सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिशवॉटर ॲक्वाकल्चर

(Central Institute of Brackishwater Aquaculture)

स्थापना : १ एप्रिल १९८७

केंद्रीय निमखाऱ्या पाण्यातील जलजीव संवर्धन ही संस्था कोळंबी, शेवंडे, कालवे, शिणाणे इत्यादी जीवांची मत्स्यशेती करते. संस्था मच्छिमार समाजाला आणि विशेषतः महिलांना प्रशिक्षण देते.संस्थेत मत्स्यशेती तंत्रज्ञान संशोधन होते. कोळंबीला होणाऱ्या अपायकारक जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांवर येथे संशोधन करण्यात येते.

केंद्रीय निमखाऱ्या पाण्यातील जलजीव संवर्धन संस्था ही भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या अखत्यारीत ही संस्था निर्माण करण्यात आली (१९८७). या संस्थेचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे असून संशोधन केंद्र पश्चिम बंगाल मधील काकद्वीप येथे आहे. चेन्नईच्या दक्षिणेस ३० कि.मी. वर असलेल्या मुत्तुकाडू येथे दुसरी  प्रयोगशाळा आहे.

निमखाऱ्या पाण्यात असणाऱ्या मत्स्य प्रजाती तसेच कोळंबी, शेवंडे, कालवे, शिणाणे इ उत्पादनाच्या  खाद्याला देशात आणि विदेशात बरीच मागणी असते. आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अशा जलीय जीवांची शेती करणे हे लाभदायक ठरते. संस्थेच्या माध्यमातून मच्छिमार समाजाला आणि विशेषतः महिलांना प्रशिक्षण दिले जाते. मत्स्यशेती तंत्रज्ञान संशोधन, या व्यवसायात येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षित करणे व मत्स्यशेतीचा प्रसार व्हावा यासाठी विस्तार कक्ष उघडून जनतेला त्याची माहिती देणे, मत्स्य शेती विषयक सल्ले देणे आणि मार्गदर्शन करणे अशी अनेक प्रकारची कामे ही संस्था अविरतपणे करते.

या संस्थेत कवचधारी संधिपाद सजीव संवर्धन विभाग, मत्स्य संवर्धन विभाग, पोषण जनुकशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभाग आणि जलीय प्राण्यांचे  आरोग्य आणि पर्यावरण विभाग असे प्रमुख विभाग आहेत. कवचधारी संधिपाद संवर्धन विभागामध्ये खेकडे, कोळंबी, प्रॉन्स अशा खाद्य प्राण्यांवर परिपक्वता, बीज निर्मिती, रोपवाटिकेत संगोपन, कोळंबीसारख्या प्राण्यांची शेती करण्यासाठीच्या तलावांचा विकास त्यांच्या खाद्याची निर्मिती, प्रजातींची नेमकी ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्यावरील रोग निदानासाठी रेण्वीय उपाय शोधून काढले जातात.

मत्स्य संवर्धन विभागामध्ये जीताडे, खजुरासारख्या (आशियाई सी बास), बोयटे किंवा गुंजली (मलेट), किंग मासा, मिल्क फिश या प्रजातींचे पालन,त्यांचे प्रजनन, बीज मिळवणे व त्यांचे परिपक्वतेपर्यंत संगोपन करणे इत्यादीचे व्यवस्थापन हा विभाग पाहतो.

पोषण, जनुकशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान विभागामध्ये माशांच्या वृद्धी काळात आवश्यक खाद्य तयार करण्यासाठी मुख्यत्वे करून हा विभाग निर्माण करण्यात आला, खेकडे, सी बास, कोलंबी यांना लागणारे अन्न, फिश मिल आणि माशाच्या तेलाला पूरक असे पदार्थ बनवण्यावर येथे संशोधन केले जाते. माशांच्या निरनिराळ्या प्रजातींचे जनुकशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान यावर येथे सखोल संशोधन केले जाते.

जलीय प्राण्यांचे आरोग्य आणि पर्यावरण विभाग, मत्स्य शेतीवर येणारे साथीचे रोग व त्यांचा पर्यावरणावर काय प्रभाव पडतो ते तपासण्यासाठी हा विभाग नंतर सुरु करण्यात आला. विशेषतः कोळंबीला होणाऱ्या अपायकारक जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य रोगांवर येथे संशोधन करण्यात येते. कोळंबीवर रोग आल्यास अपरिमित आर्थिक हानी होते.

काकद्वीप संशोधन केंद्रात भेरी या स्थानिक मत्स्यशेतीच्या पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग करण्यात येतात. संपूर्ण संशोधन केंद्रात मृदा आणि जल यांचे नमुने तपासण्याची व्यवस्था केलेली आहे.

मुत्तूकाडूची प्रयोगशाळा चेन्नईच्या दक्षिणेला आहे. इथे मत्स्यबीज पैदास करण्याचे शिक्षण देण्यात येते.

संदर्भ :

व्हिडीओ लिंक :

समीक्षक – मोहन मद्वाण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा