्या संचालकपदाची जबाबदारी दिली. याठिकाणी ते पुढे २५वर्षे कार्यरत राहिले. १९०१मध्ये त्यांनी लिलमध्ये पहिले क्षयरोग प्रतिबंधक रुग्णालय सुरू केले. नंतर त्यांनी आजही अस्तित्वात असलेल्या नॉर्दन अँटीट्युबरक्युलॉसिस लीगची स्थापना केली. १९०९मध्ये त्यांनी पाश्चर इन्स्टिट्यूटची अल्जेरियामध्ये शाखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. पुढे त्यांनी पॅरीसमधील पाश्चर इन्स्टिट्यूटचे उपसंचालक हे पद स्वीकारले कालमेट यांचे नाव वैद्यकशास्त्राशी कायमस्वरूपी जोडले गेले ते म्हणजे त्यांनी विकसित केलेली क्षयरोग प्रतिबंधक लस. त्याकाळी क्षयरोग हे मृत्यूचे मुख्य कारण होते. १८८२मध्ये जर्मन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉख (Robert Koch) यांनी मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलॉसिस या क्षयरोग जंतूंचा शोध लावला होता. लूई पाश्चर यांचीसुद्धा यामध्ये लक्ष घालण्याची इच्छा होती. पशुवैद्यकशास्त्रज्ञ आणि इम्युनोलॉजिस्ट कामीय गेरँ (Camille Guerin) यांनी क्षयरोगाविरुद्धची प्रतिकारशक्ती ही रुग्णाच्या रक्तातील जिवंत जंतूशी निगडीत असते हे सिद्ध केले होते. पाश्चरच्या संकल्पनेचा वापर करून कालमेट यांनी दुर्बल आणि अक्षम क्षयरोग जंतू प्राण्यांमध्ये टोचल्यास प्रतिकारशक्ती कशी निर्माण होते याचे संशोधन केले. या निर्मितीलाच  या दोन शास्त्रज्ञांचे नाव देण्यात आले. (बॅसिलस-कालमेट-गेरँ किंवा बीसीजी )

गेरँ आणि कालमेट यांनी क्षयरोग जंतूंच्या दुर्बल आणि अक्षम प्रजाती तयार करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी या जंतूंची प्रयोगशाळेमध्ये वारंवारपणे वेगवेगळ्या माध्यमात वाढ केली. अखेर १९२१मध्ये त्यांनी बीसीजी या लसीचा पॅरीसमध्ये नवजात बालकांवर यशस्वीपणे वापर केला. परंतु १९३० साली जर्मनीमध्ये दुर्दैवाने लसीकरणाच्या मोहिमेनंतर लस टोचलेल्या सुमारे ७२ बालकांमध्ये  क्षयरोगाची लागण झाली. नंतर लसी तयार करण्याच्या नवीन आणि सुरक्षित पद्धती विकसित झाल्यानंतर लसीकरणाची मोहीम अनेक देशात सुरू झाली. परंतु  कालमेट यांना जर्मनीतील घटनेचे प्रचंड दु:ख झाले होते

कालमेट यांचे पॅरीसमध्ये निधन झाले.

 

संदर्भ :

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा